येथे जखमा कोरून मिळतील!

येथे जखमा कोरून मिळतील!

बाबा, मी आज शाळेत जात नाही.
पायाला जखम झालीये. जाम दुखतंय, आई ग!
बघू, किती रक्त आलंय. हे काय रे? इथे तर काहीच रक्तासारखं दिसत नाही.
रक्त आलेलं बाबा, शप्पथ! सॉल्लीड लालेलाल रक्त आलेलं; पण ते खाऊन पुसलं ना मी. म्हणून आता दिसणार नाही.
काय रे? काल आपलं लाल शाईचं बॉलपेन पाण्याच्या ग्लासात बुडवून ठेवलेलं पाहिलं मी. त्याचं झालेलं लाल पाणी हे म्हणजे रक्त असं म्हणायचंय का तुला?

ऑसं कॉय करतॉ बाबॉ? अशॉने मी तुमच्यॉशी कट्टी करेन हं!
खुशाल कर कट्टी; पण असल्या फुसक्या कारणाने शाळा बुडवायची नाही. जायचं म्हणजे जायचंच.
शाळेत जाणं, व्यायामाचा तास यात जखमेतलं रक्त भळाभळा वाहायला लागलं तर? इतर मुलांच्या बाकांवर, वह्या पुस्तकांवर रक्ताचे डाग पडणार नाहीत का बाबा?

तुला काय बंदुकीची गोळी लागलीये की काय? न थांबता रक्त वाहत राहायला?
अरेरे! तुम्हाला जराही सहानुभूती नाही ना बाबा? अगदी स्वतःच्या मुलाविषयीसुद्धा सहानुभूती नाही? तुमच्यावर संस्कार करण्यात मी इतका कमी कसा पडलो बाबा?
ए नौटंक्या, उगाच शेंड्या लावू नकोस. एवढी खोल जखम असती, तर एकदा पुसून रक्त थांबलं असतं का रे?
मग मी काय भोसकून घ्यायला हवं होतं? रक्ताच्या चिळकांड्या वाहावायला हव्या होत्या?
छे रे! एवढं तुला कुठून झेपणार? मुलखाचा भेदरट आणि रड्या आहेस तू!

असं बोलून बोलून तुम्ही माझं काय ते खच्चीकरण का हनन काय असतं ते करताय बाबा!
अरे ए, मनोधैर्याचं खच्चीकरण आणि चारित्र्य हनन म्हणायचंय का तुला?
असेल तसंच काहीतरी. मला ते वर्डस् जरा डिफिकल्ट गेले म्हणून फंबल मारला गेला माझ्या तोंडून. बाकी एखाद्याच्या जखमेवरच थेट संशय घेणं, ती खेळातली, कृत्रिम आहे असं म्हणणं हे किती भयंकर आहे बाबा? अशाने माणूस खवळणारच ना? आतून ढवळून निघणारच ना?

ते खवळलेत? आतून किंवा कुठूनही थोडेही ढवळल्यासारखे वाटताहेत? असल्या जीवघेण्या संशयाचा बाकी काही परिणाम झालेला दिसतोय त्यांच्यावर? नाही ना? मग, तुलाच काय धाड झालीये लेका?
माझ्यावर माझे बाबाच संशय घेतात म्हटल्यावर माझी अशी अवस्था होऊच शकते ना बाबा?
काय आपलं? काय परकं? स्वामिनिष्ठा बाळगल्यावर होईल मनासारखं. हे कधी विसरू नकोस. अर्थात, तुझ्या हातून त्यांच्यासारखा उचापत्या कामांना ऊत आला नाही, तरी एका क्षेत्रात तुझं भविष्य मला उज्ज्वल दिसतंय.
कोणत्या बाबा?

अंगावर जखमांची चित्रं, खुणा वगैरे हुबेहूब काढून देण्यात. लाल, निळं पेन, हळद-कुंकू वगैरे घरगुती साहित्य वापरून चांगला इफेक्ट आणलायस तू जखमेचा. तुझं हे कौशल्य अगोदर माझ्या लक्षात आलं नव्हतं; पण याचा चांगला उपयोग करून घेता येईल तुला पुढच्या काळात.
सिनेमा, नाटकांसाठी?
नाय रे, राजकारण्यांसाठी. माणसांची गर्दी, धक्काबुक्की, किरकोळ जखमा, इजा हे वाढतच जाणार त्या क्षेत्रात. अशावेळी छानशा जखमा कोरून द्यायला कोणी ना कोणी लागणारच. मी तर म्हणतो, मंत्रालयासमोर पाटी लावून बसलास तरी पोट भरशील. सरळ म्हणायचं, 'येथे जखमा कोरून मिळतील.'

– झटका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news