मुंबई महापालिकेत ईडीची एन्ट्री; तीन बड्या अधिकाऱ्यांना ईडीची नोटीस

मुंबई महापालिकेत ईडीची एन्ट्री; तीन बड्या अधिकाऱ्यांना ईडीची नोटीस
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पूर्ण काळातील भ्रष्टाचार प्रकरणी पालिकेतील उच्चपदस्थ अधिकारी ईडीच्या निशाण्यावर आले असून, पालिकेतील तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना ईडीने नोटीस बजावल्याचे समजते. यात पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांचे नाव असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. या नोटिसांवर महापालिका प्रशासनाने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कोरोना महामारीच्या काळात विविध उपाय योजनांसाठी लागणारा निधी खर्च करण्याचा अधिकार पालिका उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आला होता. कोरोनावर पालिकेने सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च केला. निविदा प्रक्रिया न राबवता कोट्यवधी रुपयांची कंत्राटे देण्यात आली. राज्य सरकारने आधी या कोरोना काळातील व्यवहारांची कॅगमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पालिकेचे सर्व व्यवहार तपासताना कोरोना काळातील व्यवहार तपासू नयेत, असे नवे पत्र राज्य सरकारने कॅगला पाठवले. आता मात्र महापालिकेत चर्चेत असलेला कोरोना काळातील घोटाळा थेट ईडीच्याच हाती गेल्याची चर्चा आहे. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेकडून कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्यासाठी खाजगी कंपनींना कंत्राट देण्यात आली होती.

यामध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला वरळी आणि दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र ही कंपनीच बोगस असल्यासह या कंपनीला वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव नव्हता. याचा आधार घेत मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा, आयकर विभाग आणि ईडीने या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. किरीट सोमय्या यांनी सांगितले की, चहल यांनी कोरोना काळातील घोटाळा दडपण्याचा प्रयत्न केला. आता सगळीच चौकशी सुरू झाली असून, हिशेब द्यावा लागेल. काही दिवसांपूर्वी चहल यांनी या घोटाळ्याशी संबंधित सर्व कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेला दिली. आता ती ईडीलाही द्यावी लागतील. हा शंभर कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला.

पालिकेतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईडीने नोटीस बजावल्याची चर्चा शुक्रवारी महापालिका मुख्यालयात होती. ज्या तीन अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यांच्या मालमत्तेसह अन्य संपत्तीची चौकशी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी यापैकी एका अधिकाऱ्यास ईडीने बोलावले असू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news