राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला दगाफटका!

महाविकास आघाडी
महाविकास आघाडी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देणारी जवळपास सात मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचे संख्याबळ आणि पाठिंबा देणार्‍या अपक्ष आणि छोट्या पक्षांची आमदार संख्या पाहता महाविकास आघाडीला किमान पहिल्या पसंतीची 168 मते मिळणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात 161 मते मिळाल्याचे स्पष्ट झाल्याने शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे डावपेच, शिवसेनेचा उमेदवार असल्याने नेते शरद पवार यांनी केलेला कानाडोळा आणि शिवसेना नेत्यांचा अतिआत्मविश्वास यामुळे शिवसेनेला हा पराभवाचा धक्का बसल्याचे सांगितले जाते. यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण झाला आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात आखाडा रंगला होता. शुक्रवारी मतदान संपल्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर मध्यरात्री मतमोजणी होऊन निकाल लागला. या निकालात धनंजय महाडिक यांचा सनसनाटी विजय घडवून आणण्याचा चमत्कार करून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चितपट केले.

संजय पवार यांना पहिल्या पसंतीची फक्त 33 मते मिळाल्याने महाविकास आघाडीची मते फुटल्याचे स्पष्ट झाले. महाविकास आघाडीने विश्वासमत जिंकले तेव्हा महाविकास आघाडीच्या बाजूने 170 आमदार होते. त्यापैकी नवाब मलिक व अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे दोन आमदार सध्या तुरुंगात आहेत. त्यांना मतदान करण्याची परवानगी न्यायालयाने दिली नाही; तर शिवसेनेचे रमेश लटके यांचे निधन झाले. याशिवाय पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला. त्यामुळे 2019 च्या विश्वासदर्शक ठरावाच्या तुलनेत महाविकास आघाडीकडे 166 आमदारांचे संख्याबळ कागदावर दिसत होते. तर 2019 मध्ये तटस्थ राहिलेल्या एमआयएम व माकपने यावेळी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीला पहिल्या पसंतीची 169 मते मिळणे अपेक्षित होते. त्यात शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरवल्याने किमान 168 मते तरी मिळायला हवी होती. पण आघाडीला प्रत्यक्षात 161 मते मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडीची सात मते फुटल्याचे स्पष्ट झाले.

भाजपचे 106 आमदार आणि अपक्ष आमदार मिळून भाजपकडे 115 आमदारांचे पाठबळ होते. राज्यसभा निवडणुकीत मनसेच्या राजू पाटील यांनी मत दिल्याने भाजपला 116 आमदारांचे मतदान होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात अनिल बोंडे व पीयूष गोयल यांना प्रत्येकी 48 व धनंजय महाडिक यांना 27 अशी एकूण 123 मते मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडीची 7 मते फुटली. ही फुटलेली मते बहुजन विकास आघाडी आणि अपक्षांची आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केल्याने या निवडणुकीवरून महाविकास आघाडी आता ब्लेम गेम सुरू झाला आहे. बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी शेवटपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मन वळविण्यात यश मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. आम्ही मतदान करू तो पक्ष विजय होईल, असे संकेत ठाकूर यांनी दिले होते. तर काही अपक्षांनाही त्यांनी खेचल्याने सेनेला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

असे झाले मतदान…

अनेकांना प्रश्न पडला होता की, भाजपने पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांना 48 मते का दिली? भाजपचा तिसरा उमेदवार पहिल्या फेरीत निवडून येईल इतकी हक्काची मते असतील याची खात्री नव्हती. म्हणून भिस्त दुसर्‍या फेरीवर होती. ऋळीीीं ढीरपीषशीरलश्रश तेींशी पद्धतीत पहिल्या फेरीत सर्वात जास्त मते मिळविणार्‍या उमेदवाराची अतिरिक्त मते आधी अन्य उमेदवाराकडे वळवली जातात. म्हणून पहिल्या फेरीत भाजपने अशी संख्या निश्चित केली जिथपर्यंत मविआतील कोणताही एक पक्ष पोहोचू शकणे केवळ अशक्य होते. ती संख्या भाजपने 48 ठरवली आणि दोन्ही प्रथम पसंतीच्या उमेदवारांना तितकी मते दिली. ती अर्थातच सर्वाधिक होती. त्यांची अतिरिक्त मते आधी वळवली आणि तिथेच महाडिकांचा कोटा पूर्ण झाला. ते निवडून आले. संजय पवार बाद झाले. सीए इन्स्टिट्यूटच्या निवडणुकीत हीच पद्धत वापरली जाते. पीयूष गोयल सीए आहेत. देवेंद्र फडणवीस कायदेतज्ज्ञ आहेत आणि प्रभारी अश्विनी वैष्णव आय.ए.एस. आहेत. या तीन बुद्धिमंतांची ही खेळी उद्धव ठाकरे, संजय राऊत सोडाच, शरद पवारांच्याही कल्पनेपलीकडच्या बाहेरची होती. फडणवीसांनी पुन्हा एकदा पवारांवर मात केली आहे. काल रात्री फडणवीस आणि गोयल यांनी एकमेकांना ज्या पद्धतीने टाळी दिली, ती केवळ अविस्मरणीय होती.

पक्षांचे बलाबल

भाजप : डॉ. अनिल बोंडे 48 + पीयूष गोयल 48 + धनंजय महाडिक 27 = 123. स्वतःचे 106, 17 अपक्ष आणि इतरांची मते खेचली.

शिवसेना : संजय राऊत 41 + संजय पवार 33 = 74 (स्वतःचे 54 + अन्य 20 मते मिळाली)

राष्ट्रवादी : प्रफुल्ल पटेल 43 (आपली 51 मधून 8 मते सेनेला दिली)

काँग्रेस : 44 (सर्व मते घेतली. कोणालाही दिले नाही)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news