म्हैसाळ हत्याकांड प्रकरण : म्हैसाळचा पोलिस पाटील अखेर बडतर्फ

म्हैसाळ हत्याकांड प्रकरण : म्हैसाळचा पोलिस पाटील अखेर बडतर्फ

मिरज ; पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबियांच्या मृत्यू प्रकरणात संशयित असणार्‍या म्हैसाळचा पोलिस पाटील महादेव वसंत सपकाळ याला प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी पोलिस पाटील सेवेतून बडतर्फ केले. असा आदेश त्यांनी मंगळवारी जारी केला.

याबाबत माहिती अशी की, गुप्तधनाच्या हव्यासातून डॉ. माणिक वनमोरे आणि निवृत्त शिक्षक पोपट वनमोरे यांनी मांत्रिक आब्बास बागवान याला लाखो रुपये दिले होते. ते पैसे त्यांनी गावातील सावकार व ओळखीतील लोकांकडून कर्जरूपाने घेऊन दिले होते. वनमोरे यांनी पोलिस पाटील सपकाळ याच्याकडून देखील कर्जरूपाने पैसे घेतले होते.

दरम्यान, गेल्या चार-पाच वर्षापासून गावात गुप्तधनाचा शोध घेणे, अंधश्रद्धा बाळगणे, मांत्रिकाच्या सल्ल्याने इतरांकडून पैसे घेऊन मांत्रिकाला देणे इत्यादी घटना घडत असताना व त्याची माहिती असताना देखील पोलिस पाटील सपकाळ याने ही माहिती पोलिस ठाणे किंवा तहसील कार्यालयाला दिली नव्हती. तसेच वनमोरे कुटुंबाकडे सापडलेल्या सावकारांच्या चिठ्ठीमध्ये सपकाळ यांचे देखील नाव होते.

पोलिसांनी त्यास अटक करण्यासाठी वैद्यकीय तपासणी केली असता त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे सपकाळ याला अटक करण्यात आली नव्हती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सपकाळ हा बेडरेस्टवर घेत होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news