महाबळेश्वरची 35 कोटींची डॉपलर रडार यंत्रणा कुचकामी

file photo
file photo

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : ढगांच्या भौतिक शास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) महाबळेश्वर येथे डॉपलर रडार ही अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, जागतिक दर्जाच्या या यंत्रणेच्या डेटाबेसचे विश्लेषण करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने अतिवृष्टीची पूर्वकल्पना देणे अशक्य आहे. त्यामुळे 35 कोटींची ही यंत्रणा कुचकामी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पश्चिम घाटातील (वेस्टर्न घाट) उंच ठिकाण म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. हमखास, अतिपावसाचा प्रदेश असलेल्या महाबळेश्वरचे सरासरी पाऊसमान 5570 मिलिमीटरपेक्षा जास्त आहे. महाबळेश्वरातील सर्वोच्च डोंगरावर म्हणजेच समुद्रसपाटीपासून 1438 मीटर उंचीवर ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. नैसर्गिक उंचीमुळे अभ्यासासाठी आवश्यक पावसाळी ढग अगदी कमी अंतरावर उपलब्ध होतात. अरबी समुद्रातून आगमन झालेले पावसाचे ढग वेस्टर्न घाटाच्या या भागात विनाअडथळा पोहचतात.

ढगांची उंची, घनता, आकारमान, त्यातल्या बाष्पाचे प्रमाण, ढगांची दिशा, थेंबांची संख्या, आदी निरीक्षणे येथे नोंदवली जातात. त्यासाठी रडार, व्हिडीओ कॅमेरे, सेन्सर्स आदींचा समावेश असलेली संगणकीकृत यंत्रणाही आहे. 20 किलोमीटर परिघातील ढगांचा वेध घेण्याची क्षमता रडारांमध्ये आहे. मात्र या यंत्रणेचा वापर विशेषकरून संशोधनासाठीच केला जात आहे.

जागतिक दर्जाच्या या यंत्रणेच्या डेटाबेसचे विश्लेषण करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने आवश्यक अलर्ट वेळेवर देण्यास अडचणी निर्माण होतात. परिणामी अतिवृष्टी होऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असतानाही वेळीच उपायोजना करणे प्रशासकीय यंत्रणेला अशक्य होते. या अत्याधुनिक यंत्रणेवर सुमारे 35 कोटी खर्च करण्यात आला असतानाही तितक्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रासाठी त्याचा उपयोग होताना दिसत नाही.

…तरच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपाययोजना शक्य

कोणत्या भागात किती पाऊस पडेल, याचा अचूक अंदाज मिळाला तर धरणांतील पाणीसाठ्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होऊ शकते. डेटाबेसचे योग्य विश्लेषण धरण व्यवस्थापनाकडे आले तर ऐनवेळी निर्माण होणारी पूरस्थिती टाळता येऊ शकते. महाबळेश्वर येथे गेली दोन-तीन वर्षे सलग अतिवृष्टी होत आहे. अंदाजापेक्षा प्रचंड पर्जन्यमान होत आहे. जोर-जांभळी खोर्‍यातील गोळेगाव आणि गोळेवाडी (ता. वाई) या गावांमध्ये चेरापुंजीपेक्षाही जादा पाऊस झाला होता. अतिवृष्टीने जिल्ह्याच्या पश्चिम भागासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात भूस्खलन, अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले होते.

भारतीय हवामान खात्याने याही वर्षी जादा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याद़ृष्टीने महाबळेश्वरातील डॉपलर रडार यंत्रणा क्षमतेने कार्यान्वित केली, डेटाबेसचे विश्लेषण करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध केले आणि भारतीय हवामान खाते, पाटबंधारे आणि महसूल यंत्रणा यांच्यात समन्वय राहिला तर अतिवृष्टी, महापूर अशा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपायोजना करणे शक्य होईल. जीवितहानी टाळता येईल. त्याद़ृष्टीने भारतीय हवामान खात्याने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news