टोकियोमधील ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवसाची सकाळ मराठमोळ्या प्रवीण जाधव पदार्पणातील विजयाने झाली. राष्ट्रीय खेळ हॉकीत आपण विजयी सलामी दिली होती.
या आनंदापेक्षा सर्वांची उत्कंठा होती ती सौरभ चौधरीच्या सुवर्णपदकाची. पात्रती फेरीत अव्वल राहिल्याने तो देशासाठी पदक नक्कीच जिंकणार असा आशावाद असल्याने सर्व पत्रकारांनी मोर्चा शूटिंग रेंजच्या दिशेने वळविला. मात्र, अंतिम फेरीत दडपणामुळे तो सातव्या स्थानावर फेकला गेला.
नेमबाजीचा खेळ किती क्षणाक्षणात बदलतो हे त्यांच्या कामगिरीने पुन्हा अधोरेखित झाले. दरम्यान, अपेक्षेप्रमाणे आपली आर्चरीतील मिश्र दुहेरीचे आव्हान बलाढ्य कोरियाकडून संपुष्टात आले. एकटा प्रवीण 10 गुणांचे अचूक लक्ष्य साधत होता. दीपिकाकुमारीने त्याला साथ दिली असती तरी अजून कामगिरी उंचावली असती. सौरभ चौधरीच्या पदक जिंकणारच गृहीत धरून सर्वच पत्रकारांनी शूटिंग रेंजकडे कूच केली होती.
मीराबाईचा ऐतिहासिक विजय पहाण्यासाठी मोजकेच भारतीय हजर होते. तिच्या पत्रकार परिषदेला तर भारतातील दोनच पत्रकार उपस्थित होते. तेही मराठी. त्यातील मी एक मानकरी होतो.
दै. 'पुढारी'च्या वतीने मी पदकविजेत्या मीराबाईंचे 'खुरमजरी'ने स्वागत केले. मणिपूरमध्ये नमस्कारला 'खुरमजरी' म्हणतात. तिच्या मणिपुरी भाषेतून संवाद साधल्याने ती आनंदली. 'बहुत खूश है', ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे माझ्या आई-वडिलांचे स्वप्न मी पूर्ण केले. खूप अडचणी आल्या, दुखापतीने काही काळ खेळ थांबला. परंतु, टोकियात माझ्या मेहनतीला फळ आले.
'गणपती बाप्पा मोरया…' इंदो बायझान
स्वातंत्र्यपूर्व काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपान गाजवले, त्यानंतर रासबिहारी बोस यांचे नाव जपानी लोकांच्या मुखी होते. आता उगवत्या सूर्याच्या देशातील राजधानीत महाराष्ट्रीय आवाज घुमतोय. 'गणपती बाप्पा मोरया', इंदो बायझानचा जयघोष दुमदुमतोय. टोकियो शहरात योगेंद्र पुराणिक अस्सल मराठमोळा नगरसेवकपदी विराजमान आहेत.
आता जपानमधील 3 हजारपेक्षा अधिक मराठी मंडळींना मराठमोळ्या ऑलिम्पिकवीराची प्रतीक्षा आहे. जपानमध्ये टोकियो मराठी मंडळ कार्यरत आहे. गणेशोत्सव, पाडवा, संक्रांत ही जपानमधील मराठी मंडळी दरवर्षी साजरा करतात. यंदा ऑलिम्पिक उत्सव साजरा करण्यासाठी जपानमधील मराठी मंडळी सरसावली आहे. 'इंदो बायझान' – 'भारत माता की जय' हा नारा पुण्याच्या अजय डाके, राहुल बापट, नरेद देसाई, हेमंत विसाळ यांनी सुरू केला आहे.
अजय डाकेच्या मुलास रॉजर फेडररची टेनिसची मॅच पहायची होती. तो ऑलिम्पिकमध्ये खेळताना याची देही याची डोळा पहायचे होते. क्रीडाशौकिनांसाठी ऑलिम्पिकची द्वारे बंद केल्याने आता घरात बसूनच तो फेडररसह भारताच्या सामन्यांचा आनंद लुटणार आहे. सतत टोकियोत महाराष्ट्रातील लोकांना मदतीचा हात देणारा राहुल बापटही ऑलिम्पिकमय झाला आहे.
कोरोनामुळे आता ऑनलाईन मॅच पहावी लागणार म्हणून दुधाची तहान ताकावर भागावावी लागणार असे तो म्हणतो. त्याला भारताच्या लढती मैदानात बसून पहायच्या होत्या. कोल्हापूरच्या राही सरनोबत, तेजस्विनी सावंतचा अचूक नेम त्याला पहायचा होता. शांत बसेल तो राहुल कसा. हातात तिरंगा घेऊन, तिरंग्याचा बॅच लावून तो घरातूनच मित्रांसोबत भारताचे विजय साजरे करणार आहे.