मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करून धमकावल्याच्या प्रकरणातील सहभागीदार आणि प्रमुख साक्षीदार असलेल्या ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी आरोपींना 45 लाख रुपये देण्यात आल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने मंगळवारी विशेष न्यायालयात केला.
हे पैसे आरोपींना उपलब्ध करून देण्यात आल्याबाबतचा तपास बाकी आहे, असे सांगत एनआयएने दोन्ही प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांच्या मुदतवाढीची मागणी केली आहे.
पोलीस चौकशीला मनसुख हिरेन हे घाबरले होते. मनसुख हिरेन यांनी तोंड उघडले तर, भांडाफोड होईल आणि आपण अडकले जाऊ या भीतीने यातील मुख्य आरोपींनी सराईत गुन्हेगारांना 45 लाख रुपयांची सुपारी देऊन मनसुख हिरेन यांचा काटा काढला.
यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत फेकून दिला होता. हिरेन हत्याप्रकरणात सचिन वाझे यांच्यासोबत प्रदीप शर्मा, मनीष सोनी आणि सतीश मोथकुरी यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे.
सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच सतीश आणि मनीष यांनी मनसुख हिरेनची हत्या केल्याची कबुली दिली असल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले आहे.
हत्येनंतर दोघांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्याशी संपर्क साधला होता. या हत्येसाठी दोघा आरोपींना रोख रक्कम देण्यात आली होती.
याबाबत अधिक तपास करत असल्याचे सांगून एनआयएने दोन्ही प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 30 दिवसांच्या मुदतवाढीची मागणी केली आहे. यापूर्वी जून महिन्यातही न्यायालयाने 'एनआयए'ला आरोपपत्र दाखल करण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने आता इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख तेहसीन अख्तर याच्याकडून दोन मोबाईल फोन तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.
तेहसीन सध्या तिहार कारागृहामध्ये आहे. तेहसीन याच्याकडे सापडलेले दोन्ही फोन आपलेच असल्याची कबुली त्याने दिली आहे. मात्र, त्याच्यावरून अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याची जबाबदारी घेणारे मेसेज आपण पाठवले नसल्याचे त्याने सांगितले आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पोलीस दलाच्या कार्यालयातून एनआयएने हे मोबाईल फोन ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळते. दिल्ली पोलिसांसह तिहार कारागृहाच्या अधिकार्यांना तेहसीन याच्या कोठडीतून 11 मार्च रोजी हे दोन फोन जप्त केले होते.