मेघालय मधील ‘या’ गावात जगातील सर्वाधिक पाऊस !

शिलाँग ः मेघालय मधील 'या' गावात जगातील सर्वाधिक पाऊस पडतो. ईशान्य भारतातील एक सुंदर राज्य म्हणजे मेघालय. 'मेघालय' या शब्दाचा अर्थच 'मेघांचे म्हणजेच ढगांचे घर' असा होतो.

पर्वतराजी, हिरवागार निसर्ग आणि खळाळते धबधबे-निर्झर हे मेघालयाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. केवळ निसर्गसौंदर्यासाठीच नव्हे तर पावसासाठीही हे राज्य देश-विदेशात प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात 'ओले ठिकाण' याच राज्यात आहे. हे ठिकाण म्हणजे मासिनराम. याठिकाणी जगातील सर्वाधिक सरासरी पर्जन्यमान आहे.

मेघालयातील खासी पर्वतराजीत 1491 मीटर उंचीवर वसलेले हे एक सुंदर गाव आहे. तिथे एका वर्षात सरासरी 11,872 मि.मी. म्हणजेच 467.4 इंच पाऊस पडतो. अशा पावसाची कल्पना आपण एका उदाहरणावरून समजून घेऊ शकतो.

इतक्या पावसामुळे ब—ाझीलच्या रिओ डी जनैरोमधील तीस मीटर उंचीच्या ख्राईस्ट पुतळ्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी भरू शकते. मेघालयातील या मासिनराम गावातील सरासरी पाऊस हा भारताच्या राष्ट्रीय सरासरीच्या म्हणजेच 1083 मि.मी.पेक्षा दहा पटीने अधिक आहे.

याच गावाजवळ असलेल्या चेरापुंजीला पूर्वी सर्वाधिक पावसाचे ठिकाण मानले जात असे. या गावाला स्थानिक लोक 'सोहरा' असे म्हणतात. चेरापुंजीचे नाव आजही गिनिज बुकमध्ये 'एका महिन्यात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण' म्हणून आहे. जुलै 1861 मध्ये चेरापुंजी येथे 9300 मि.मी. म्हणजेच 366 इंच पाऊस नोंदवला होता.

तसेच 1 ऑगस्ट 1860 ते 31 जुलै 1861 या काळात याठिकाणी 26,461 मि.मी. इतका विक्रमी पाऊस पडला होता. चेरापुंजीचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 11,777 मि.मी. आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news