मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत बुधवारी 24 तासांत कोरोनाची तब्बल 15 हजार 166 रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेतील रुग्णसंख्येचा उच्चांक या रुग्णसंख्येने पार केला. परिणामी, मुंबईवर अत्यंत कडक निर्बंधांचे तथा मिनी लॉकडाऊनचे सावट निर्माण झाले आहे. ठाण्यातही बुधवारी 4 हजार 721 नवे कोरोना रुग्ण आढळले. राज्यात 26 हजार 538 नवे रुग्ण आढळले असून, यात सर्वाधिक 19 हजार 887 रुग्ण मुंबई, ठाण्याचेच आहेत.

20 हजारांवर रुग्णसंख्या पोहोचल्यावर मुंबईत किमान मिनी लॉकडाऊन लागू केला जाईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारीच जाहीर केले. लॉकडाऊनसाठी रुग्णसंख्येचीही अट मुंबई येत्या चोवीस तासांतच पूर्ण करण्याची चिन्हे आहेत. मुंबईत मंगळवारी 10,860 रुग्ण आढळले होते. त्याच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे 24 तासांत या 15,166 रुग्णांची भर पडली. परिणामी, मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 61 हजार 923 वर पोहचली आहे.

मुंबई शहर व उपनगरांत कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेपेक्षा तिसर्‍या लाटेत कोरोना रुग्ण वाढीचा दर वेगवान आहे. यात मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी, संसर्ग दर जास्त असल्यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रचंड वेगाने होणारा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य टीमसह विभाग कार्यालयातील कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत झाले आहेत.

ठाणे जिल्ह्यात 4 हजार 721 नवे कोरोना रुग्ण सापडले. दिवसभरात एका पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 622 वर गेला आहे. एकूण रुग्णसंख्या 5 लाख 87 हजार 997 वर पोहोचली आहे. सध्या 9950 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नवीन वर्षात पहिल्या पाच दिवसांत जिल्ह्यात 13 हजार 138 रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

राज्यात विशेषतः मुंबई, ठाणे, पुण्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. बुधवारी 26 हजार 538 नव्या रुग्णांची नोंद झाली. 5 हजार 331 रुग्णांना घरी सोडण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून वेगाने रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 87 हजारांवर पोहोचली आहे.

ओमायक्रॉनच्या 144 रुग्णांची भर

राज्यात ओमायक्रॉनबाधितांची संख्या 797 वर पोहोचली आहे, त्यातील 330 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान, राज्यात बुधवारी 144 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली. आजवर मुंबईत सर्वाधिक 508 रुग्ण आढळले आहेत. पुणे मनपा क्षेत्रात 78, पिंपरी-चिंचवडमध्ये 44, पुणे ग्रामीण 26, ठाण्यात 29, नवी मुंबई 10, पनवेल 17, कल्याण-डोंबिवली 7, सातारा 8, नागपूर 24, कोल्हापूर 10 असे विविध शहरांत ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत.

कॅम्पसचे नियम

महाविद्यालय, विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन सुरू करावी.
सर्व विद्यापीठे, वसतिगृहेही या कालावधीत बंद राहतील.
परदेशी विद्यार्थ्यांना योग्य ती दक्षता घेऊन वसतिगृहांत राहता येणार आहे.
विद्यापीठे तसेच कॉलेज विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण झाले नसल्यास ती माहिती जिल्हाधिकार्‍यांना देऊन नियोजन करावे.
पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कॉलेजमध्ये, विद्यापीठांमध्ये 50 टक्के उपस्थिती असेल. ही उपस्थिती चक्राकार पद्धतीने राबवणे अनिवार्य असेल.
50 टक्के उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ऑनलाईन अध्यापन सुरू राहणार.
हे सर्व नियम खासगी विद्यापीठे, शिक्षण संस्था, स्वायत्त महाविद्यालयांनाही लागू असणार.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news