बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव, खानापूर, निपाणी, चिकोडी आगारातून महाराष्ट्रात जाणार्या व कर्नाटकात येणार्या 300 बसफेर्यांना शुक्रवारी रद्द केल्या आहेत. सीमाप्रश्नावरून वातावरण तापले असल्यामुळे समाजकंटकाकडून बसचे नुकसान होऊन शकते, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड गावात कर्नाटक परिवहनच्या बसवर 'जय महाराष्ट्र' लिहून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यामुळे परिवहनने बसफेर्या रद्द केल्या आहेत.
शुक्रवारी दिवसभर महाराष्ट्र बस व कर्नाटकातील परिवहनच्या बसनी सीमेवरूनच माघारी जाणे पसंत केले. याचा फटका आंतरराज्य प्रवास करणार्या प्रवाशांना बसला. कोल्हापूरला जाण्याकरिता कोगनोळी नाक्यावर उतरून पुढे महाराष्ट्राच्या बसमधून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली. कोकणात जाताना शिनोळीला उतरून पुढील बसने प्रवास करावा लागला.