मुंबई : साडेआठ लाखांचा अपहार करून भोंदूबाबांचे पलायन

मुंबई : साडेआठ लाखांचा अपहार करून भोंदूबाबांचे पलायन
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : घरात आत्म्यांचा वावर आहे. वेळीच पूजा आणि हवन केले नाही, तर घरात वाईट घटना घडण्याची शक्यता वर्तवून दोन भोंदूबाबा ज्योतिषांनी एका महिलेच्या घरात पूजा करण्याची बतावणी करून सुमारे साडेआठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि पूजेसाठी घेतलेले साडेबारा हजार रुपये घेऊन पलायन केल्याची धक्कादायक घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. हरिदर्शन आचार्य आणि नरेश ज्योतिषी अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध एमएचबी पोलिसांनी अपहार, फसवणुकीसह अंधश्रद्धा, अधोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तक्रारदार महिला पती आणि दोन मुलांसोबत बोरिवलीच्या आयसी कॉलनीत राहते. तिच्या पतीचा दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. या महिलेला अ‍ॅनेमियाचा त्रास असून तिच्यावर उपचार सुरू होते. त्यातच तिला रात्री विचित्र स्वप्ने पडत होते. या स्वप्नांमुळे तिची मानसिक अवस्था बिघडली होती. घरात कौटुंबिक समस्या वाढीस लागल्याचा समज झाल्याने त्यातून मार्ग काढण्यासाठी तिच्या पतीने जस्ट डायलवरुन काही नामांकित ज्योतिषांचा मोबाईल क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना हरिदर्शन आचार्यचा मोबाईल क्रमांक सापडला.

त्याला फोन करुन त्यांनी घरातील कौटुंबिक समस्या सांगून काहीतरी उपाययोजना करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने त्याच्या नरेश नावाच्या एका शिष्याला तिथे पाठवले होते. घरी आलेल्या नरेशने त्यांच्याकडून साडेपाच हजार रुपये पूजेसाठी घेतले. तसेच काम झाल्यानंतर त्यांना एक लाख रुपये द्यावे असे सांगितले. त्यांनीही त्यास होकार दिला. नरेशने त्यांच्या घरात एका आत्म्याचा वावर आहे.

कोणीतरी त्यांच्या घरी जादूटोणा केला आहे, त्यामुळे त्यांच्या घरी कौटुंबिक समस्या निर्माण झाल्याचे सांगून त्यांच्या घरी पूजा केली. मात्र, या पुजेमुळेही त्यांच्या घरातील दैनंदिन व्यवहारात काहीच फरक पडला नाही. त्यानंतर त्याने त्यांच्याकडे पुजेसाठी आणखी पैशांची मागणी केली. मात्र दुसर्‍यांदा पुजा करुनही काहीही फ रक न पडल्याने त्यातून त्याचे नरेशसोबत वाद झाले. यानंतर हरिदर्शनने आपण स्वतः त्यांच्या घरी येऊन सर्व समस्या दूर करतो असे सांगितले.

सप्टेंबर 2020 रोजी हरिदर्शन त्यांच्या घरी आला. त्यांच्या पतीसह मुलांच्या जिवाला धोका असल्याचे सांगून त्यांना घराबाहेर काढून घरातील साडेआठ लाखांचे दागिने एका रुमालात ठेवले. त्यानंतर त्या महिलेस एक पाण्याची बाटली दिली. ते पाणी तिने दररोज थोडेथोडे पिण्याचा सल्ला दिला. दागिन्यांचा अन्य रुमाल पेटीत ठेवा. ही पेटी पाच वर्षे खोलू नका, नाहीतर तिचा किंवा तिच्या पतीचा मृत्यू होईल असे सांगितले. त्यामुळे दीड वर्ष तिने पेटी उघडली नाही. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तिने पेटी उघडून दागिन्यांची पाहणी केली असता, त्यात दागिने नाही तर कोळसे सापडले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news