मुंबई : प्रस्थापितांना धक्के, तरुणाईला प्राधान्य

मुंबई : प्रस्थापितांना धक्के, तरुणाईला प्राधान्य

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून अनेक ठिकाणी प्रस्थापितांची सद्दी मतदारांनी संपुष्टात आणली आहे. नाशिक जिल्ह्यात माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्या येवला मतदारसंघात दारुण पराभव पत्करावा लागला आहे. भुजबळ यांना हा फार मोठा धक्का मानला जात आहे.

नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या 196 ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी (दि.20) हाती आले. यात माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्या येवला मतदारसंघात शिंदे गटाने धोबीपछाड दिली आहे. हा भुजबळ यांना जबरदस्त धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 63 ग्रामपंचायतींवर विजय मिळवत जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष ठरला. भाजपची 55 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता आली आहे. ठाकरे गट 28 जागा पटकावित तिसर्‍या स्थानी आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाने 22 ठिकाणी यश मिळवले आहे.

पुणे जिल्ह्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व : विरोधी पक्षनेते अजित पवारांंनी पुणे जिल्ह्यातील 221 पैकी 92 ग्रामपंचायती ताब्यात घेत गड राखला. पुणे जिल्ह्यात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील या दोन दादांमध्ये लढत होती. यात अजित दादांनी 221 पैकी 92 ग्रामपंचायती ताब्यात घेत गड राखला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी अनेक ठिकाणी स्वतः प्रचार केला असताना ही भाजपला 38 ठिकाणी विजय मिळवता आला आहे.

मराठवाड्यात प्रस्थापितांना धक्के : मराठवाड्यातील औरंगाबादसह जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांतील 1 हजार 976 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले आहेत. या निकालाबाबत सर्वच प्रमुख पक्षांनी दावे-प्रतिदावे केले असले तरी या निवडणुकीत भाजप, शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, राष्ट्रवादीला संमिश्र यश मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. बहुतांश ठिकाणी मतदारांनी प्रस्थापितांना धक्के देत तरुणांना संधी दिली. निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

औरंगाबादेत भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व : औरंगाबाद जिल्ह्यात निवडणुका घेण्यात आलेल्या 216 ग्रामपंचायतींत महाविकास आघाडीला मात देत भाजप-शिंदे गटाचे दीडशे सरपंच विजयी झाले तर शिवेसना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला 66 ग्रामपंचायती राखण्यात यश मिळाले. दरम्यान, कन्नड आणि वैजापूर, गंगापूर तालुक्यांत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सर्वाधिक सरपंच आमच्याच गटाचे निवडून आल्याचा दावा केला आहे.

विदर्भात भाजपला मोठे यश : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतींपैकी 98 ठिकाणी भाजपने यश मिळवले आहे. तसेच 90 ग्रामपंचायती काँग्रेसने काबीज केल्या आहेत. या निवडणुकीत शिंदे गटाला आठ ग्रामपंचायती मिळाल्या. उद्धव ठाकरे गटाला केवळ दोन ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात बावीस ग्रामपंचायती गेल्या आणि अपक्ष व इतरांनी सोळा ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. गडचिरोली जिल्ह्यात 25 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाने सत्ता प्रस्थापित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 5, तर काँग्रेस, आदिवासी विद्यार्थी संघ आणि अपक्षांनी प्रत्येकी 3 ग्रामपंचायतींवर विजय संपादन केला आहे.

जालन्यात दानवे गटाचे वर्चस्व : जालना जिल्ह्यात घेण्यात आलेल्या 266 ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आपले गड कायम राखल्याचे दावे केले आहेत. असे असले तरी अनेक ठिकाणी मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत तरुणांना संधी दिली. 30 वर्षांनंतर निवडणूक घेण्यात आलेल्या भोकरदन तालुक्यातील जवखेडा खुर्द ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे नेतृत्व कायम राहिले.

ही तर ग्रामीण जनतेकडून पसंतीची पावती : फडणवीस

भाजप आणि शिंदे गटाने या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याचे दिसत असून, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप या आमच्या युतीला दणदणीत विजय मिळालेला आहे. ग्रामीण जनतेने आमच्या कामगिरीवर या निकालांद्वारे शिक्कामोर्तब केले आहे. आतापर्यंतचे जे आकडे आले आहेत, त्यानुसार 3 हजार 29 एवढ्या ग्रामपंचायती या आमच्या हाती आल्या आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये मग तो विदर्भ, मराठवाडा असो की, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असेल सगळीकडे आमची सरशी झालेली आहे. मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही अभिनंदनाला पात्र आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news