हिंदूंचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. विजयादशमी म्हणजेच दसर्याला दशानन रावणाचा वध करून दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीराम, देवी सीता आणि लक्ष्मण अयोध्येला पुष्पक विमानातून परत आले व त्यादिवशी अयोध्यावासीयांनी दीपोत्सव साजरा करून त्यांचे स्वागत केले असे मानले जाते. श्रीरामाचे आद्य चरित्र त्यांचे समकालीन असलेल्या महर्षी वाल्मिकी यांनी लिहिले व आपल्याच आश्रमात जन्मलेल्या आणि वाढलेल्या श्रीरामपुत्र लव आणि कुश यांनाच ते सर्वप्रथम शिकवले. रामायणाची ख्याती भारतात तर आहेच; पण प्राचीन काळातील बृहदभारतात व त्याच्याही सीमा ओलांडून सर्वत्र पसरलेली आहे. विविध देशांमधील रामायणाची लोकप्रियता दर्शवणारी ही माहिती…
थायलंडमध्ये रामायणाला 'रामकियन' असे म्हटले जाते. हा थायलंडचा राष्ट्रीय ग्रंथही आहे. प्राचीन काळी थायलंडच्या राजधानीलाही 'अयुत्या' असे म्हटले जाते. हे नाव 'अयोध्या'चा अपभ्रंश असून श्रीरामाच्या अयोध्येवरूनच हे नाव ठेवलेले होते. थायलंडचे राजेही स्वतःला श्रीरामाचे वंशज मानत असत. थायलंडच्या अंतिम शासक वंशाला 'राम' असेच नाव आहे. अनेक प्राचीन थायी राजांचे नाव 'राम' असे होते. या देशात आजही रामायणावर आधारित नृत्यनाटिका होत असते.
म्यानमार किंवा पूर्वीच्या ब्रह्मदेशातही रामायण लोकप्रिय आहे. तिथे रामायणाला 'यमयान' असे म्हटले जाते. ते म्यानमारचे अनौपचारिकपणे राष्ट्रीय महाकाव्य आहे. त्याला यम (राम) जत्दाव (जातक) असेही म्हटले जाते. म्यानमार मध्ये रामाला 'यम' आणि सीतेला 'मी थीडा' अशीही नावे आहेत. मूळ नावातील अपभ्रंशामुळे व स्थानिक भाषेच्या प्रभावाने असे होत असते.
या देशात 'रिमकर' किंवा 'रामकरती' या नावाने रामकथा प्रसिद्ध आहे. 'रामकरती' म्हणजे 'रामकिर्ती'. श्रीरामाच्या रूपाने चांगल्या गोष्टींची वाईटावर कशी मात होते हे यामधून सांगण्यात आले आहे. श्रीरामाची धवल किर्ती, महिमा यामधून सांगण्यात आला आहे.
या देशात 'हिकायत सेरी राम' या नावाने रामायण प्रसिद्ध आहे. त्याचे कथानक मूळ रामायणा प्रमाणेच असले तरी स्थानिक भाषेच्या प्रभावामुळे काही नावांचे उच्चार, शब्द वेगळे आहेत.
इंडोनेशियात रामायणावर आधारित 'केचक' हे वानरांचे नृत्य अतिशय लोकप्रिय आहे. रामायण आणि महाभारताला तेथे आजही अतिशय लोकप्रियता आहे. इंडोनेशियाच्या जावा बेटावर 'काकाविन रामायण' लोकप्रिय आहे. हे मूळ रामायणाचे जावनीज रूप आहे.