महाऔष्णिक वीज केंद्राने थकविला २९ कोटींचा मालमत्ता कर

महाऔष्णिक वीज केंद्राने थकविला २९ कोटींचा मालमत्ता कर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहराला लागून असलेल्या महानगर पालिकेच्या हद्दीतील उर्जानगर परिसरातील महाऔष्णिक विज केंद्रातील 500 मेगावॅट क्षमतेच्या दोन संचाचा तब्बल 29 कोटी 15 लाखांचा कर थकविला आहे. त्यापैकी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी 4 कोटी 86 लाखाचा भरना गुरूवारी (दि.31) रोजी केला आहे. विशेष म्हणजे नगरसेवक नंदू नागरकर यांनी वारंवार महानगर पालिकेत महाऔष्णिक वीज केंद्रावर मालमत्ता कराची आकारणी करून वसुल करण्याची मागणी लावून धरली होती. याकरीता त्यांनी मनपासमोर ढोल वाजवा आंदोलन देखील केले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत मनपाने थकीत कर वसुल करण्याबाबत नोटीस बजावली होती.

चंद्रपूर शहरापासून जवळच उर्जानगर परिसरात महाऔष्णिक वीज केंद्र आहे. या केंद्रातूनच राज्यात विजेचा पुरवठा केला जातो. अस्तित्वात असलेल्या वीज केंद्रापैकी 500 मेगावॅटचे संच क्रमांक 8 व 9 हे महानगरपलिका हद्दीत येतात. या संचांचे महाऔष्णिक वीज केंद्राकडे तब्ब्ल 29 कोटी 15 लाख 58 हजार रूपये हे सन 2016 ते 2022 पर्यंत थकीत आहेत. हा थकीत कर महाऔष्णिक वीज केंद्राने तातडीने द्यावा याकरिता मनपाचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी मागणी लावून धरली होती. मात्र कर भरला जात नव्हता, शिवाय कर वसूल करण्यास मनपा कानाडोळा करीत होती. त्यामुळे सामाजिक दायित्वाचा निधी वीज केंद्राने द्यावे मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेत ढोल वाजवा आंदोलन करण्यात आले होते. या थकीत कराच्या माध्यमातून मनपाच्या उत्पन्नात वाढ होवून शहरात विविध कामे करता यावे यासाठी नागरकर यांनी सातत्याने मुद्दा उचलून धरला होता.

त्यांच्या मागणीची तसेच आंदोलनाची दखल घेत महानगरपालिकेने 2016 ते 2022 पर्यंत 29 कोटी 15 लाख 58 हजार रुपयांच्या मालमत्ता कराची नोटीस बजावली होती. कर न भरल्यास कारवाईचा बडगा उगारल्या जाईल असा इशारा देण्यात आला होता. गुरूवारी, 31 मार्चला आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी 4 कोटी 86 लाखांचा कर मनपामध्ये जमा केला आहे. पुन्हा महाऔष्णिक वीज केंद्राकडे थकीत असलेला कराचा भरणा तातडीने करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news