‘रिलायन्स’चे उपाध्यक्ष ते विरक्त जैन साधू….

‘रिलायन्स’चे उपाध्यक्ष ते विरक्त जैन साधू….

नवी दिल्ली : कितीही भौतिक प्रगती केली, तरी सर्व काही अशाश्वत आहे, याची जाणीव अनेकांना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर होत असते आणि मग शाश्वताची ओढ लागते. त्यामधून आलेल्या विरक्तीमधून प्राचीन काळी राजे-महाराजांनी राज्य सोडले व अर्वाचीन काळातही अनेक धनकुबेरांनी आपल्या संपत्तीचा, घरादाराचा त्याग करून सन्यस्त जीवन पत्करले.

रिलायन्स इंडस्ट्रीत वेगवेगळी पदे भूषवलेले आणि निवृत्तीपूर्वी कंपनीचे उपाध्यक्ष बनलेले प्रकाशभाई शाह यापैकीच एक. 40 वर्षांपूर्वी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये आयआयटी बॉम्बेमधून पदव्युत्तर पदवी संपादन केलेल्या प्रकाशभाई शाह यांनी 2021 मध्ये महावीर जयंतीच्या पवित्र दिवशी जैन धर्मातील वैराग्याच्या मार्गावरील दीक्षा घेतली. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी नैना शाह यांनीही दीक्षा घेतली.

प्रकाशभाई शाह यांनी रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये दीर्घ करिअर घडवले. विशेषतः रिलायन्सच्या जामनगर पेटकोक गॅसिफिकेशन प्रोजेक्टमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे वार्षिक वेतन 75 कोटी रुपये होते. त्यांच्या पत्नी कॉमर्स विषयातील पदवीधर आहेत. निवृत्त होताच प्रकाश यांनी भौतिक जगतातील मायामोहाचा त्याग करून दीक्षा घेण्याचे ठरवले; मात्र 'कोव्हिड-19' महामारीमुळे त्यांना दीक्षा घेण्यास एक वर्षाचा विलंब झाला. 2021 च्या महावीर जयंतीला दीक्षा घेऊन त्यांनी सर्व भौतिक सुखांचा त्याग केला.

आता ते केवळ पायीच प्रवास करतात आणि भिक्षेतील अन्नाचे सेवन करतात. विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबातील दीक्षा घेणारे हे दोघेच नाहीत. या दाम्पत्याला दोन मुले असून त्यापैकी एका मुलग्याने आठ वर्षांपूर्वीच दीक्षा घेतलेली आहे. तोसुद्धा आयआयटी बॉम्बेचा अभियांत्रिकी पदवीधर आहे. दुसर्‍या मुलाचा विवाह झाला असून त्याला एक अपत्य आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news