न्यूयॉर्क : माणूस हौसेने अनेक भन्नाट गोष्टीही करीत असतो. कुठे चक्क कुत्र्यालाच महापौर बनवले जाते तर कुठे एखाद्या प्राण्याला पदक देऊन सन्मानितही केले जाते. आता एक मांजर सोशल मीडियात लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. ही मांजर साधीसुधी नसून ती पदवीधर असल्याचा तिच्या नुकत्याच पदवीधर झालेल्या मालकिणीचा दावा आहे. फ्रान्सिस्का बॉर्डियर नावाच्या या तरुणीने म्हटले आहे की आपण टेक्सास विद्यापीठाचे ऑनलाईन शिक्षण घेतले आहे. अशावेळी ही 'सुकी' नावाची मांजरही लॅपटॉपसमोर येऊन बसत असे. त्यामुळे तिच्यासमवेत सुकीही पदवीधरच झाली आहे!
ही सुकी रोज एखाद्या हुशार व 'सिन्सिअर' विद्यार्थ्यासारखी नेमाने लॅपटॉपसमोर येऊन बसत असे. जणू काही ती प्रत्येक लेक्चर काळजीपूर्वक ऐकते आहे असा तिचा आविर्भाव असायचा. ज्यावेळी फ्रान्सिस्काचा पदवीदान समारंभाचा दिवस आला त्यावेळी ती सुकीलाही घेऊन गेली. तिलाही ग्रॅज्युएशन ड्रेस आणि कॅप घालण्यात आली. हा गोंडस क्षण तिने इन्स्टाग्रामवर एका फोटोद्वारे शेअर केला आहे. तिने सांगितले की माझ्या मांजरीने प्रत्येक झूम लेक्चरला हजेरी लावली आहे. त्यामुळे आम्ही दोघीही टेक्सास विद्यापीठातून पदवीधर झालो आहोत! तिच्या या फोटोला अनेकांनी लाईक केले आहे. मांजरीला खरोखरच कोणती पदवी मिळालेली नसली तरी तिच्या मालकिणीच्या भावना लोकांना भावल्या!