लवंगी मिरची : बॅनर युग

लवंगी मिरची : बॅनर युग

सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे असे म्हटले जाते. आपल्या महाराष्ट्र किंवा आसपासच्या कर्नाटक, गोवा आणि एकंदरीतच देशाबद्दल बोलायचे तर सध्याचे युग हे बॅनरचे युग आहे. घरातून बाहेर पडल्याबरोबर बॅनर दिसायला सुरुवात होते ती घरी परतेपर्यंत. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांपासून ते गावगन्ना पुढार्‍यांपर्यंत आणि कोपर्‍यावरील पंक्चर काढणार्‍या पोरापर्यंत कुणाचेही बॅनर असू शकते. अगदी कुत्र्या-मांजरांचे वाढदिवससुद्धा मोठमोठे बॅनर लावून साजरे केले जातात.

डाव्या किंवा उजव्या कोपर्‍यात प्रसन्न हसर्‍या चेहर्‍याचे प्रमुख नेतृत्व असते. त्याच्या विरुद्ध बाजूला स्थानिक नेतृत्व असते आणि खाली गोलाकारात ज्यांनी हा खर्च केला आहे त्यांचे फोटो असतात. कधी कधी कार्यकर्त्यांची संख्या जास्त असेल तर मोठी माळ किंवा गुच्छ असतो. संख्या वाढली तर फोटोचा आकार लहान होतो आणि कोणते डोके कोणाचे आहे हे ओळखू येईनासे होते , म्हणून मग त्या त्या फोटो खाली नावे टाकली जातात. बॅनरवर झळकणे आजकाल फार सोपे झाले आहे. येता जाता बॅनरवर लोकांना दर्शन देऊन नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका लढण्याची तयारी करता येते. वार्डातला आचरट आणि वाया गेलेला पोरगा एका रात्रीत स्टार होतो तो बॅनरमुळे. त्याची पोहोच किती आहे हे बॅनरमुळे समजते.

बॅनरवर झळकल्यानंतर कार्यकर्ते उगाच ताठ मानेने चालताना आणि रुंद स्मितहास्य करताना दिसतात. खंबीर नेतृत्व किंवा आमचे प्रेरणास्थान या शब्दाखाली ज्यांचे नाव असते असे प्रेरणास्थान खांदे पाडून चालणारे कसे असेल? मोठ्या नेत्यांचे फोटो मात्र चालतानाचे, हात उंचावून अभिवादन करतानाचे असतात. थोडक्यात, म्हणजे पूर्णाकृती असतात. पूर्णाकृती फोटो दाखवून शिवाय चालताना दाखवून नेतृत्व अजून तरुण आहे हे सूचित करायचे असते. तसेही राजकारणात पन्नाशीपर्यंत युवा नेतृत्व म्हटले जाते, पुढे सत्तरीपर्यंत खंबीर किंवा परिपक्व नेतृत्व असते आणि त्यापुढे ज्येष्ठ नेतृत्व असते.

बॅनरसाठी फोटो टाकताना वय वर्षे 15 ते 90 काहीही असू शकते, त्यासाठी कोणतेही बंधन नाही. फक्त झळकण्याचा सोस असावा लागतो. बर्‍याचदा अचानक एके सकाळी नवे बॅनर दिसते आणि एक नवीन नेतृत्व आपल्या गल्लीमध्ये उदयाला आल्याची जाणीव होते. आपले लाडके नेतृत्व स्वतःच्या घरी तरी लाडके असेल का, याची शंका मनात येते; पण मग ती प्रत्यक्ष बोलून दाखवली तर गावात फिरणे अवघड होईल. प्रेरणास्थान पाच-पन्नास लोकांना तरी प्रेरणा देत असेल का? मार्गदर्शक आंधळ्यांना मार्ग दाखवितात की डोळसांना? यातील अनेक युवा नेतृत्वांचे पुढे काय होते ? असे अनेक प्रश्न या बॅनर युगाने निर्माण केले आहेत त्यांची उत्तरे देणारे बॅनर कोणी लावील का?

माहिती तंत्रज्ञानाच्या काळात डिजिटल बॅनरचे फॅड वाढले आहे. अगदी कमी दरात हे बॅनर उपलब्ध होत असल्याने सर्वत्र त्याचा सुळसुळाट पाहायला मिळत असतो. विशेषतः गावाची यात्रा असो अथवा एखाद्याचा वाढदिवस! या बॅनरची गर्दी ठरलेली असते. त्यातही अलीकडेच मंडळांची नावेही हटके असतात, त्यावरूनही वेगवगळी शीर्षके खूपच प्रचलित झाली आहे. अगदी वेगळ्या शैलीत ही शीर्षके तशी मजेदार आणि वाचनीय असतात. काही वेळा विचार करायला लावतात. कारण, त्याची कल्पनाच विचार करण्यापलीकडची असतात. आता या बॅनरवर सरकारची काही बंधने आल्याने त्याचे प्रमाण जरा कमी झाले असले तरी बॅनरचे फॅड तरुणाईमध्ये आहेच. कोण विचार विचारतोय बघूया, असा शड्डू ठोकून काही जण आपल्यातील डॅशिंगपणा दाखवण्यास सज्ज असतात. तसे आपली छबी बॅनरवर आली की काही अडचण नसते हे मात्र विशेष असते.

– झटका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news