डॉ. राजू पाटोदकर
श्रावण म्हणजे हिंदीतील सावन..! अनेक हिंदी चित्रपटांमध्ये श्रावणाचे अचूक वर्णन गीतकारांनी केले आहे. गीतांच्या शब्दरचना, चित्रीकरण, निसर्ग पाहताना आपण आनंदित होतो. कळत-नकळत गाण्यात गुंतून जातो. एका वेगळ्या विश्वात रमतो. अर्थातच, ही सर्व महती श्रावणाची आणि त्याच्या मनमुराद आनंदाची. ही काही हिंदी चित्रपटांतील 'श्रावण' उर्फ 'सावन' गीते…
बासुदांच्या 1979 यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'मंजिल' चित्रपटातील 'रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन' या गाण्याने तर चक्क थिएटरमधील प्रेमीयुगुलांना चिंब भिजवले! अमिताभ बच्चन आणि मोसमी चटर्जी यांच्यावर चित्रित झालेले हे गीत. मुंबईतील ओव्हल मैदान, मंत्रालय समोरील बाजू आणि चर्नी रोड, गिरगाव चौपाटीचे चित्रीकरण असलेले हे गीत. महत्त्वाचे म्हणजे हे गीत मेल-फिमेल आवाजात असून दोन्हीही श्रवणीयच आहेत. अर्थातच, लतादीदी आणि किशोरदांचा आवाज म्हणजे काही विचारायलाच नको. गीतकार योगेश, तर संगीतकार आर. डी. बर्मनदा.
श्रावण आणि हृषीकेश मुखर्जी यांचे समीकरणही बर्याच चित्रपटात दिसून येते. 'चुपके चुपके'सारख्या लाजवाब कॉमेडी चित्रपटातही त्यांनी 'अब के सजन सावन मे, आग लगेगी बदन मे,' हे गीत दाखवून श्रावणाचे त्यांच्यालेखी असलेले महत्त्व अधोरेखित केले. शर्मिला टागोर यांच्यावर मुख्यत: चित्रित झालेले हे गीत लतादीदींनी गायले असून, गीतकार आनंद बक्षी, तर संगीतकार सचिन देव बर्मन आहेत. या गाण्याची लज्जत पाहताना अधिक येते. तर त्यांनी आपल्या 1979 यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'जुर्माना' चित्रपटातून 'सावन के झुले पडे, तुम चले आओ, तुम चले आओ' असे म्हणत, प्रेयसीला आपल्या प्रियकरास बोलावण्यास भाग पाडले. अमिताभ बच्चन, राखी, विनोद मेहरा यांच्या भूमिका असलेला हा एक उत्तम चित्रपट. लतादीदींच्या आवाजातील हे गीत असून, गीतकार आनंद बक्षी, तर संगीतकार आर. डी. बर्मन आहेत. अमिताभ व राखी यांच्यावर हे गीत चित्रित आहे.
भारतीय संस्कृती आणि परंपरेला चित्रपटाच्या माध्यमातून यथायोग्य गुंफून, त्याचे सादरीकरण करण्यात राजश्री प्रॉडक्शनचे सर्वेसर्वा ताराचंद बडजात्या यांचा हातखंडा. श्रावणाचे महत्त्व त्यांनीही जाणले. 1979 यावर्षी तर चक्क 'सावन को आने दो' या नावानेच चित्रपट त्यांनी प्रदर्शित केला. या चित्रपटात 'तुम्हे गितो मे ढालूंगा, सावन को आने दो,' हे गौहार कानपुरी यांचे गीत आहे. या गीतातील शब्दांची सहज सोपी रचना आनंददायी वाटते. तसेच मनमोहक निसर्गदर्शन, बैलगाडी, ग्रामीण साज, उत्तम नृत्य दिग्दर्शन. आणि अरुण गोविल व झरिना वहाब या जोडीचे नृत्य रंगत आणते. हे गीत जसपाल सिंग आणि कल्याणी मित्रा यांनी गायलेले आहे, तर राजकमल यांचे कर्णमधूर संगीत या चित्रपटाला लाभले आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाची सर्वच गाणी श्रवणीय वाटतात.
'सावन' उर्फ 'श्रावणा'वरील हिंदी चित्रपट गीत हा विषय आला की, हमखास आठवते ते 'मिलन' या चित्रपटातील 'सावन का महिना, पवन करे सोर' हे गीत. सुनील दत्त आणि नूतन या दिग्गज कलावंतांवर चित्रित झालेले हे गीत लतादीदी व मुकेश यांच्या आवाजात आहे. गीतकार आनंद बक्षी यांची कमालीची शब्दरचना गीताच्या प्रत्येक ओळीतून जाणवते.
ते लिहितात, 'जिनके बलम बैरी गये हे विदेशवा, लायी है जैसे उनके प्यार का संदेसवा.' वा! क्या बात है… हे गीत सुरुवातीला घराच्या बाहेर, होडीमध्ये आणि कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये अशा वेगवेगळ्या तीन लोकेशनवर चित्रित करण्यात आलेे आहे. गीत सुपरहिटच! त्यास कर्णमधूर संगीताची जोड दिली आहे लक्ष्मीकांत-प्यारेलाल या सदाबहार संगीतकार जोडीने. सुनील दत्त व नूतन यांचा अभिनय आणि मुकेशजी यांचे 'अरे बाबा, शोरऽऽ नही, सोर सोर' तर लाजवाबच!
'जैसे को तैसा' हा 1973 यावर्षी प्रदर्शित झालेला जितेंद्र आणि रिना रॉय या जोडीचा हिट चित्रपट. यात जितेंद्रची दुहेरी भूमिका. दुसरी नायिका श्रीविद्या. या चित्रपटात अतिशय सुंदररीत्या चित्रित करण्यात आलेले आनंद बक्षी यांचे 'अब के सावन मे जी करे.. रिमझिम, तन पे पानी गिरे.. मन मे लगे… आग सी हो' हे गीत आहे. लता व किशोर यांच्या आवाजातील या गीताचे संगीतकार आर. डी. बर्मन आहेत. जितेंद्रचे 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'माँ' या चित्रपटात जयाप्रदासोबत एक सुरेख गीत आहे, 'बरसात मे जब आयेगा सावन का महिना.' हे गीत पौर्णिमा यांनी गायले असून, संगीतकार अन्नू मलिक आहेत. जयाप्रदाचे सुरेख नृत्य पाहायला मिळते.
यश चोप्रा यांनीदेखील आपल्या चित्रपटांतून श्रावणाच्या वातावरणाचे अचूक आणि लोभस वर्णन केले आहे. हळुवार, तलम प्रेमकथा रंगविण्यात त्यांचा हातखंडा. त्यांच्या 1989 यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'चाँदनी' चित्रपटातील 'लगी आज सावन की फिर वो झडी है! वही आग सिने मे फिर जल पडी है!' हे सुरेश वाडकर यांच्या आवाजातील गीत श्रावणाचे वेगळेच दर्शन आपणास घडवते.
गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या या रचनेमधील एक ओळ 'मेरे साथ बरसात भी रो पडी है क्या बाते…' या गीताला संगीताचा साज शिव-हरी म्हणजेच पंडित शिवकुमार शर्मा व हरिप्रसाद चौरसिया यांनी दिला. हे गीत कितीही वेळेस ऐकावे व पाहावेसे वाटते. धर्मेंद्र आणि आशा पारेख हीदेखील एक सुपरहिट जोडी. त्यांच्या 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आया सावन झुम के' चित्रपटाच्या नावातच 'सावन.' मग काय विचारायलाच नको. 'बदरा हाये.. बदरा छाये के झुले पड गये हाये की, मेले लग गयो की, मच गयी धूम की, आया सावन झुम के…' हे गीत म्हणजे धम्माल! मोहम्मद रफी आणि लतादीदी यांच्या आवाजातील हे गीत.
गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल. हे गाणे पाहताना इंद्रधनुष्याची एक अप्रतिम झलकही पाहावयास मिळते. तसेच याच जोडीचा 1971 यावर्षी प्रदर्शित झालेला 'मेरा गाँव मेरा देश' हा एक चित्रपट. या चित्रपटात 'कुछ कहता है ये सावन, क्या कहता है,' हे मोहम्मद रफी आणि लतादीदींच्या आवाजातील आनंद बक्षी यांचे गीत आहे. संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी या गीताला अप्रतिम अशी चाल दिलेली आहे. याशिवाय श्रावणावर आधारित 'चिंगारी कोई भडके', 'तो सावन उसे बुझाये (अमर प्रेम), 'मैं प्यासा तुम सावन'(फरार), 'मेरे नैना सावन भादो'(मेहबूबा), 'झुमता गाता सावन आया'(जजबात), 'सावन का महिना आया है'(आई मिलन की रात), 'सावन बरसे तरसे दिल रतन सावन के बदलो (दहेक), 'हरियाला सावन ढोल बजाता आया'(दो बिघा जमिन), 'गरजत बरसत सावन आयो रे'(बरसात की रात), 'सावन की रातो मे, ऐसा भी होता है'(प्रेमपत्र), 'सावन आये या ना आये'(दिल दिया दर्द लिया) ही गाणीसुद्धा हिटच आहेत.