लहान मुलांना कर्करोग होऊ शकतो, जाणून घ्या लक्षणे

लहान मुलांना कर्करोग होऊ शकतो, जाणून घ्या लक्षणे

लहान मुलांना कर्करोग होऊ शकतो, हेच लोकांना माहीत नसते. प्राथमिक तपासणीत त्याची लक्षणे कशी ओळखावीत हे डॉक्टरांनाही कळत नाही. लहान मुलांमध्ये सामान्यतः पाच प्रकारचा कर्करोग आढळतो. लवकर निदान होण्याबरोबरच ज्या कारणांमुळे लहान मुलांना कर्करोग होऊ शकतो त्यापासून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक आहे.

मुलांमधील कर्करोगाची जी आंतरराष्ट्रीय आकडेवारी उपलब्ध होते, ती सहसा उच्च सामाजिक आणि आर्थिक वर्गातील किंवा विशेषत्वाने अमेरिका, युरोपीय देश अशा श्रीमंत देशांशी संबंधित असते. या देशांमधील अहवाल प्रणाली तुलनेने चांगली आहे. तथापि, भारत आणि अन्य आफ्रिकी देशांसह जवळजवळ संपूर्ण दक्षिण आशियाई देशांमध्ये मुलांच्या कर्करोगाची प्रकरणे योग्यरीत्या नोंदविली जात नाहीत. त्याची दोन प्रमुख कारणे आहेत.

पहिले म्हणजे, कर्करोग ओळखताच येत नाही. जर एखाद्या लक्षणामुळे मुलाचा मृत्यू झाला तर तो कर्करोगाने झाला, असे मानले जात नाही. समजा, ग्रामीण भागातील शुश्रूषागृहातील मुलाला कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि त्याचा अहवालही आला; पण त्याचा अहवाल आयसीएमआरकडे आला नाही, तर त्या रुग्णाचा समावेश प्रणालीत होत नाही.

सेंटर फॉर कम्युनिकेबल डिसीजच्या (सीडीसी) म्हणण्यानुसार, कर्करोगाची प्रकरणे नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे. सहसा, संसर्गाची प्रकरणे नोंदविली जातात आणि त्या आधारावर सर्व देशांसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातात. कर्करोगाची नोंदणी, अहवालदेखील त्याच प्रकारे करणे आवश्यक आहे; जेणेकरून आपण उपचार आणि नियंत्रणासाठी प्रभावीपणे धोरणे राबवू शकू. भारतात या प्रक्रियेची खूपच उणीव जाणवते. यंत्रणा तयार केली असली, तरी ती प्रभावी नाही.

कर्करोग रुग्णालयांकडून अशा प्रकारच्या रुग्णांची नोंदणी केली जाते. परंतु; प्रत्येक रुग्णाला त्या रुग्णालयापर्यंत पोहोचणे शक्य असते का, हा खरा प्रश्न आहे. उच्च उत्पन्नगटातील देशांमध्ये म्हणजेच ज्या देशांमध्ये आरोग्यासाठी आर्थिक तरतूद चांगली असते आणि रुग्णांवर उपचारांचा भार नसतो अशा देशांमध्ये मुलांच्या कर्करोगाचे निदान 80 टक्क्यांपर्यंत केले जाऊ शकते.

कर्करोगाचे लवकर निदान होणे गरजेचे आहे. लहान मुलांमध्ये जी लक्षणे दिसतात, ती कर्करोगाची असू शकतात, याची प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रातील डॉक्टरांना जाणीव असते. बहुतेक प्रकरणांमध्ये कर्करोग निष्पन्न होत नाही. तथापि, 10 टक्के प्रकरणांमध्ये कर्करोगाचे निदान लवकर केले जाते.

आपल्याला कर्करोग तज्ज्ञाकडे जावे लागणार आहे, हे बर्‍याच रुग्ण मुलांच्या पालकांना कळत नाही. कोणीतरी त्यांना सल्ला दिला तरच मुलाला योग्य उपचार मिळू शकतील. आपल्या देशात कर्करोगाचे लवकर निदान न झाल्यामुळे रुग्ण जगण्याचे प्रमाण कमी असते. लहान मुलांनाही कर्करोग होऊ शकतो, हेच लोकांना माहीत नसते. प्राथमिक तपासणीत त्याची लक्षणे कशी ओळखावीत, हे डॉक्टरांनाही कळत नाही.

लहान मुलांमध्ये आढळणारा कर्करोग म्हणजे ल्युकेमिया, दुसरा लिम्फोमा म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीमचा कर्करोग, तिसरा ब्रेन ट्यूमर, चौथा रेटिनोब्लास्टोमा म्हणजे डोळ्यांचा कर्करोग आणि पाचवा न्यूरोब्लास्टोमा म्हणजे मूत्रपिंडाच्या वरील बाजूस जी ग्रंथी असते तिचा कर्करोग होय. हा मेंदूचा कर्करोग नाही. मुलांना सामान्यतः पाच प्रकारचा कर्करोग होऊ शकतो. ल्युकेमिया आणि लिम्फोमाची लक्षणे रक्त आणि सर्दी खोकल्याशी संबंधित असतात.

या लक्षणांमध्ये शरीरावर कुठेतरी लाल ठिपके दिसू लागतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. मुलाला ताप आल्यावर जर आपण त्याला बालरोगतज्ज्ञांकडे नेले आणि त्यांनी तापाचे औषध देऊनसुद्धा मूल बरे होत नसेल तर शंका येणे स्वाभाविक आहे. अशा वेळी तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांनी या पैलूंचाही विचार केला पाहिजे. वजन कमी होणे, थकवा येणे, चिडचीड होणे ही सर्व ल्युकेमिया, लिम्फोमाची लक्षणे आहेत.

मेडुलोब्लास्टोमा हा ब्रेन ट्यूमरमध्ये होणारा कर्करोग आहे. याचे कारण जन्मजात जनुकातील दोष हे असू शकते. जर मुलाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर सामान्यतः पालक असे गृहीत धरतात की, तो शाळेत न जाण्यासाठी कारण शोधत आहे किंवा टीव्ही आणि मोबाईल जास्त पाहिल्यामुळे मुलाला चष्मा लागला असेल. डोकेदुखीबरोबरच त्याला मळमळ जाणवत असेल किंवा उलट्या होत असतील तर ते ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते. त्याची त्वरित तपासणी केली पाहिजे. डोळ्यांच्या कर्करोगात काळ्या बाहुलीच्या मध्यभागी पांढरटपणा दिसतो.

जर मुलाला दिसणे बंद झाले तर तो रेटिनोब्लास्टोमा असू शकतो. जर शरीरात काही असामान्य गाठ असेल, तर त्या ठिकाणी वेदना होतेच असे नाही. अशा वेळी तो स्नायू किंवा हाडांचा कर्करोग असू शकतो. मूत्रपिंडाच्या कर्करोगात मुलाचे पोट फुगू लागते. या सर्व लक्षणांकडे लक्ष असणे आवश्यक आहे. योग्य निदान आणि योग्य ठिकाणी उपचार केल्यास भारतातील अनेक कर्करोग रुग्णांचे प्राण वाचू शकतात. प्रौढांमधील कर्करोग केवळ 5 ते 15 टक्के जनुकांच्या समस्येमुळे होतात.

मुलांमधील कर्करोगाविषयी दोन गृहीतके आहेत. मातेच्या पोटात मूल वाढत असताना कर्करोगाच्या एखाद्या घटकाचा त्याच्यावर परिणाम झाला तर पुढे समस्या निर्माण होऊ शकते. सूर्यग्रहणाच्या वेळी पडणार्‍या किरणांचा गर्भवती मातेवर परिणाम होतो आणि त्यामुळे मुलाच्या जनुकांमध्ये दोष निर्माण होऊ शकतो, असे मानले जाते. परंतु; हे पूर्णपणे सिद्ध करण्याएवढे पुरावे मिळालेले नाहीत. अशा गृहीतकांना 'सिंगल हिंट हायपोथिसिस' असे म्हणतात.

दुसरी शक्यता अशी की, कर्करोगाला कारक ठरणार्‍या रसायनांनी युक्त खाद्यपदार्थ मुलाच्या खाण्यात आल्यामुळे मूल कर्करोगाच्या भोवर्‍यात सापडू शकते. पर्यावरणीय प्रदूषण किंवा किरणोत्सर्गाचा अशा मुलांवर पुन्हा परिणाम झाल्यास त्याला 'डबल हिंट हायपोथिसिस' असे म्हणतात. त्याच्या सत्यासत्यतेची अद्याप पूर्ण पडताळणी झालेली नाही.

मात्र, मातेने आपल्या आहाराची काळजी घेणे, रासायनिक व भेसळयुक्त पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे. ब्रेन ट्यूमरमध्ये मोबाईल रेडिएशन हे एक महत्त्वाचे कारण असू शकते. गरोदर मातांनी मोबाईलपासून दूरच राहिलेले बरे. सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेकी वापर टाळावा. कारण, त्यात अशी रसायने असतात की, जी कर्करोगाचे कारण ठरू शकतात.

डॉ. मनोज शिंगाडे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news