राजकीय : तामिळनाडूच्या राजकारणात ‘उदयनिधी’

राजकीय : तामिळनाडूच्या राजकारणात ‘उदयनिधी’

अक्षय शारदा शरद : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पुत्र उदयनिधी यांची मंत्रिमंडळात वर्णी लावलीय. उदयनिधी हे स्वतः तमिळ अभिनेता, दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक सिनेमांची निर्मितीही त्यांनी केलीय. करुणानिधी, स्टॅलिन यांच्यानंतर आता उदयनिधी द्रमुक पक्षाचा पुढचा चेहरा म्हणून पुढं येताहेत. त्यामुळे स्टॅलिन यांच्यावर विरोधक घराणेशाहीचा आरोप करताहेत.

दक्षिणेतल्या सिनेमांची आपल्याकडे खूप चर्चा होत असते. तिथल्या सिनेकलाकारांना लोक अक्षरशः डोक्यावर घेतात. दक्षिणेतला तमिळ सिनेमा जितका खास तितकंच तिथलं राजकारणही. इथल्या सिनेमांमधल्या कलाकारांनी राजकीय क्षेत्राला व्यापून टाकलंय. अगदी अण्णादुराई यांच्यापासून करुणानिधी, एमजीआर, जयललिता अशी दिग्गज नेते मंडळी इथल्या सिनेक्षेत्रानं भारतीय राजकारणाला दिली.

तामिळनाडूच्या राजकारणात सिनेअभिनेत्यांचा प्रवेश हा आता नवीन विषय राहिलेला नाही. मागच्या दोनेक वर्षांत सुपरस्टार रजनीकांत, कमल हसन यांनीही तामिळनाडूच्या राजकारणात आपलं बस्तान बसवायचा प्रयत्न केला. कमल हसन यांनी स्वतःचा पक्ष काढून निवडणुकाही लढवल्या; पण त्यांना फारसं यश आलं नाही. तामिळनाडूचे आताचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही राजकारणात यायच्या आधी तमिळी सिनेमांत काम केलं होतं.

आता त्यांनी पुत्र असलेल्या आमदार उदयनिधी यांची मंत्रिमंडळात वर्णी लावलीय. 45 वर्षांच्या उदयनिधी यांचा 14 डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडला. त्यांच्याकडे युवक कल्याण, क्रीडा अशा खात्यांची जबाबदारी देण्यात आलीय. त्यावरून विरोधक स्टॅलिन यांच्यावर 'फॅमिली पॉलिटिक्स'चा आरोप करताहेत.

उदयनिधी हे एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आहेत. त्यांनी स्वतः 'कुरुवी', 'आदवन', 'मन्मदन अंबू' अशा तमिळ सिनेमांची निर्मिती केलीय. तामिळनाडूतील सगळ्यात मोठी सिनेनिर्मिती आणि वितरण कंपनी असलेल्या रेड जायंट मूव्हीचे उदयनिधी मालक आहेत. त्यातून त्यांनी 'विन्नैतांडी वरूवाया', 'मद्रासपट्टीनम', 'बास इंगिरं बास्करन', 'मैना' अशा सिनेमांचं वितरणही केलंय. 'ओरू कल ओरू कन्नाडी', 'इदं कदिरवेलन कादल', 'नन्बेंदा' असे त्यांनी अभिनय केलेले हलकेफुलके कॉमेडी सिनेमे होते. यातल्या 2012 ला आलेल्या 'ओरू कल ओरू कन्नाडी' या सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. 2015 नंतर उदयनिधी प्रामुख्याने राजकीय स्वरूपाच्या सिनेमांकडे वळल्याचं दिसतं. त्यांचे याचवर्षी आलेले 'कलगा तलैवन' आणि 'आर्टिकल 15' या हिंदी सिनेमांचा तमिळ रिमेक असलेला 'नेंजूक्कू नीती' हे सिनेमे पूर्णपणे राजकीय भूमिका मांडणारे आहेत.

पा. रंजित, मारी सेल्वराज या दिग्दर्शकांचे तमिळी सिनेमांमधून जात-वर्ग, वर्चस्ववाद याविषयीचं थेट भाष्य येतं. तोच धागा कुठंतरी उदयनिधी यांच्याही सिनेमांमध्ये पाहायला मिळतो. सिनेमा हे राजकीय संदेश देणारं एक उत्तम माध्यम म्हणून पुढे आणण्याचं काम तमिळ सिनेमांनी केलं. महत्त्वाचं म्हणजे उदयनिधी 'मुरासोली' हे द्रमुक पक्षाचं मुखपत्रही चालवतात.

2019 ला उदयनिधी यांच्याकडे द्रमुकच्या तामिळनाडू युवक आघाडीचं सचिवपद आलं. हाच त्यांचा पक्षीय राजकारणातला प्रवेश होता. अगदी सहजपणे उदयनिधी या पदावर आल्याचा आक्षेपही त्यांच्यावर घेण्यात आला होता. याच काळात उदयनिधी यांनी लोकसभा निवडणुकांदरम्यान स्टॅलिन यांच्यासोबत पक्षाचा आक्रमकपणे प्रचार केला होता. स्वतः राज्यभर दौरेही केले होते.

2021 ला विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात त्यांनी थेट भाजपच्या नेत्यांना आव्हान दिलं होतं. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींनी उद्घाटन केलेल्या हॉस्पिटलची वीट घेऊन हात उंचावतानाचा त्यांचा फिल्मी स्टाईल फोटो तुफान व्हायरल झाला होता. असं म्हणतात की, त्यामुळे निवडणुकीचं वारं फिरलं. 2021 ला उदयनिधी यांनी स्वतः विधानसभेची निवडणूक चेपॉक-तिरुवल्लीकनी मतदारसंघातून लढवली आणि जिंकलीही.

खरं तर करुणानिधी यांच्या निधनानंतर द्रमुकचं नेतृत्व स्टॅलिन यांच्याकडे आलं होतं. उदयनिधी यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशामुळे पुन्हा एकदा या कनेक्शनची चर्चा होतेय. त्यावरून विरोधकांनी स्टॅलिन यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केलाय. करुणानिधी यांनी आपला राजकीय वारस म्हणून स्टॅलिन यांना पुढे आणायचा प्रयत्न केला, तेव्हाही त्यांच्यावर हाच आरोप करण्यात आला होता.

तामिळनाडूच्या राजकीय, सामाजिक चळवळीला तात्त्विक भूमिका देण्याचं श्रेय ई. वी. रामास्वामी अर्थात पेरियार यांच्याकडे जातं. काँग्रेसमधून आलेल्या आणि कट्टर गांधीवादी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पेरियार यांनी पुढं द्रविडी राष्ट्रवादाची मांडणी केली. त्यातून 'द्रविडनाडू' या दक्षिणेकडच्या राज्यांसाठी वेगळं राष्ट्र व्हावं ही मागणी त्यांनी लावून धरली. त्यांनी जस्टीस पार्टी नावाचा स्वतःचा पक्ष काढला. त्याचंच रूपांतर 1944 ला द्रविड कळघम या नावात झालं. अण्णादुराई लेखक, नाटककार म्हणून तमिळी जनतेत लोकप्रिय होते. त्यांनी अनेक सिनेमेही बनवले. त्यांनी सिनेमांमधून केलेलं राजकीय भाष्य चर्चेचा विषय ठरायचं. याच अण्णादुराई यांनी द्रविड कळघममध्ये प्रवेश केला; पण पुढे भारताला 1947 ला मिळालेल्या स्वातंत्र्यावरून पेरियार आणि अण्णादुराई यांच्यात मतभेद झाले.

तसेच पेरियार यांनी द्रविड कळघम पक्षाचा राजकीय वारस म्हणून आपल्या दुसर्‍या पत्नीची घोषणा केली होती. त्यामुळे अण्णादुराई आणि करुणानिधी असे मोठे नेते द्रविड कळघममधून बाहेर पडले. त्यांनी 1949 ला द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाची स्थापना केली. आज स्टॅलिन यांचा वारस म्हणून उदयनिधी यांच्या राजकारणातल्या प्रवेशामुळे तामिळनाडूचं राजकारण ढवळून निघालंय. अशावेळी इतिहासातला हा दाखला बराच बोलका आहे.

1967 च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकला मोठं यश मिळालं. अण्णादुराई यांच्याकडे तामिळनाडूचं मुख्यमंत्रिपद आलं. 1969 ला अण्णादुराई यांचं निधन झालं. त्यावेळी द्रमुकचं नेतृत्व आपसूकच करुणानिधी यांच्याकडं आलं. तामिळनाडूचं 5 वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या करुणानिधी यांची सुरुवात तमिळ सिनेमांमधून झाली होती. अण्णादुराई हेच त्यांचे राजकीय गुरू होते. करुणानिधी यांनी नाटक, सिनेमा, पुस्तकं, कादंबरी असं चौफेर लेखन केलं. सिनेमांचे संवाद लेखक म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

दरम्यान, 1940 नंतर तमिळ सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवलेले एम. जी. रामचंद्रन द्रमुकचे सदस्य झाले. याआधी काँग्रेसमधून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. द्रमुकमध्ये त्यांचं प्रस्थ वाढत होतं. सिनेक्षेत्रातल्या लोकप्रियतेमुळे त्यांचा जनाधारही वाढत होता. द्रमुकचा ताबा आपल्याकडे आल्यावर 1972 च्या दरम्यान करुणानिधी आपला मोठा मुलगा एम. के. मुत्तू यांना राजकीय वारस म्हणून पुढं आणायचा प्रयत्न करत होते. त्यावरून एमजीआर आणि करुणानिधी यांच्यात वादाची ठिणगी पडली.

1972 ला एमजीआर द्रमुकमधून बाहेर पडले. त्यांनी अण्णाद्रमुक या पक्षाची स्थापना केली. त्यांच्या पक्षाने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. त्यांनी अल्पावधीतच तामिळनाडूची सत्ता मिळवली. 1977 ते 1987 पर्यंत एमजीआर यांनी तामिळनाडूचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. यांच्या पश्चात अण्णाद्रमुकचं नेतृत्व त्यांच्यासोबत सिनेकारकिर्दीची सुरुवात केलेल्या आणि अभिनेत्री असलेल्या जयललिता यांच्याकडे आलं. अम्मा म्हणून राजकीय वलय मिळवलेल्या जयललिता तब्बल 5 वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी राहिल्या.

जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. अण्णाद्रमुकमध्येही दोन गट पडले. जयललिता यांच्यानंतर अण्णाद्रमुकचे नेते पलानीस्वामी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आलं; तर करुणानिधी यांच्या निधनानंतर द्रमुकचं नेतृत्व त्यांचे तिसरे पुत्र एम. के. स्टॅलिन यांच्याकडे आलं. 2021 ला त्यांच्याच नेतृत्वात तामिळनाडूमध्ये द्रमुकची सत्ता आली. स्टॅलिन मुख्यमंत्री झाले.

एम. के. मुत्तू यांचा सिनेक्षेत्राकडे, तर स्टॅलिन यांचा कल कायमच राजकारणाकडे राहिला. स्टॅलिन यांनी 'ओरे रत्तम', 'मक्कल आनायित्तल' अशा सिनेमात आणि मालिकांमध्येही काम केलं होतं; पण सिनेमा नाही तर राजकारण हेच आपलं कामाचं क्षेत्र असल्याचं त्यांना जाणवलं. त्यामुळे त्यांनी अभिनयाला कायमचा रामराम ठोकत पूर्णवेळ राजकारणी म्हणून 1984 ला प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. अगदी द्रमुकच्या स्थानिक पातळीवरच्या राजकारणापासून त्यांची सुरुवात झाली होती. आता आपला राजकीय वारस म्हणून स्टॅलिन यांनी आपल्या मुलाला सर्वांसमोर आणलंय. स्टॅलिन यांच्यावर घराणेशाहीचा आरोपही होतोय; पण हा आरोप त्यांच्यासाठी नवा नाही. करुणानिधी यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून स्टॅलिन यांना पुढं आणलं तेव्हाही त्यांच्या नावाला विरोध झाला होता. त्यावेळी द्रमुकमध्ये फूटही पडली. द्रमुकचे नेते वायको यांनी बाहेर पडत स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. इतकंच नाही, तर करुणानिधी यांचे द्वितीय पुत्र अळगिरी यांनीही उत्तराधिकारी म्हणून 2014 ला स्टॅलिन यांच्या नावाला विरोध केला होता.

करुणानिधी कुटुंब हे तामिळनाडूतल्या प्रभावशाली कुटुंबांपैकी एक. तीनवेळा केंद्रीय मंत्रिपद भूषवलेले आणि करुणानिधींच्या काळात द्रमुकच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले मुरासोली मारन हे करुणानिधींचे भाचे होते. त्यांचे पुत्र कलानिधी मारन यांनी दक्षिणेकडच्या आघाडीच्या मीडिया कंपनीपैकी एक असलेल्या 'सन ग्रुप'ची स्थापना केली. कलानिधी यांचे लहान भाऊ दयानिधी मारन हे सध्याच्या द्रमुकमधल्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक मानले जातात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news