मुस्लिमांच्या तोंडातून आपणास अनेकदा 'दीन और दुनिया' हा शब्दप्रयोग ऐकायला मिळतो. 'दीन' म्हणजे भक्ती व अध्यात्म आणि 'दुनिया' म्हणजे भौतिक व सांसारिक गोष्टी, असा सर्वसाधारण समज आहे; परंतु प्रत्यक्षात 'दीन और दुनिया' या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्या जीवनाचे नाणे खणखणीत वाजवायचे असेल तर दोन्ही गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत.
दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत. तुम्हाला या दुनियेत चांगले जगायचे असेल तर 'दीन'प्रमाणे आचरण करणे गरजेचे आहे. म्हणजेच 'दीन'साठी दुनिया आहे आणि दुनियासाठी 'दीन' आहे. एकाला सोडून दुसर्याला अर्थ उरत नाही. माणसाने व्यक्तिगत पुण्य कमावण्याच्या नादात अध्यात्मात इतके गर्क व्हावे की, दुनियेकडे बघण्याला आपल्याला वेळच नाही, असे इस्लामला मंजूर नाही. किंबहुना या दुनियेत आपण कसे आचरण केले? मानवाच्या कल्याणासाठी आपण काय केले? व कोणते सत्कर्म केले? यावर आपली योग्यायोग्यता व दर्जा ठरणार आहे.
इस्लामने जगाकडे पाहण्याचा व आचरण करण्याचा वेगळा दृष्टिकोन आपल्या अनुयायांना दिला आहे. एक भौतिकवादी दृष्टी दिलेली आहे. सगळ्याच गोष्टी परमेश्वरावर सोपवून आपल्याला निश्चिंत होता येत नाही. आपलेही काही कर्तव्य या दुनियेविषयी व मानवजातीविषयी आहेत. परमेश्वराने निश्चितपणे या जगात सृष्टी, संसार, साधनसुविधा निर्माण केल्या आहेत. मानवालाही त्याने विशेष देणग्या बहाल केल्या आहेत. याउपर माणसांच्या आयुष्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्यावरच आहे.
परमेश्वराच्या भक्तीतून निश्चितपणे आपल्याला एक आध्यात्मिक व नैतिक ऊर्जा मिळत असते; परंतु माणसाच्या कर्माला स्वतः माणूस जबाबदार आहे. शेवटी माणसाच्या कर्माचा लेखाजोखा होणार आहे. आणि यासाठी तो स्वतःच साक्षीदार होईल; दुसर्या कोणाची साक्ष व वशिला त्याच्या कामी येणार नाही.
भौतिकवादाचे खरे साधन ज्ञान व विज्ञान असते. तुमच्या बुद्धी व विवेकाचा वापर करून कोणत्याही गोष्टीचा तार्किक विचार व कारणमीमांसा करणे हा भौतिकवादाचा पाया आहे. इस्लामचा आधारभूत ग्रंथ 'कुराण'ची सुरुवातच ज्ञान आणि विज्ञानाची महिमा सांगत झालेली आहे. 'सुर ए कलम' किंवा 'इकरा' या अध्यायात ज्ञान, विज्ञान व लेखणीचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे. 'कुराण'मध्ये सातत्याने तुमच्या बुद्धी, विवेक आणि विचाराला आव्हान दिले आहे. यासाठी 'कुराण'मध्ये सातत्याने एक प्रश्न विचारला आहे तो म्हणजे, तुम्ही मुके, बहिरे, आंधळे आहात काय? तुम्हाला बुद्धी व विवेक दिला आहे. विचारांची क्षमता दिली आहे. त्यामुळे ज्ञानाच्या मार्गात पडणारे प्रत्येक पाऊल हे परमेश्वराच्या मार्गातीलच पाऊल आहे, अशी इस्लामची धारणा आहे. कोणत्याही परिस्थितीत ज्ञान आत्मसात करा, अशी शिकवण इस्लाम देतो.
दीनदुबळ्या, वंचित, पीडित, शोषित यांच्यासाठी सेवाभाव आपल्या अंगी असायला हवा. अन्याय-अत्याचाराविरोधात लढण्याची तयारीच नव्हे तर आपले कर्तव्य समजले पाहिजे. स्वतःचा चरितार्थ प्रामाणिक कष्ट व मेहनतीने सांभाळा. कष्टकरी, राबणार्यांच्या जीवनातील प्रत्येक पाऊल हे परमेश्वराच्या मार्गातील उपासनाच होय. यातूनच जकातची अनिवार्य आर्थिक जबाबदारी उचला. दानधर्म करा. आई-वडील, वृद्ध, आजारी यांची सेवा करा. सत्कर्म, त्याग, सेवा, समर्पण हे एखाद्या दानधर्मासारखेच आहे. आपले तन-मन-धन अर्पण करून इस्लामच्या मानव कल्याणच्या मार्गात सहभागी व्हा.
पैगंबरांचे स्वतःचे भौतिक जीवन व आचरण आपल्यासमोर एक आदर्श आहे. त्यांनी एकच एक परमेश्वराची भक्ती, अध्यात्म तर केलेच; पण संपूर्ण मानवजातीचे दुःख नष्ट करून त्यांना सन्मान, शांती, समता, बंधुता, सुरक्षितता व विकासाचा मार्ग इस्लामच्या माध्यमातून दाखविला. संकटकाळी निव्वळ भक्ती व अध्यात्मात डोके खुपसून बसले नाहीत. जीवितकार्यासाठी यथाशक्ती व युक्तीने प्रयत्न केले. संकटांना धैर्याने तोंड दिले; प्रसंगी घोड्यावर ठाण मांडून 'मैदान-ए-जंग'मध्ये उतरले.
या सगळ्या गोष्टींचा मथितार्थ समजला तर इस्लामच्या 'दीन और दुनिया'चा अर्थ सापडेल. इस्लाम आपणास भौतिक व सांसारिक दुनियेमध्ये जीवन जगण्याचे, जीवन संघर्षाला भिडण्याचे तत्त्वज्ञान शिकवतो. सत्कर्म, सदाचार, सद्व्यवहार, परोपकार, दयाभाव तसेच मानव व समाजकल्याणासाठी केलेला त्याग, सेवा, समर्पण या सर्व गोष्टी म्हणजे एकप्रकारे परमेश्वराची भक्ती व उपासनाच होय. आणि हाच दुनियेचा 'दीन' होय.
– शफीक देसाई