लवंगी मिरची : सलाम

लवंगी मिरची : सलाम

वेगळी काही बातमी असली की, बरोबर आपले लक्ष वेधले जाते, हो की नाही मित्रा? हे बघ हे. काल घडलेला पुणे येथील एक आगळावेगळा सोहळा. हा खराखुरा कर्तव्यपूर्तीचा सोहळा म्हणता येईल. खरं तर अशा सोहळ्यांच्या बातम्या या वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर छापल्या पाहिजेत.

अरे, काय सांगतोस काय? असा कुठला सोहळा आहे, सांग तरी सविस्तर

पोलिस म्हटले की, सर्वसामान्य जनतेच्या चेहर्‍यावर निराशा असते; पण इथे पुणे पोलिसांनी काल दरोडे, भुरट्या चोर्‍या आणि तत्सम प्रकारांमध्ये नागरिकांचा गहाळ झालेला मूल्यवान ऐवज त्यांना परत केला. तब्बल साडेपाच कोटी रुपयांचे दागिने, वस्तू आणि पोलिसांच्या भाषेत सांगायचे म्हणजे मुद्देमाल एकूण 58 व्यक्तींना परत करण्यात आला आणि हे सर्व समारंभपूर्वक करण्यात आले. मग मला सांग ही बातमी पहिल्या पानावर असायला हवी की नको?

बरोबर आहे, तू म्हणतोस ते. एखाद्या कुटुंबाच्या घरी चोरी झाली किंवा एखाद्याचे पाकीट मारले गेले किंवा घराबाहेर पडल्यानंतर कोणा स्त्रीचे गंठण चोरट्यांनी हिसकावून नेले, असा काही प्रकार घडला; तर नागरिकांच्या प्रतिक्रिया वेगळ्याच असतात. पहिली प्रतिक्रिया ती म्हणजे पोलिसांना कोणत्या भागात कोणता गुन्हा घडणार आहे, याची आधीच माहिती असते. साफ चूक. अनुभवावरून सांगतो की, असा काही प्रकार नसतो. पोलिस आपल्या कर्तव्यासाठी जागरूक असतात. परंतु, वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे बदलते स्वरूप पाहता ते सर्वत्र पोहोचू शकत नाहीत आणि मग गुन्हा घडल्यानंतर साहजिकच त्याच्या तपासाला वेळ लागतो आणि त्यामुळे नागरिकांच्या मनात पोलिसांची नकारात्मक इमेज तयार होते.

शिवाय, बरेचदा पोलिसांचा वापर विनोदासाठी होतो. चित्रपटांमध्येही पोलिस विनोदी असतात आणि खरेखुरे गंभीर पोलिस सर्वकाही संपल्यानंतर प्रवेश करतात. तुला गंमत सांगतो मला आठवते की, दमा मिरासदारांच्या प्रसिद्ध अशा माझी चोरी या कथेमधील इन्स्पेक्टर चोरी झाल्यानंतर पुढील तीन-चार वर्षे त्यांची भेट झाल्यानंतर एकच प्रश्न विचारतो, काय सापडला का चोर? येथे त्यांनी लिहून ठेवले आहे की, जो प्रश्न मी त्यांना विचारायला पाहिजे होता, तोच प्रश्न पोलिस मला विचारत होते आणि विचारत होते की, सापडला का चोर? मला सामान्य नागरिकाला तो कसा सापडणार आणि तो शोधण्याची जबाबदारी तुमची असताना ते सोडून देऊन तुम्ही मलाच प्रश्न विचारत आहात, अशी काहीशी विनोदी परिस्थिती वर्णन केलेली आहे.

चोरी झाल्यानंतर नागरिकांची दुसरी धारणा असते ती म्हणजे, जरी समजा मुद्देमाल सापडला तरी तो आपल्यापर्यंत येण्याची शक्यता शून्य टक्के आहे. हा प्रचंड अविश्वास गेली वर्षानुवर्षे अत्यंत विश्वासाने जपला जात आहे. एक तर चोरीचा तपास लागणार नाही. दुसरे म्हणजे चोरीचा तपास लागला, तरी मुद्देमाल सापडणार नाही.

-झटका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news