मोदींनी मने जिंकली

मोदींनी मने जिंकली
Published on
Updated on

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या तडाखेबंद भाषणाने विरोधकांची हवा तर काढून घेतलीच शिवाय विरोधकांचे आरोपही हवेत विरून गेले. उद्योगपती गौतम अदानी यांच्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या हिंडेनबर्ग अहवालामुळे संसदेचे अधिवेशन वादळी होणार याचे संकेत मिळाले होते. सुरुवातीच्या काळात गदारोळ झाला; परंतु नंतर चर्चेवर सहमती झाल्यानंतर विरोधकांनीही सरकारला चांगलेच धारेवर धरले. सगळ्यांचा रोख अदानी यांच्यावरच होता. कारण, तीच एक पंतप्रधानांना अडचणीत आणणारी प्रमुख गोष्ट असल्याचा त्यांचा समज होता. भारत जोडो यात्रेमुळे ताजेतवाने होऊन राजकारणाच्या रंगमंचावर अवतरलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणाकडे सगळ्यांचे लक्ष होते. त्यांनीही आपल्या चाहत्यांची आणि समर्थकांची अपेक्षापूर्ती करताना अदानी प्रकरणावरून पंतप्रधान मोदी यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. सरकारच्या प्रमुखांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात असताना सत्ताधारी बाकांवरून प्रतिवाद करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तटस्थ भूमिका घेतल्यामुळे फारशा व्यत्ययाशिवाय त्यांना भाषण पूर्ण करता आले.

उद्योगपती अदानी यांच्या संदर्भातील राहुल गाधी यांच्या आरोपांना पंतप्रधान काय उत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु, पंतप्रधान मोदी हे एवढे मुत्सद्दी राजकारणी आहेत की, ते सहजासहजी कुणाच्या सापळ्यात सापडत नाहीत. कोणत्या प्रश्नांची दखल घ्यायची आणि कोणत्या गोष्टी सोयीस्कर टाळायच्या याचे त्यांच्याइतके भान असलेला राजकारणी देशात अपवादानेच सापडेल. सरकारने गेल्या नऊ वर्षांत केलेल्या कामाची माहिती देत त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. दिवसाची सुरुवातच वेगळ्या प्रकारच्या चर्चेने होईल, याची त्यांनी व्यवस्था केली. पंतप्रधान सकाळी निळ्या रंगाचे जाकीट घालून संसदेत आले. त्यांचे दूरचित्रवाणीच्या पडद्यावर दर्शन होताच त्यांनी घातलेल्या जाकिटाची चर्चा सुरू झाली. सगळ्या वृत्त वाहिन्यांनी त्यांच्या जाकिटाच्या स्टोरी सुरू केल्या. डिजिटल माध्यमांनी त्यांच्या जाकिटाभोवती चर्चा सुरू ठेवली.

अदानींचे व्यवहार आणि त्यावरून मोदींवर झालेली चर्चा मागे पडून मोदींचे हे आकर्षक जाकीट चर्चेच्या केंद्रस्थानी आले. हे जाकीट प्लास्टिकपासून तयार करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हे जाकीट घातल्याचे सांगण्यात आले. प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करून ते तयार करण्यात आले असून सोमवारी बंगळुरू येथे झालेल्या इंडिया एनर्जी वीकच्या उद्घाटनावेळी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने त्यांना ते भेट दिले होते. त्यावर पंतप्रधान मोदी स्वत: काहीही बोलले नाहीत; मात्र एका जाकिटामुळे चर्चा वेगळ्या दिशेला वळल्याचे पाहायला मिळाले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या केंद्रस्थानी अर्थातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे भाषण होते. ते पूर्णपणे मोदी आणि अदानी संबंधांवरच केंद्रित होते. परंतु, त्याची साधी दखलसुद्धा न घेता त्यांनी राहुल गांधी यांचे आरोप बेदखल केले. अनेक संसद सदस्यांनी भाषणात आपापली आकडेवारी मांडली. काहींनी स्वतःचा तर्क मांडला. या भाषणांवरून कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आणि समज आहे, हे जनतेच्या लक्षात आलेच. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर टीका झाली ती अर्थात राहुल गांधी यांच्यावर! यूपीए सरकारच्या काळातील आर्थिक तसेच अन्य पातळ्यांवरील अनागोंदीचाही पंतप्रधान मोदी यांनी समाचार घेतला.

2004 ते 2014 हे भारताच्या इतिहासातील घोटाळ्यांचे दशक असल्याचा घणाघात करून त्यांनी या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. या दहा वर्षांत महागाई डबल डिजिट झाली. त्यामुळेच काही चांगले घडल्यावर या लोकांना नैराश्य येते. या लोकांनी बेरोजगारी दूर करण्याची आश्वासने दिली होती. त्यासाठी त्यांनी काहीच केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. यूपीएच्या दहा वर्षांच्या काळात काश्मीर ते कन्याकुमारी भारताच्या प्रत्येक कोपर्‍यात दहशतवादी हल्ले होत होते. हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. त्या दशकामध्येच भारताचा आवाज जागतिक मंचावर कमकुवत झाला, असे सांगून त्यांनी आज देशाच्या क्षमतेचा परिचय जगाला होतो आहे, तेव्हा यांना वाईट वाटत असल्याची टीका विरोधकांवर केली.

अनेक लोकोपयोगी योजनांचा लेखाजोखा मांडून त्यांनी आपल्या काळात स्त्रियांचा सन्मान वाढवण्यासाठी काम केल्याचे अभिमानाने सांगितले. मोदी यांचा आत्मविश्वास प्रचंड होताच, शिवाय त्यांचा प्रत्येक शब्द विरोधकांचा अचूक वेध घेत होता. अनेक देशांमधील संकटांचीही मोदी यांनी आठवण करून दिली. कुठे अन्नाचा प्रश्न आहे. कुठे महागाई आकाशाला भिडली आहे. अशा संकट काळातही आपला देश जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असल्याचे सांगून, जी-20 समुदायाचे अध्यक्षपद आपल्याला मिळाले हीदेखील देशासाठी गौरवाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

यूपीए काळातील भ—ष्टाचाराच्या मालिकेचा समाचार घेताना त्यांनी टूजी घोटाळा, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा यांची आठवण करून दिली. आज भारतात एक स्थिर सरकार आहे. अनेक वर्षांनी राजकीय गोंधळ नाही. राष्ट्रहिताचे निर्णय घेणारे सरकार सत्तेवर आहे. आपण लोकांचा विश्वास संपादन केला आहे, तो तुम्हाला तोडता येणार नाही, असे आव्हानही त्यांनी दिले. केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावरील टीकेला उत्तर देताना त्यांनी ईडीमुळेच विरोधकांना एका मंचावर येण्यास भाग पाडल्याची खिल्ली उडवली. एकूणच विरोधकांचा आपल्या खास शैलीत समाचार घेऊन पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांची मने जिंकली. आगामी लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना विरोधक आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून राजकीय पटलावर हे नवे चित्र रेखाटले जाते आहे, त्याची ही सुरुवात म्हणावी लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news