मॅट्रिमोनियल साईटस्वर वाढले ‘मिस्टर नटवरलाल!’

मॅट्रिमोनियल साईटस्वर वाढले ‘मिस्टर नटवरलाल!’
Published on
Updated on

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : मॅट्रिमोनियल साईटस्च्या माध्यमातून लग्‍नाचे आमिष देऊन फसवणूक होण्याच्या घटना वाढल्या आहेत. ठाणे पोलिसांनी महिन्याच्या आत दोन गुन्हे उघड केले आहेत. त्यामुळे भावी जीवनसाथीच्या मुखवट्याआड फसवणूक करणारे भामटे महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करीत असल्याचे समोर येत आहे.

विशेष म्हणजे, हे भामटे विधवा, घटस्फोटित अथवा एकट्या राहणार्‍या महिलांना हेरतात. त्यानंतर आपण गर्भश्रीमंत आहोत. परदेशात मोठ्या पदावर असल्याचे भासवतात. विवाहेच्छुक महिलांशी संपर्क वाढवून त्यांची मोठी आर्थिक फसवणूक करतात. पोलिसांनी उघड केलेल्या गुन्ह्यात जवळपास अशीच पद्धत वापरली जात असल्याचे दिसून येते.

कल्याण येथे एका महिलेने जीवनसाथी या मॅट्रिमोनियल साईटवर प्रोफाईल बनवले होते. तिला एकाने आपण इस्रोमध्ये वरिष्ठ पदावर शास्त्रज्ञ असून, लग्‍न करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. ओळख वाढवून तिच्याकडून या ठगाने 14 लाख 36 हजार रुपये वेगवेगळ्या बँकांच्या खात्यात ट्रान्स्फर करायला लावले. पुन्हा 25 लाख रुपयांची मागणी केली. मात्र, तिला फसवणूक होत असल्याचा संशय आल्याने पोलिसांत तक्रार नोंदवली.

पोलिसांनी समांतर तपास करता तो आणखी एका मुलीस लग्‍नाचे आमिष दाखवून भेटण्यासाठी वाशी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यास सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता तो विवाहित असून, त्यास मुलगाही असल्याची माहिती मिळाली. या ठगाने आतापर्यंत तब्बल 14 महिला आणि मुलींची फसवणूक केल्याचे निष्पन्‍न झाले.

त्याच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. डिसेंबर 2021 महिन्यात अशाच स्वरूपाची घटना कापूरबावडी पोलिसांनी उघड केली होती. मॅट्रिमोनियल साईटस्वर फेक प्रोफाईल बनवून विधवा व घटस्फोटित महिलांना हेरून त्यांचे आर्थिक व लैंगिक शोषण करणार्‍या प्रजित जोगीश केजे ऊर्फ प्रजित तयल खलीद ऊर्फ प्रजित टिके (वय 44, रा. पुद्दुचेरी) या ठगाला अटक केली होती.

त्याने आतापर्यंत 26 महिलांची फसवणूक करून त्यांची 2 कोटी 58 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ढोकाळी येथे राहणार्‍या एका महिलेची वेबसाईटच्या माध्यमातून त्याने ओळख वाढवली. पॅरिस येथे स्वतःचे हॉटेल असल्याची बतावणी केली. ओळखीचा गैरफायदा घेत तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली.

काही दिवसांतनी पॅरिस येथील हॉटेल विकले असून, त्याची मोठी रक्‍कम आरबीआयमध्ये अडकली आहे. ती मिळवण्यासाठी पैशांची अत्यंत गरज आहे, माझी रक्‍कम मिळाली की दुप्पट पैसे देईन, अशी बतावणी केली. या ठगाने महिलेकडून तब्बल 16 लाख 86 हजार 999 रुपये इतकी रक्‍कम उकळली. मात्र, त्यानंतर या भामट्याने तक्रारदार महिलेशी संपर्क तोडला. पोलिसांनी तो ठाण्यात आला असता त्याच्या मुसक्या आवळल्या. अशा अनेक घटना घडत आहेत. मात्र, बदनामीच्या भीतीने अनेकजण तक्रार देत नाहीत.

* वेबसाईटच्या माध्यमातून ओळख आणि विश्‍वास संपादन केला जातो
* ओळखीचा गैरफायदा घेत शारीरिक आणि आर्थिक शोषण
* बदनामीच्या भीतीमुळे फसवणूक झालेले पुढे येत नाहीत
* मॅट्रिमोनियल साईटस्वर कडक बंधने; मात्र ती पाळली जात नाहीत
* संबंधित व्यक्‍तीची फसवणूक त्या

मॅट्रिमोनियल साईटस्च्या माध्यमातून झालेली असते. म्हणून अशा घटनेत जोपर्यंत संबंधित पोर्टल्स व वेबसाईटस् व्यवस्थापनालादेखील सहआरोपी करण्यात येत नाही; तोपर्यंत फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसणे अशक्य आहे.
– अ‍ॅड. प्रशांत माळी, सायबर कायदा तज्ज्ञ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news