थेट ऑस्ट्रेलियातून- उदय बिनीवाले
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या युनायटेड कप टेनिस स्पर्धेतील उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. उपांत्य फेरीतील सामने आता सुरू झाले असून जगातील बलाढ्य खेळाडू एकमेकांसमोर आव्हान देऊन उभे ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
उपांत्य फेरीतील पोलंड वि. अमेरिका आणि ग्रीस वि. इटली अशा लढती सुरू आहेत. अव्वल मानांकित खेळाडू पोलंडची इगा स्विआटेक हिला पहिल्या सामन्यात अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने 1 तास 11 मिनिटांत 6-2, 6-2 असे लोळविल्याने सिडनी ऑलिम्पिक पार्कच्या केन रोजवाल टेनिस स्टेडियममध्ये सनसनाटी निर्माण झाली. पराभवानंतर स्वाभाविकच इगा स्विआटेक प्रचंड निराश झाली; परंतु तिला अश्रू अनावर झाल्याचे स्पष्ट दिसून आले.
पाठोपाठ अमेरिकेच्याच फ्रॅन्सिस टीएफोने पोलंडच्या कॅकपर ज्यूकला 1 तास 20 मिनिटांत 6-3, 6-3 चितपट करून आपल्या संघाला पोलंड विरुद्ध आज 2-0 अशी आघाडी मिळवून दिली आहे. सामन्यानंतर क्रीडा समीक्षकांशी बोलताना विजयी जेसिका म्हणाली, 'आजची स्थिती वेगळी होती. वेगवान खेळ झाला. त्याचा मी फायदा घेतला.'
इगा म्हणाली, 'जेसिकाने सर्वोत्तम खेळ केला. तिचे पूर्ण नियंत्रण होते. मी काहीच करू शकत नव्हते. कोणत्याही वेळी मला पुनरागमन करता आले नाही. हताश आणि निराश झाल्याने अश्रू आवरता आले नसल्याचे तिने स्पष्ट केले.
दुसरा उपांत्य सामन्यात इटलीच्या मार्टिना ट्रेविसनने तृतीय मानांकित ग्रीस खेळाडू मारिया सक्कारीला टक्कर देऊन 6-3, 6-7, 7-5 असा विजय नोंदवून आघाडी मिळवून दिली. अंतिम लढत कोणात होईल हे चित्र आज स्पष्ट होईल.
उदय बिनीवाले