लता मंगेशकर : कोल्हापूरशी अतुट नाते

लता मंगेशकर : कोल्हापूरशी अतुट नाते
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर 1942 साली लता मंगेशकर आपल्या कुटुंबीयांसमवेत कोल्हापुरात आल्या. मास्टर विनायक यांच्या 'प्रफुल्‍ल पिक्चर्स'मध्ये त्यांना काम मिळाले होते. मिळेल ते काम करून त्यांनी माई व आपल्या भावंडांचा सांभाळ केला. कोल्हापूरने त्या काळी आपलेसे केल्यानेच संगीत क्षेत्रात मी यशस्वी वाटचाल करू शकलो, असे लता मंगेशकर यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात आवर्जून सांगितले.

कोल्हापुरात आल्यानंतर सुरुवातीला बाबुराव पेंटर यांच्या घराशेजारील एका घरामध्ये त्यांनी भाड्याने राहण्याचा निर्णय घेतला. पण या घराचे भाडे 15 रुपये महिना होते. कोल्हापुरात आल्यानंतर 15 रुपये भाडे देणे परवडणारे नसल्याने लता मंगेशकर यांनी दुसर्‍या खोलीचा शोध सुरू केला. नंतर त्यांनी मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरशेजारी कारेकरांच्या इमारतीत राहण्याचा निर्णय घेतला. कारण या घराचे भाडे देणे त्यांना परवडणारे होते. ते होते दहा रुपये.

मास्टर विनायक यांनी लता मंगेशकर यांना शालिनी स्टुडिओमध्ये चित्रीकरणादरम्यान पडेल ती कामे करण्याची अट घातली होती. यासाठी त्यांना 25 रुपये महिना पगार मिळत होता. याचवेळी आशा, मीना व उषा यांना त्यांनी शाळेत शिक्षणासाठी घातले होते. पण नंतर शाळेची फी न भरल्याने या सर्वांची नावे शाळेतून कमी करण्यात आली. आजही त्या शाळेकडे याची नोंद आहे.

कोल्हापुरातून मंबईत गेल्यानंतरही त्यांची कोल्हापूरशी नाळ काही तुटली नाही. जयप्रभा स्टुडिओवर असलेले बँकेचे कर्ज भागवणे भालजी पेंढारकर यांना शक्य नव्हते. तेव्हा भालजी पेंढारकर यांनी कोणा तरी परप्रांतीयाने हा स्टुडिओ घेण्यापेक्षा लता तूच हा स्टुडिओ घे, मी तो चालवण्याची जबाबदारी घेतो, असे सांगितले.

स्टुडिओची कामे पूर्ववत सुरू झाली, चित्रीकरण सुरू झाले. पण कामगारांचे पगार व अन्य देणी भागवताना पेंढारकर यांची दमछाक सुरू झाली. तेव्हा त्यांनी पुन्हा लता मंगेशकर यांना पन्हाळा येथील बंगला तुझ्या नावावर करतो, असे सांगून कामगारांची देणी भागविली.

चित्रपटातील गायनाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कोल्हापुरातील खासबाग मैदानात 1967 साली लता मंगेशकर यांचा सत्कार करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्‍त वि. स. खांडेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापुरातील विविध सामाजिक व सांस्कृतिक संघटनांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्‍न झाला.

1978 साली कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियमच्या मदतीसाठी संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्वत: लता मंगेशकर, उषा मंगेशकर, नितीन मुकेश, विनय मांडके, अनिल मोहिले यांनी आपली कला सादर केली. 2000 साली कोल्हापूर महोत्सवात लता मंगेशकर उपस्थित होत्या. पहिला कोल्हापूर भूषण पुरस्कार त्यांना जाहीर झाला. इथून पुढे या पुरस्काराची सुरवात झाली.

आठवणीतल्या दीदी….

भटकंती

लता मंगेशकर कोल्हापुरात आल्या तेव्हा विनायकरावांचे प्रॉडक्शन मॅनेजर त्यांना आणण्यासाठी गेले होते. त्या टांग्यातून त्यांच्यासाठी जी जागा शोधली होती तेथे गेल्या. मात्र ती जागा पसंत नसल्याने अन्य सात-आठ घरे पाहून शेवटी फिरंगाई तलावाच्या नजीक कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या बंगल्याशेजारी बापूराव मेस्त्री यांच्या घरात त्यांनी वास्तव्य केले. याच घरासमोर आज कोल्हापुरातील चित्रपट निर्मितीचे स्मारक म्हणून कॅमेर्‍याची उभारणी करण्यात आली आहे. याच्या आठवणी लता मंगेशकर यांनी फार छान लिहिल्या आहेत.

बग्गीतून प्रवास

लता मंगेशकर कोल्हापुरात आल्या ती तारीख होती 30 डिसेंबर 1942. 29 तारखेला त्या पुण्याहून कोल्हापूरला रेल्वेने आल्या. दुसर्‍या दिवशी त्या चित्रपट पाहण्यासाठी गेल्या होत्या. रात्री 12 वाजता पडद्यावर 42 साल संपले अशी स्लाईड झळकली. त्यावेळी 'माझं बाळ' या चित्रपटाचं शालिनी स्टुडिओत चित्रीकरण सुरू होतं. त्यावेळी लता मंगेशकर यांना न्यायला खास बग्गीची व्यवस्था करण्यात आली होती

सायकलवरून रपेट

लतादीदींना स्टुडिओत नेण्यासाठी बग्गी असे. त्यांना मात्र सायकलने स्टुडिओत जायला आवडत असे. त्यावेळी लता मंगेशकर या पायजमा आणि शर्ट असा पेहराव करीत. भाड्याच्या दुकानातून सायकल घेऊन ती घेऊन त्या स्टुडिओत जात असत. वेगाने सायकल चालविणे हा त्यांचा छंद होता.

खिमा आणि बिल

लता मंगेशकर यांना खिमा फार आवडत असे. शालिनी स्टुडिओत असलेल्या कॅन्टीनमध्ये त्या सकाळी गेल्याबरोबर नाष्ट्याला किंवा दुपारच्या जेवणात हमखासपणे खिमा मागवून खात असत. कंपनीच्या 80 रुपयेच्या पगारातून खिम्याच्या 10 रुपये वजा केले जात.

दोन आण्याचे चॉकलेट

लतादीदी यांना चॉकलेटची खूप आवड. मात्र, चॉकलेट खूप महाग असत. तेव्हाही त्या दोन आण्याची नेसल्सची लाल चॉकलेट त्या आणत.

भाजलेल्या चिंचांची चटणी

स्टुडिओत रिकाम्यावेळी चिंचा आणि बोरे पाडून खायची असा त्यांचा छंद होता. झाडावर चढूनही त्या चिंचा आणि बोरे काढत. एवढे नव्हे तर आसपासचे गवत गोळा करून ते पेटवून त्यावर चिंचा भाजायच्या आणि त्याची आंबटगोड चटणी खायची असा छंद त्यांना लागला होता.

टांगा आणि चित्रपट

त्या काळी दिनकर या नावाचा एक टांगेवाला कोल्हापुरात होता. तो मंगेशकर भावंडांना त्यांच्या कुटुंबावरील प्रेमापोटी टांग्यातून फुकट फिरवत असे तर पद्मा थिएटरच्या बाजूला बळीराम यांचे आईस्क्रीम व सोडालेमनचे दुकान होते. तोही या भावंडांना कौतुकाने आईस्क्रीम खायला देत. त्या काळी कोल्हापुरातील राजाराम, प्रभात, रॉयल, पद्मा या थिएटरमध्ये चित्रपट पाहिल्याच्या अनेक आठवणी लता मंगेशकर सांगत असत.

कोल्हापुरातून मुक्‍काम हलविला

कुटुंबाची जबाबदारी, वाढत्या आर्थिक गरजा यामुळे विनायकराव यांनी दिलेली 200 रुपये असा पगार स्वीकारून त्यांनी मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि कोल्हापुरातील मुक्‍काम मुंबईला हलविला.

शिक्षण न घेतल्याची खंत

लता मंगेशकर यांच्या बहिणी आशा, मीना व उषा या विद्यापीठ हायस्कूलमध्ये शिकत असत. त्यांनी शिकावे असे लता मंगेशकर यांना वाटत असे. त्यातूनच त्यांनी आपल्या या बहिणींना 'मी शिकले नाही, पण तुम्ही शिका. ग्रॅज्युएट व्हा', असे सांगत ग्रॅज्युएट होणे ही माझ्या दृष्टीने शिक्षणातली एक पायरी होती, असे लतादीदी आवर्जून सांगत.

स्वाभिमानी दीदी

वडिलांच्या निधनानंतर त्यांचे काका महिना त्यांना तीस रुपये पाठवत. मात्र तीन-चार महिन्यांतच लता मंगेशकर यांनी नवयुगशी करार केला. हा करार होताच त्यांनी काकांकडून पैसे घेणे बंद केले.

…अन् मंगेशकर कुटुंबीयांचा वास्तव्याचा प्रश्‍न लागला मार्गी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : लहान वयातच मंगेशकर कुटुंबीय कोल्हापुरात आले. सुरुवातीच्या काळात मंगेशकर कुटुंबीयांचा वास्तव्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यावेळी शिवाजी पेठेचे वस्ताद आणि पहिले ऑलिंपिकवीर पै. दिनकरराव शिंदे यांनी हा प्रश्न मार्गी लावला. यामुळे मंगेशकर कुटुंबीय आणि शिंदे कुटुंबीयांचा घरोबा तयार झाला.

लतादीदी, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर ही बहीण-भावंडं कोल्हापूरला आल्यानंतर शिंदे यांच्या घरातच राहायचे. आजही शिवाजी पेठेतल्या उभा मारुती चौकात दिनकरराव शिंदे यांचे घर अगदी 'जैसे थे' आहे. दिनकरराव शिंदे यांची आई आनंदीबाई यांनी या मंगेशकर भावंडांचा सांभाळ आपल्या मुलांप्रमाणेच केला होता. शिंदे यांचे घर मंगेशकर भावंडांसाठी हक्‍काचे घर असायचे.

दिनकरराव शिंदे यांनी धाकटे बंधू माधवराव शिंदे यांना सुरुवातीला राजाराम महाराजांच्या इच्छेनुसार जॉकी करण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यात फारसे रमले नाहीत. यामुळे मग मास्टर विनायक यांच्या लॅबमध्ये काम करता करता माधवराव मराठी चित्रपटसृष्टीतील एक ख्यातनाम दिग्दर्शक झाले. माधवराव आणि लतादीदी यांनी एकत्र येऊन चित्रपट सृष्टीमधील आपली वाटचाल सुरू केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news