लसूण पिकाची लागवड आणि व्यवस्थापन

लसूण पिकाची लागवड आणि व्यवस्थापन
Published on
Updated on

लसूण हे रोजच्या आहारातील लागणारे महत्त्वाचे मसाल्याचे पीक आहे. भारत आणि चीन हे लसूण पिकविणारे जगातील प्रमुख देश आहेत. भारतात प्रामुख्याने गुजरात, मध्य प्रदेश, ओरिसा, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांत मोठ्या प्रमाणात हे पीक घेतले जाते.

महाराष्ट्रातील बहुतेक सर्व भागांत कमी-जास्त प्रमाणात लसणाची लागवड केली जाते. पुणे, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत लसणाची लागवड मोठ्या प्रमाणात आढळते. लसूण लागवडीत जमीन, सुधारित जातींची निवड, लागवडीनंतरचा हंगाम, लागवडीचे अंतर आणि बियाण्याचे प्रमाण याबाबत आपण माहिती घेतली. आज खते आणि पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत आणि तणनाशकाचा वापर, पीक संरक्षण, काढणी आणि उत्पादन याविषयी जाणून घेऊ.

खते आणि पाणी व्यवस्थापन : लसणाच्या चांगल्या वाढीसाठी खतांचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी वापर करणे महत्त्वाचे आहे. लागवडीसाठी जमीन तयार करताना दर हेक्टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे आणि वाफे बांधून घ्यावेत. राहिलेले निम्मे नत्र (50 किलो) लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी द्यावे आणि लगेच पाणी द्यावे. कांदा आणि लसूण ही पिके गंधकयुक्‍त खताचा प्रतिसाद देतात असे दिसून आले आहे, म्हणून भरखते देताना अमोनियम सल्फेट आणि सुपर फॉस्फेट या खतांचा उपयोग केल्यास आवश्यक गंधकाची मात्रा पिकास मिळते. मिश्रखते वापरल्यामुळे आवश्यक गंधकाची पूर्ती होत नसल्याने लागवड करण्यापूर्वी प्रतिहेक्टरी 50 किलोग्रॅम गंधक जमिनीत खताबरोबर मिसळावे.

लसणाची मुळे जास्त खोलवर जात नसल्यामुळे तसेच लसणाचे गड्डे जमिनीत वाढत असल्यामुळे पिकाला जास्त प्रमाणात पाणी देणे, पाण्याचा ताण देणे आणि वाफ्यांमध्ये पाणी साचू देणे या गोष्टी टाळाव्यात. योग्य उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक आहे म्हणून लागवडीनंतर पिकाला लगेच हलके पाणी द्यावे. दुसरे पाणी त्यानंतर 3-4 दिवसांनी द्यावे आणि त्यानंतर पुढच्या पाण्याच्या पाळ्या 8-10 दिवसांच्या अंतराने जमिनीच्या मगदुरानुसार द्याव्यात. लसणाचे गड्डे वाढत असताना पाण्याचा ताण पडू देऊ नये. लसूण लागवडीपासून पक्व होईपर्यंत सर्वसाधारणपणे 15-18 पाण्याच्या पाळ्या लागतात.

काढणी आणि उत्पादन

लागवडीनंतर सुमारे पाच महिन्यांतच लसूण काढणीस तयार होतो. काढणीस तयार होण्याच्या वेळी पाने पिवळी पडून सुकू लागतात. लसूण काढणीस तयार झाल्यावर गड्ड्याच्या मनोजवळील पातीत बारीक गाठ तयार होते. याला लसणी फुटणे असे म्हणतात.
15-20 टक्के लसणी फुटल्यावर पाणी देणे स्थगित करावे आणि 10-12 दिवसांनी लहानशा कुदळीने किंवा हाताने गड्डे उपटून काढावेत आणि पातीसह 4-5 दिवस सुकवून नंतर त्याच्या जुड्या बांधाव्यात आणि अशा जुड्या हवेशीर ठिकाणी बांबूवर किंवा दोरावर टांगून ठेवाव्यात. योग्य लागवड पद्धतींचा अवलंब केल्यास आणि सुधारित जातींचा वापर केल्यास लसणाचे हेक्टरी सरासरी 9 ते 10 टनापर्यंत उत्पादन मिळू शकते.

– अनिल विद्याधर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news