मुंबई ; पुढारी डेस्क : मुंबई तील मरिन ड्राईव्ह, हाजी अली, पश्चिम द्रुतगती महामार्ग, वांद्रे-वरळी सी-लिंक आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टसह किनार्यालगतच्या अनेक वास्तू, रस्ते, पूल व महत्त्वाची ठिकाणे 2050 पर्यंत समुद्रार्पण होतील, अशी संभाव्य धोक्याची घंटा आरएमएसआय या जागतिक जोखीम व्यवस्थापन संस्थेने नुकतीच वाजवली. मुंबईसह देशाच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवरील अनेक शहरांना समुद्राच्या वाढत्या पातळीचा मोठा धोका असल्याचा इशारा या संस्थेतील तज्ज्ञांनी एका अहवालातून दिला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संस्थेने भारतामधील समुद्र पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता काही महिन्यांपूर्वी वर्तवली होती. त्याचप्रमाणे, हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भागातील पाण्याची पातळी 300 मिलीमीटरने वाढेल, असा अंदाज केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात मांडला आहे.
आरएमएसआयमधील तज्ज्ञांनी किनारी पूर प्रतिमानाचा वापर करून संकलित केलेल्या माहितीच्या आधारावर किनारी भागाचे हाय रेझोल्यूशन डिजिटल मॉडेल तयार केले. या विश्लेषण-अभ्यासाचा अहवाल 'क्लायमेट चेंज 2021 : द फिजिकल सायन्स बेसिस' या नावाने नुकताच प्रकाशित करण्यात आला. 'नासा' म्हणते…
'कॉम्प्युटर सिम्युलेशन', उपग्रह आणि जमिनीवरील यंत्रणांकडून मिळवलेल्या महितीवरुन अमेरिकेच्या 'नासा' अंतराळ संशोधन संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात मुंबईसह 12 शहरांमधील सखल भाग पाण्याखाली जाण्याची भिती व्यक्त करण्यात आली होती.
चक्रीवादळे, पुराच्या धोक्यात वाढ
जागतिक तापमानात 1 अंश सेल्सिअसची वाढ झाल्याने चक्रीवादळे आणि अतिवृष्टीचा तडाखा बसू लागला आहे, याकडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे रॉक्सी मॅथ्यू कॉल लक्ष वेधतात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील चक्रीवादळांमध्ये चार दशकांत 52 टक्क्यांनी वाढ झाली. महापुराच्या घटना तिपटीने वाढल्या. जागतिक तापमानातील वाढ 2 अंश सेल्सिअसवर जाण्याची भितीही त्यांनी व्यक्त केली.