म्हैसाळ हत्याकांड प्रकरण : मांत्रिकाची बहीण जैतुनबीला अखेर अटक

म्हैसाळ हत्याकांड प्रकरण : मांत्रिकाची बहीण जैतुनबीला अखेर अटक

मिरज; पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबांच्या हत्याकांडप्रकरणी मुख्य संशयित आब्बास बागवान याची बहीण जैतुनबी ऊर्फ जैतूबाई महंमदहनीफ बागवान (वय 60, रा. अमन अपार्टमेंट, मुस्लिम बादशा पेठ, सोलापूर) हिला पोलिसांनी अटक केली. तिला न्यायालयात हजर केले असता गुरुवार (दि. 11) पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मांत्रिक आब्बास बागवान याने म्हैसाळ येथील डॉ. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे यांना गुप्तधनाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले होते. लाखो रुपये देवून देखील वनमोरे कुटुंबीयांना गुप्तधन सापडले नव्हते. त्यामुळे वनमोरे यांनी मांत्रिक बागवान याच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता.

वनमोरे यांच्या तगाद्याला वैतागून बागवान याने गुप्तधन शोधण्यासाठी कुटुंबातील सर्वांना एकत्र जमण्यास सांगितले होते. त्यानंतर त्याने साथीदार धीरज सुरवसे याच्या मदतीने डॉ. माणिक वनमोरे, रेखा वनमोरे, आदित्य वनमोरे, प्रतिभा वनमोरे, पोपट वनमोरे, संगीता वनमोरे, शुभम वनमोरे, अर्चना वनमोरे आणि आक्काताई वनमोर या 9 जणांना विषारी द्रव्य पिण्यास देवून त्यांचे हत्याकांड केले होते. दि. 20 जून रोजी हा प्रकार उघडकीस आला होता.

हत्याकांडचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी बागवान आणि सुरवसे या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडे तपास करीत असताना बागवान याने वनमोरे यांच्याकडून उकळलेल्या रकमेपैकी काही रक्कम त्याची बहीण जैतुनबी हिच्या बँक खात्यावर घेतली असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. परंतु घटना घडल्यापासून फरारी असणार्‍या जैतुनबी हिला पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

जैतुनबी हिच्यावर मुख्य संखयित बागवान याला हत्याकांडमध्ये मदत करणे, सावकारी करणे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध, महाराष्ट्र नरबळी, अमानूष अनिष्ट प्रथा, जादूटोणा इत्यादी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जैतुनबी हिला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तिला दोन दिवस पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

चौकशी रकमेचा उलघडा होणार?

मांत्रिक बागवान आणि त्याची बहीण जैतुनबी बागवान या दोघांनी वनमोरे यांच्याकडून नेमकी किती रक्कम घेतली, याचा अंदाज अद्याप पोलिसांना आलेला नाही. पोलिस कोठडीत असताना देखील मांत्रिकाने तोंडाला कुलूप लावले होते. आता त्याच्या बहिणीला अटक करण्यात आली असून गुप्तधनाच्या हव्यासातून वनमोरे यांच्याकडून किती रक्कम घेतली, हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news