पुणे ; पुढारी वृत्तसेवा : 'असनी' चक्रीवादळ शमताच कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. 'असनी'मुळे मान्सूनची वाट 'आसान' होणार आहे. अंदमानात मान्सून 17 मे, तर केरळात 28 मेपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे, असेे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले.
दरम्यान, चक्रीवादळाचे सोमवारी महाचक्रीवादळात रूपांतर होत आहे. परिणामी, कोकणात बुधवारी व गुरुवारी, तर मध्य महाराष्ट्रात गुरुवारी व शुक्रवारी पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
या चक्रीवादळाचा थेट संबंध मान्सूनशी नाही; मात्र हे वादळ शमल्यावर कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होईल. त्यामुळे मान्सूनचे वारे त्या दिशेने लवकर येईल. बंगालच्या उपसागरातील अंदमान बेटांजवळ शनिवारी कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती झाली. रविवारी त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले. याला श्रीलंकेने 'असनी' असे नाव दिले आहे.
विदर्भ, मराठवाड्यात तापमान 45 अंशांवर जाणे शक्य
चक्रीवादळामुळे दक्षिण भारतासह देशातील अन्य भागांत जोरदार पावसाची शक्यता असली, तरी मध्य महाराष्ट्रात 9 मे रोजी, तर मराठवाडा व विदर्भात 9 ते 12 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील. मराठवाड्यासह विदर्भातील काही शहरांचे तापमान आगामी आठवड्यात 43 ते 45 अंशांवर, तर मुंबईचे तापमान 34 ते 35 आणि पुणे शहराचे तापमान 38 ते 39 अंशांवर जाईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
या वर्षातील पहिले चक्रीवादळ
'असनी' चालू वर्षातील पहिले चक्रीवादळ आहे. 2021 मध्ये वर्षभरात 3 चक्रीवादळे आली होती. डिसेंबर 2021 मध्ये 'जावद' हे चक्रीवादळ आले होते. सप्टेंबर 2021 मध्ये 'गुलाब', तर मे 2021 मध्ये 'यास' चक्रीवादळाने बिहार आदी राज्यांत कहर केला होता.