मुंबई; प्रतिनिधी : आमदार अपात्रतेवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात येत्या 8 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार असल्याने त्या निकालानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची शक्यता आहे. आधीच्या वृत्तानुसार 5 ऑगस्ट रोजी किंवा
15 ऑगस्टपूर्वी विस्तार केला जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुरुवारच्या तातडीच्या दिल्ली दौर्यामुळे या संदर्भातील चर्चा सुरू झाली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार होणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले होते. आमदार अपात्रतेसंदर्भातील याचिका अद्याप न्यायालयात प्रलंबित असल्याने हा विस्तार छोटेखानी होईल आणि भाजप व शिंदे गटातील प्रत्येकी सात अशा 14 मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली होती.
या मंत्रिमंडळात भाजपच्या संभाव्य नावांमध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक, रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा समावेश आहे. शिंदे गटाची संभाव्य नावे पुढीलप्रमाणे : दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार.
मुख्यमंत्री प्रमुख खाती मागत असल्यानेच विस्तार रखडला : आ. सतेज पाटील
सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख खाती मागत असल्याने अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर राज्याचा कारभार सुरू असून अद्याप मंत्रिमंडळाचा मुहूर्त ठरत नाही, अशी टीका आ. सतेज पाटील यांनी केली.