रत्नागिरी-रायगड जोडणार अवघ्या दीड मिनिटात .. 441 कोटींचा प्रकल्प

रत्नागिरी-रायगड जोडणार अवघ्या दीड मिनिटात .. 441 कोटींचा प्रकल्प
Published on
Updated on

चिपळूण;  पुढारी वृत्तसेवा :  मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून येत्या मार्च अखेरपर्यंत बोगद्याची एक लेन वाहतुकीसाठी खुली होणार आहे. सद्य:स्थितीत बोगद्याचे जोड रस्ते आणि अंतर्गत रस्त्याचे काम शिल्लक असून, अल्पावधीत हे काम पूर्ण करून मुंबईकर चाकरमान्यांना कशेडी बोगदा या वर्षीच्या उन्हाळ्यात खुला होईल. यामुळे कशेडी घाट अवघ्या 45 मिनिटांत पार होईल तर रत्नागिरी रायगड जिल्ह्याशी अवघ्या दीड मिनिटात जोडला जाईल. तब्बल 441 कोटी रुपयांचा हा प्रकल्प मुंबई-गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून रत्नागिरी जिल्ह्यासह चाकरमान्यांना मुंबई अधिक जवळ येणार आहे.

                              मलेशियन तंत्रज्ञानाने तयार होणारा पूल

मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेला कशेडी बोगदा होय. चौपदरीकरणाच्या कामांतर्गत या बोगद्याचे काम 2019 मध्ये सुरू झाले. आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून, जोड रस्त्यावरील सर्व पूल, खोदकाम आणि बोगदे पूर्ण झाले आहेत. फक्त जोड रस्ते व अंतर्गत रस्ते करून बोगद्याच्या आतील काम करणे शिल्लक आहे. त्यामुळे येत्या मार्चअखेर कशेडी बोगद्याची एक लेन वाहतुकीसाठी खुली होणार आहे. या बोगद्याच्या उद्घाटनाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

कशेडी घाटाला पर्याय म्हणून रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून दोन बोगदे खोदण्यात आले आहेत. दोन्ही बोगद्यांचे काम दोन्ही बाजूने पूर्ण झाले असून केवळ अंतर्गत काही कामे शिल्लक आहेत तर बोगद्याला जोड रस्ते आणि अंतर्गत रस्ते झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. दोन्ही बोगदे मनुष्यबळाचा वापर न करता बूमर मशिनने खोदण्यात आले आहेत. बोगद्याच्या अंतर्गत काँक्रिटीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून उर्वरित कामे मार्गी लागणार आहेत. दोन किलोमीटरचे दोन बोगदे तयार झाले असून, प्रत्येक बोगदा तीन लेन्स आहे. या शिवाय अपघातकालीन परिस्थितीत एका बोगद्यातून दुसर्‍या बोगद्यात जाण्यासाठी सहा मार्ग तयार करण्यात आले आहेत. तसेच बोगद्यात एखादे वाहन बंद पडल्यास त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी चार ठिकाणी अधिकच्या जागा तयार करण्यात आल्या आहेत.

हा बोगदा वाहतुकीत खुला झाल्यानंतर 80 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने चालविता येऊ शकतात.जो कशेडी घाट पार करण्यासाठी दीड ते पावणेदोन तास लागतात. त्याऐवजी अवघ्या 45 मिनिटात हा घाट पार होणार आहे.
कशेडी बोगद्याला जोडणारे रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम अजूनही सुरू झालेले नाही. मात्र, या दरम्यानचे पाच मोठे पूल, दहा मोर्‍या यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे काँक्रिटचा रस्ता उर्वरित कालावधीत पूर्ण करणे सहजशक्य आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणा कामाला लागली आहे.

बोगद्यात अद्ययावत यंत्रणा

हा बोगदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आला असून बूमर मशीनच्या सहाय्याने खोदण्यात आला आहे. बोगदा खोदण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे कोणतीही दुर्घटना न घडता बोगद्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. एका बोगद्यात एका वेळी तीन वाहने तीन लेनमधून जाऊ शकणार आहेत. तसेच वायुविजनासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. बोगद्यात अपघात झाल्यास तत्काळ संपर्क होण्यासाठी 'एसओएस' यंत्रणाही उभारण्यात येणार आहे. बोगद्यात जागोजागी फायर फायटिंग यंत्रणा असेल. अंतर्गत पाण्याचे वहन करण्यासाठी ड्रेनेज यंत्रणा, एका बोगद्यातून दुसर्‍या बोगद्यात जाण्यासाठी सहा ठिकाणी जोडमार्ग, विजेची व्यवस्था, अपघात झाल्यास चार ठिकाणी जादा स्पेस आहे. अशा अद्ययावत तंत्रज्ञानाने हा बोगदा तयार होणार आहे.

इंधन व वेळ आणि पैसाही वाचणार

कशेडी घाट हा मुंबई-गोवा महामार्गातील एक खडतर घाट म्हणून ओळखला जातो. दरवर्षी या घाटात अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. तसेच वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. मात्र, आता कशेडी बोगद्यामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्हा अवघ्या दीड मिनिटात जोडला जाणार आहे. कशेडी ते भोगाव हे सद्य:स्थितीतील अंतर 13 किलोमीटरपर्यंत आहे. बोगद्यामुळे चार किलोमीटरने अंतर कमी होणार असले तरी प्रत्यक्षात लहान वाहनांसाठी 45 मिनिटे तर मोठ्या वाहनांसाठी एक ते दीड तासाचा वेळ वाचणार आहे. तसेच कशेडी घाटातील अवघड वळणे, चढ न लागता सरळ मार्ग उपलब्ध होणार असून यामुळे वाहन चालकांचा वेळ, इंधन आणि पैशाची बचत देखील होणार आहे.

मलेशियन तंत्रज्ञानाने दोन पूल

कशेडी बोगद्याकडे जाणार्‍या जोड रस्त्यांमध्ये दोन पूल हे मलेशियन तंत्रज्ञानाने उभारले जात आहेत. या पुलाच्या गर्डरसाठी यु. एच. पी. एफ. आर. सी. हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे गर्डर तयार करून ते पिलरवर बसविले जाणार आहेत. हे दोन्ही पूल अवघ्या एक महिन्यात तयार होऊ शकतात. मलेशिया येथील तंत्रज्ञान पुणे येथे एका पुलासाठी वापरण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यामध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी पुढाकार घेतला. आता चौपदरीकरणाच्या कामात दोन पूल मलेशियन तंत्रज्ञानाने उभारले जाणार आहेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news