डिज्नीच्या नायिकांचं सौंदर्य आणि शारीरिक ठेवणीचं प्रमाण ठरलेलंच होतं. मात्र हे प्रमाणबद्ध देखणेपण नाकारत 'रिफ्लेक्ट'ची नायिका बियांका स्क्रीनवर अवतरते. भारदस्त वजनाची, केसांचा बन केलेली बियांका एक बॅले डान्सर आहे. आपण इतरांपेक्षा जास्त जाड आहोत, या जाणिवेने त्रासलेली बियांका 'बॉडी डिस्मॉर्फिया' या मानसिक आजाराची शिकार ठरली आहे. बियांकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच डिज्नीने एका प्लस-साईज व्यक्तीला खलनायकी भूमिकेऐवजी नायिका म्हणून रूपेरी पडद्यावर आणलं आहे.
आपल्या दर्जेदार अॅनिमेशनपटांच्या जोरावर वॉर्नर ब्रदर्स, मेट्रो-गोल्डविन-मेयर्स, ड्रीमवर्क्स, पिक्सार आणि डिज्नी अशा काही आघाडीच्या अॅनिमेशन स्टुडिओंनी या अॅनिमेशनच्या दुनियेत आपलं स्वतंत्र वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. अॅनिमेशनपट म्हटलं की आपल्यासमोर साधारणपणे पोरसवदा प्रेक्षकवर्गाचे एक चित्र डोळ्यासमोर उभे राहते. त्यामुळे साधारणतः या अॅनिमेशनपटांचा आशय हा बच्चेकंपनीचं मनोरंजन करण्यासाठीच बनवला जातो.
पण आता बदलत्या जगासोबत मानवी भावभावनांमध्येही झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. त्यात समाजमान्य चौकटींच्या पलीकडे जाऊन एखाद्याला त्याच्या गुणदोषांसह स्वीकारणं हेही आलंच. त्यामुळे अनेक माध्यमांनी आपली भूमिका कशी सर्वसमावेशक असेल यावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलंय. त्याला लोकप्रिय अॅनिमेशन स्टुडिओ डिज्नीही अपवाद नाही.
जानेवारी 2006 मध्ये 'पिक्सार' हा 'टॉय स्टोरी', 'फाईंडिंग निमो', 'इन्क्रेडिबल्स'सारखे गाजलेले अॅनिमेशनपट बनवणारा स्टुडिओ डिज्नीने आपल्या पंखाखाली घेतला. 2008 चा 'वॉल-ई' येईपर्यंत पिक्सारच्या सिनेमांचा आणि शॉर्टफिल्मचा आशय निव्वळ मनोरंजनाच्या चौकटीतच अडकला होता आणि प्रेक्षकांनाही ते आवडत होते. पण 'वॉल-ई'ने हे चित्र बदलत मनोरंजनासोबतच समाजभान जपायचा प्रयत्न केला.
'वॉल-ई'ची कथा 22व्या शतकातली. पूर्णतः निर्मनुष्य झालेल्या आणि कचर्याने भरलेल्या पृथ्वीवर वॉल-ई नावाचे रोबोट साफसफाई करत असतात. माणसांनी तोवर तात्पुरता अवकाशात आसरा घेतलेला असतो. पुढच्या सात शतकांत एकच वॉल-ई रोबोट उतरतो. तो 'इव' या रोबोटशी मैत्री करतो, जिला कचर्याने भरलेल्या पृथ्वीवर जीवनसृष्टी पुन्हा वसवता येईल की नाही, याचं उत्तर शोधायला माणसाने पाठवलेलं असतं.
'वॉल-ई' त्याला सापडलेलं एक रोपटं 'इव'ला दाखवतो. पृथ्वीवर माणूस पुन्हा एकदा वास्तव्य करू शकतो याचाच तो संदेश होता. मग 'वॉल-ई'च्या मदतीने 'इव' हा संदेश अवकाशात आसरा घेतलेल्या माणसांपर्यंत कशी पोचवते, हा थरार आपल्याला पुढे पाहायला मिळतो. या अॅनिमेशनपटात मनोरंजन पुरेपूर होतं; पण त्याचसोबत यांत्रिकीकरणातून उद्भवणार्या समस्यांवरही भाष्य केलं होतं. मनोरंजनासोबतच प्रबोधन करत पिक्सारने वेगळीच उंची गाठली.
पुढे 2017 ला आलेला मेक्सिकन लोकसंस्कृतीची झलक दाखवणारा 'कोको' हा पिक्सारचा असाच एक महत्त्वाचा अॅनिमेशनपट. डोनाल्ड ट्रम्प यांच्या द्वेषपूर्ण अपप्रचाराने दुखावलेल्या मेक्सिकन नागरिकांवर या अॅनिमेशनपटाने मलमपट्टीचं काम केलं. 2015 च्या 'संजय'ज सुपर टीम' या अॅनिमेशन शॉर्टफिल्ममध्ये तर हिंदू पुराणातल्या देवतांना सुपरहिरो म्हणून दाखवलं गेलं होतं.
श्वेतवर्णीयांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात एखादं प्रमुख पात्र कृष्णवर्णीय असावं, त्यालाही योग्य प्रतिनिधित्व मिळावं ही जाणीव पिक्सारला तब्बल 22 अॅनिमेशनपटांनंतर झाली. 2020च्या ख्रिसमसला जो गार्डनर या कृष्णवर्णीय संगीत शिक्षकाभोवती गुंफलेला 'सोल' रिलिज करत पिक्सारने आपल्या कृष्णवर्णीय प्रेक्षकांना अनोखी भेट दिली.
2018ची 'बाओ' ही ऑस्करविजेती शॉर्टफिल्म पिक्सारच्या उत्तरोत्तर प्रगल्भ होत गेलेल्या आशयाचं उत्तम उदाहरण आहे. उच्च शिक्षण, नोकरीच्या कारणांनी पोरं घर सोडून गेल्यावर काही पालकांना 'एम्टी नेस्ट सिंड्रोम'सारख्या एकलकोंड्या, उदास मनोवस्थेला सामोरं जावं लागतं. 'बाओ'मध्ये 'एम्टी नेस्ट सिंड्रोम'शी झगडणार्या चिनी-कॅनेडियन आईचं आणि तिने जन्माला घातलेल्या 'बाओ' या पावाचं नातं आपल्यासमोर उलगडत जातं.
पुढे पिक्सारने 'स्पार्कशॉर्टस्' या प्रायोगिक कार्यक्रमाचा भाग म्हणून काही कर्मचार्यांना सहा महिन्यांच्या कालावधीत आणि मर्यादित बजेटमध्ये अॅनिमेशन शॉर्टफिल्म बनवायला सांगितली. त्यातलीच एक 2020 ला आलेली 'आऊट' ही अॅनिमेशन शॉर्टफिल्म. या शॉर्टफिल्मच्या निमित्ताने, डिज्नी आणि पिक्सारच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रमुख पात्र म्हणून एक समलिंगी नायक दाखवला होता.
पिक्सारच्या या प्रयोगांना मिळालेलं यश बघून डिज्नीही आता पिक्सारच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या आशयाची ठराविक चौकट मोडू पाहते आहे. पिक्सारच्याच 'स्पार्कशॉर्टस्'च्या धर्तीवर डिज्नीने आता 'शॉर्ट सर्किट' हा प्रायोगिक कार्यक्रम सुरू केलाय. आत्तापर्यंत या कार्यक्रमाचे दोन सिझन आणि वीस शॉर्टफिल्म रिलिज झाल्यात. यातली शेवटची शॉर्टफिल्म 'रिफ्लेक्ट' ही यावर्षी 14 सप्टेंबरला रिलिज झाली.
'रिफ्लेक्ट' आणि त्यातली नायिका हा चर्चेचा विषय ठरण्याचं कारण म्हणजे बारीक कंबरेच्या, लांब दाट केसांच्या, मोठ्ठाल्या बदामी डोळ्यांच्या, शेलाट्या अंगकाठीच्या नायिकांचा भला मोठा राजवाडा म्हणजे डिज्नीचा अॅनिमेशन स्टुडिओ. अगदी अलीकडच्या काळातल्या मोआना, रपंझल, राया असतील किंवा सुरुवातीच्या काळातल्या स्नो व्हाईट, सिंड्रेला, अॅलिस असतील, डिज्नीच्या नायिकांचं सौंदर्य आणि शारीरिक ठेवणीचं एक ठरावीक प्रमाण ठरलेलंच होतं.
हे सगळं प्रमाणबद्ध देखणेपण नाकारत 'रिफ्लेक्ट'ची नायिका बियांका स्क्रीनवर अवतरते. भारदस्त वजनाची, केसांचा बन केलेली बियांका एक बॅले डान्सर आहे. आपण इतरांपेक्षा जास्त जाड आहोत, या जाणिवेने त्रासलेली बियांका 'बॉडी डिस्मॉर्फिया' या मानसिक आजाराची शिकार ठरली आहे. या आजारात एखादी व्यक्ती शरीराच्या फक्त त्या भागाचा किंवा दोषाचा विचार करते जो तिच्या मनाप्रमाणे नसतो.
स्वतःला सतत आरशात बघून, स्वतःच्या शरीराबद्दल न्यूनगंड निर्माण झालेली बियांका तिच्या या आजारावर कशी मात करते, ते या एपिसोडमध्ये बघायला मिळतं. बियांकाच्या निमित्ताने, पहिल्यांदाच डिज्नीने एका प्लस-साईज व्यक्तीला खलनायकी भूमिकेऐवजी नायिका म्हणून रूपेरी पडद्यावर आणलं आहे. या शॉर्टफिल्मच्या लेखिका-दिग्दर्शिका हिलरी ब्रॅडफिल्ड यांच्या मते शारीरिक सकारात्मकता वाढवण्याच्या उद्देशातून 'रिफ्लेक्ट'ची निर्मिती केली गेली आहे.
आपल्या जुन्या नायिकांच्या जोरावर सौंदर्याची ठरावीक परिमाणे देणार्या डिज्नीच्या या चाकोरीबाह्य ठरलेल्या प्लस-साईज नायिकेचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. वर्गात इतरांपेक्षा जाड असल्याच्या न्यूनगंडातून बॅले क्लास सोडणार्या एका मुलीने ट्विटरवर 'रिफ्लेक्ट'चं कौतुक केलं असून तिच्या मते, बियांकाचं पात्र तिच्यासारख्या अनेक लहान मुलांना आत्मविश्वास देणारं आहे.
काहींनी 'रिफ्लेक्ट' ही फक्त एक प्रायोगिक अॅनिमेशन शॉर्टफिल्म असल्याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, बियांका हे पात्र एका मोठ्या अॅनिमेशनपटाचं मुख्य पात्र झालं, तर शारीरिक सकारात्मकतेला आणखी बढावा मिळू शकतो. दुसरीकडे, 'रिफ्लेक्ट'च्या निमित्ताने डिज्नी लठ्ठपणा आणि आरोग्याला धोकादायक अशा सवयींना समर्थन देतेय, असाही आरोप बर्याच जणांकडून केला जातो आहे. मुळात बियांका करत असलेला बॅले हा लठ्ठ व्यक्तींसाठी थोडा अवघड नृत्यप्रकार मानला जातो. पण बियांका जिद्दीने बॅले करत 'बॉडी डिस्मॉर्फिया'ची शिकार ठरणार्यांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण मांडू पाहते. त्यामुळे बियांका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागली आहे.
प्रथमेश हळंदे