मूतखडा होऊ नये यासाठी ‘हे’ करा घरगुती उपाय

मूतखडा होऊ नये यासाठी ‘हे’ करा घरगुती उपाय

मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणार्‍या कठीण पदार्थाला मूतखडा म्हटले जाते. लघवीत न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एकत्र जमा होतात, तेव्हा मूतखडा तयार होतो.

मूतखड्याचा आजार हा सामान्य मानला जातो आणि तो वयाची तिशी ओलांडलेल्या मंडळींना होऊ शकतो. पाणी किंवा पातळ पदार्थ कमी घेण्याने किंवा श्रम, व्यायाम, जुलाब या कारणांमुळे शरीरातील पाणी कमी झाल्याने मूतखडा होण्याचा धोका अधिक वाढतो.

लघवीचे प्रमाण कमी झाल्याने किंवा लघवीतील मूतखडा तयार करणार्‍या घटकांचे प्रमाण वाढल्याने मूतखडा तयार होतो. सामान्यपणे मूतखड्याची लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु, जेव्हा मूत्रमार्गात हालचाल होते आणि अचानक अडथळा निर्माण होतो तेव्हा वेदना सुरू होतात. या वेदना ज्या बाजूला मूतखडा असतो, त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होता. यांत जंतुसंसर्ग झाल्यास ताप आणि थंडी वाजून येते. रक्‍तातील आणि लघवीतील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने युरिक अ‍ॅसिडचे मूतखडे तयार होतात. त्यामुळे मूतखडा न होण्यासाठी काही घरगुती उपाय याठिकाणी सांगता येईल.

पाणी भरपूण पिणे : भरपूर पाणी पिणे हा मूतखडा न होण्यासाठी रामबाण उपाय सांगितला जातो. पाण्याशिवाय लिंबू सरबत, ज्यूस यासारख्या तरल पदार्थांचे सतत सेवन करणे गरजेचे आहे. तरच लघवीचा मार्ग सुरळीत राहू शकतो. जर पाण्याचे प्रमाण कमी राहिल्यास लघवी कमी होते आणि मूतखडा होेण्याची शक्यता बळावते. म्हणून जास्तीत जास्त पाणी पिण्याबाबत आपण आग्रही असावे.

संतुलित कॅल्शियम : मूतखड्याच्या भीतीपोटी अनेक जण कॅल्शियमयुक्‍त आहाराचे कमी सेवन करतात. मात्र, आहारात कॅल्शियमचे प्रमाण कमी राहिले तर मूतखडा होण्याचा धोका अधिक संभवतो. त्यामुळे कॅल्शियमचा समावेश करून हा धोका आपण कमी करू शकतो. याशिवाय अतिखारट आहार देखील मूतखडा होण्यासाठी हातभार लावतात. तज्ज्ञांच्या मते, जास्त मीठ हे लघवीतील कॅल्शियमला रोखते आणि ही बाब मूतखडा तयार होण्यास पोषक ठरते. लो फॅट मिल्क, लो फॅट चिज, लो फॅट युगार्ट हे आहार कॅल्शियमयुक्‍त मानले जातात आणि शरीराला पोषक ठरतात.

'क' जीवनसत्त्वांचे अतिसेवन टाळा : 'क' जीवनसत्त्वाच्या अतिआहारामुळे मूतखड्याचा आजार होण्याची शक्यता वाढते. 2013 मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार 'क' जीवनसत्त्वाच्या अति आहारामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता दुपटीने वाढते. विशेषत: पुरुषवर्गात. 'क' जीवनसत्त्वाच्या पूरक घटकांचा समावेश असलेल्या पदार्थांमुळे किडनी स्टोन होत असल्याचे आढळून आले आहे. तसेच धूम्रपान, मांसाहार, मद्यपान या कारणामुळे देखील किडनी स्टोन होतो. मांसाहाराचे प्रमाण संतुलित ठेवल्यास पोटातील जळजळ कमी राहते आणि पचनक्रियेत अडथळे येत नाही. अतिउष्ण पदार्थाचे सेवन करणेही टाळायला हवे. पोटाला शांत ठेवणार्‍या पदार्थांचा समावेश आहारात असावा, जेणेकरून मूतखडा होण्याची शक्यता कमी राहते.

डॉ. मनोज शिंगाडे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news