मंगळवेढा : प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून

मंगळवेढा : प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून

मंगळवेढा/सांगली ; पुढारी वृत्तसेवा : शिवणगी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील सत्यवान मच्छिंद्र कांबळे (वय 31, रा. शिवनगी, मूळ रड्डे, ता. मंगळवेढा) याचा बुधवारी (दि. 9) पहाटे पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केला होता. खुनानंतर पंख्याला लटकवून आत्महत्येचा बनाव करण्यात आला होता. याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने प्रियकरासह तिघांना अटक केली. सर्व संशयित सांगली जिल्ह्यातील आहेत. अवघ्या 24 तासांत खुनाचा छडा लावण्यात यश पोलिसांना आले.

अटक केलेल्यांमध्ये प्रशांत अशोक पवार (वय 32, रा. जुना मिरज-कुपवाड रस्ता, हमालवाडी, कुपवाड, ता. मिरज), शाहरूख रफीक शेख (वय 24, रा. गारपीर चौक, सांगली) आणि अजय परशुराम घाडगे (वय 24, रा. समडोळी, ता. मिरज) या तिघांचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सत्यवान कांबळे याचा त्याच्या मामाच्या मुलीशी तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्याला दोन अपत्ये आहेत. तो शिवनगी येथे मामाच्या गावी पत्नीसह राहात होता. सत्यवान कांबळे हा उमदी येथील एका शाळेत इंग्रजी विषय शिकवत होेता. दरम्यान त्याच्या पत्नीचे सोड्डी येथे उच्चमाध्यमिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे.

विवाहानंतर काही दिवसांनी पती-पत्नीमध्ये सतत भांडण होत असत. दरम्यान, सत्यवान कांबळे याची आई वारल्याने त्याचे वडील रड्डे येथे एकटेच रहातात. सोमवारी पत्नीसोबत भांडण झाल्याने सत्यवान हा वडिलांकडे रड्डे येथे गेला होता. परत तो शिवनगी येथे परत आला. दरम्यान, तो नेहमीप्रमाणे मंगळवारी शाळेत जावून परत आला. त्यानंतर रात्री घरात पत्नी व मुलांसमवेत झोपी गेला.

परंतु पत्नीने यापूर्वीच प्रियकर प्रशांत याच्या मदतीने त्याचा खून करण्याचा प्लॅन आखला होता. ठरल्याप्रमाणे मंगळवारी शिवणगीत आले. त्यांनी त्याचा खून करून आत्महत्येचा बनाव केला आणि परत सांगलीला गेले होते.

दरम्यान, उमदी (ता. जत) येथे झालेल्या दुहेरी खुनातील संशयितांचा शोध घेण्यासाठी एलसीबीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्यासह संतोष गळवे व संदीप पाटील यांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना सांगली-पंढरपूर रस्त्यावर गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेले तिघे संशयितरित्या थांबले असल्याची माहिती मिळाली.

त्यावेळी पथकाने तत्काळ त्या ठिकाणी जावून तिघांना ताब्यात घेतले. तिघांकडे कसून चौकशी केली असता संशयित प्रशांत पवार याच्या प्रेयसीच्या सांगण्यावरून तिचा पती सत्यवान कांबळे याचा झोपेत असतानाच गळा आवळून खून केला. खुनाचा संशय येवूनये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी सत्यवान कांबळे याला पंख्याला अडकवून त्याने आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचे कबूल केले. बुधवार दि. 9 रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार करून ते तिघे तानंग फाटा येथे परत आले होते. यानुसार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन मंगळवेढा पोलिसांच्या ताब्यात दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news