राज्यात 9.34 कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन; कोल्हापूर विभाग आघाडीवर

राज्यात 9.34 कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन; कोल्हापूर विभाग आघाडीवर

सातारा : महेंद्र खंदारे : राज्यात यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाच्या हंगामात बंद पडलेले कारखाने सुरू झाल्याने शिल्लक उसाचा प्रश्न यंदा जाणवला नाही. यंदा 204 कारखान्यांनी 9 कोटी 33 लाख 55 हजार टन उसाचे गाळप करून 9 कोटी 34 लाख 35 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उत्पादनात कोल्हापरू, सोलापूर आणि पुणे विभाग आघाडीवर आहे. राज्याचा उतारा 10 टक्क्यावर आला आहे.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्यात गळीत हंगामाला प्रारंभ झाला. याच कालावधीत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला होता. मात्र, त्यानंतर आजपर्यंत हा हंगाम सुरळीत सुरू आहे. यंदा कारखान्यांना उस तोड टोळ्यांची समस्या जाणवत असली तरी बंद पडलेले कारखाने यंदा चालू झाल्याने उसाचा प्रश्न गंभीर बनला नाही.

या हंगामात राज्यातील 102 सहकारी साखर कारखान्यांनी 24 फेब्रुवारीपर्यंत 4 कोटी 95 लाख 34 हजार 699 टन उसाचे गाळप करून 5 कोटी 11 लाख 74 हजार 860 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर 102 खासगी कारखान्यांनी 4 कोटी 36 लाख, 8 हजार 297 टन उसाचे गाळप करून 4 कोटी 22 लाख 55 हजार 444 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सहकारी कारखान्यांचा सरासरी उतारा हा 10.33 तर खासगी कारखान्यांचा उतारा 9.69 टक्के पडला आहे.

यंदा कोल्हापूर विभागातील 36 कारखान्यांनी 2 कोटी 24 लाख 14 हजार टन उसाचे गाळप करून 2 कोटी 44 लाख 19 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सोलापूर विभागातील 49 कारखान्यांनी 2 कोटी 12 लाख 42 हजार टन उसाचे गाळप करून 1 कोटी 99 लाख 77 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पुणे विभागातील 31 कारखान्यांनी 1 कोटी 96 लाख63 हजार टन उसाचे गाळप करून 1 कोटी 95 लाख 1 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. अहमदनगर विभागातील 27 कारखान्यांनी 1 कोटी 18 लाख 13 हजार टन उसाचे गाळप करून 1 कोटी 12 लाख 27 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. औरंगाबाद विभागातील 25 कारखान्यांनी 89 लाख38 हजार टन उसाचे गाळप करून 82 लाख 23 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. नांदेड विभागातील 29 कारखान्यांनी 91 लाख 22 हजार टन उसाचे गाळप करून 90 लाख 55 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. नागपूर विभागातील 7 कारखान्यांनी 11 लाख 54 हजार टन उसाचे गाळप करून 9 लाख 88 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

साडेपाच लाख क्विंटल कमी उत्पादन

गतवर्षी 196 कारखान्यांनी गाळप केले होते तर यंदा हाच आकडा 204 वर गेला. राज्यात गतवर्षी याच तारखेपर्यंत 9 कोटी 17 लाख 79 हजार टन उसाचे गाळप करून 9 कोटी 39 लाख 94 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. यंदाच्या हंगामात त्या तुलने यावर्षी तब्बल 16 लाख 24 हजार क्विंटल उसाचे गाळप जास्त झाले आहे. मात्र, साखर उत्पादनात आश्चर्यकारक 5 लाख 59 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. गतवर्षी याचवेळी 10.24 टक्के उतारा होता तो आता 10.1 टक्के आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news