माझी वसुंधरा स्पर्धेत कराड पालिका राज्यात प्रथम

माझी वसुंधरा स्पर्धेत कराड पालिका राज्यात प्रथम

कराड : पुढारी वृत्तसेवा : 
राज्य शासनाच्या 'माझी वसुंधरा' अभियान 2.0 अंतर्गत आयोजित स्पर्धेत कराड नगरपालिकेने सलग दुसर्‍या वर्षी सर्वोत्तम कामगिरी केली. रविवारी या स्पर्धेचा निकाल मुंबईत जाहीर झाला. यात राज्यातील नगरपरिषद गटात कराड नगरपालिकेने पहिला क्रमांक पटकावत सुमारे 5 कोटींचे बक्षीस पटकावले आहे. गतवर्षी पालिकेने दुसरा क्रमांक पटकावला होता. यंदा प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी पालिकेने कसोशीने प्रयत्न केले होते. त्यामुळे पालिकेला प्रथम क्रमांक खेचून आणण्यात यश मिळाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, आशिष रोकडे, मुझफ्फर नदाफ, सुरेश शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नग्नि व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत गतवर्षी कराड नगरपालिकेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. यावर्षी आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. निकाल जाहीर झाल्यानंतर कराड पालिकेत कर्मचार्‍यांनी जल्लोष केला.

राज्य शासनाने पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांशी निगडित पर्यावरणाच्या दृष्टीने उपक्रम राबवण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून माझी वसुंधरा अभियान सुरू केले आहे. या अभियानात स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पर्यावरणाच्या दृष्टीने कार्यक्रम राबवण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. यात राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांना दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनी गौरवण्यात येते.

मागील चार वर्षांपासून कराड शहरामध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणे ऑक्सिजन झोन बनत आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड व जनजागृती यामुळे प्रोत्साहन मिळाल्याने कराड पालिकेबरोबरच एनव्हायरो नेचर क्लब तसेच अनेक संस्था, नागरिक या वृक्ष संवर्धन चळवळीत सहभागी झाल्या आहेत. इदगाह मैदानातील 6 एकर जागेत वृक्षारोपण केले आहे. शहरात पर्यावरणासंबंधित करण्यात आलेली जनजागृती तसेच 'माझी वसुंधरा' स्पर्धेतील सर्व निकषांमध्ये कराड पालिका उत्तीर्ण झाल्याने कराडने नगरपारिषद गटात पालिकेला राज्यात प्रथम क्रमांक पटकावता आला. याबद्दल नगरपालिका अधिकारी, कर्मचार्‍यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जर्‍हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे प्रमुख उपस्थित होते.
ना. उद्धव ठाकरे म्हणाले, पर्यावरणात प्रत्येक घटक महत्वाचा आहे. आपण सर्वजण एक टीम आहोत आणि सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर कोणताही उपक्रम कसा यशस्वी होऊ शकतो याचे 'माझी वसुंधरा अभियान' हे उत्तम उदाहरण आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातील माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य यात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

ना. अजित पवार म्हणाले, कोणत्याही उपक्रमात लोकसहभाग अंतर्भूत असला की त्यात यश नक्कीच मिळते. पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यासाठी यापुढे 200 कोटी रूपयांचा निधी दिला जाईल.
ना. बाळासाहेब थोरात यांनी स्वच्छता, माझी वसुंधरा हे अभियान ही केवळ रोज राबवण्याची बाब नाही तर ती जनमानसात रूजून आपली संस्कृती बनली पाहिजे, असे सांगितले.
ना. आदित्य ठाकरे म्हणाले यांनी पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करतानाच शाश्वत विकास साधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी काम करायचे आहे, असे सांगितले.

दरम्यान, माझी वसुंधरा अभियानांतर्गत अमृत शहरांमध्ये झालेल्या स्पर्धेत सातारा नगरपालिका व पुणे महानगरपालिकेला तिसरा क्रमांक विभागून देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी नगर अभियंता दिलीप चिद्रे, आरोग्य विभागाचे भाग निरीक्षक प्रशांत गंजीवाले, सागर बडेकर, सिटी कॉर्डिनेटर विशाल सुर्वे, जगन्नाथ धडचिरे, अमित चव्हाण उपस्थित होते.

राज्य शासनाच्या निकषानुसार माझी वसुंधरा अभियान शहरात प्रभावीपणे राबवले. स्वच्छ सर्वेक्षण तसेच माझी वसुंधरा अभियान पुरक असल्याने त्याचा फायदा झाला. या अभियानात कर्मचार्‍यांनी झोकून देवून काम केले. नागरिक व सामाजिक संघटनांचीही मदत झाली. नगरपालिकेने शहरातील बगीचे, लागवड केलेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन करावे. सातारा ही कार्बन न्यूट्रल सिटी करण्याचा मानस आहे.
– मुख्याधिकारी, सातारा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news