भोमाळे गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत; केव्हाही दरड कोसळण्याची भीती

भोमाळे गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत; केव्हाही दरड कोसळण्याची भीती

आदेश भोजणे

वाडा : भोमाळे (ता. खेड) गावावर 1994 साली दरड कोसळली होती. मात्र, सुदैवाने कोसळलेली दरड गावावर न येता गावच्या वरच्या बाजूस असणार्‍या ओढ्याच्या पात्रातून वाहून गेल्याने गाव सुदैवाने बचावले होते. मात्र, या घटनेत दोन नागरिकांचा बळी गेला होता. आजही संपूर्ण गाव पावसाळ्यात भीतीच्या सावटाखाली असून, 1994 सालच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास संपूर्ण भोमाळे गाव डोंगराच्या कुशीत सामावले जाईल, अशी परिस्थिती असल्याने गावचे पुनर्वसन करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात निसर्गाच्या कुशीत वसलेले सुमारे 70 घरांचे व 400 लोकसंख्येचे हे गाव. 14 ऑगस्ट 1994 साली या गावावर दक्षिणेकडील भागातील डोंगराचा मोठा भाग तुटून झेपावला. सुदैवाने हा तुटलेला भाग अगदी गावाजवळ येऊन खेटून असलेल्या छोट्याशा टेकडीने दोन भागांत विभागला जाऊन ओढ्याच्या पात्रातून भीमा नदीपात्रात विसावला होता. गाव थोडक्यात बचावले. या दुर्घटनेनंतर तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांनी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन गावचे पुनर्वसन करण्याचे सांगितले होते. मात्र, आज 28 वर्षांनंतरही हे गाव आहे त्याच स्थितीत असून, माळीण (ता. आंबेगाव) गावच्या घटनेनंतर पुन्हा चर्चेत आले खरे; मात्र दरवर्षी पावसाळा आला की नेहमीच हे चर्चेत येते. परंतु, प्रश्न 'जैसे थे'च आहे.

ज्या भागातील डोंगराचा मोठा भाग गावावर झेपावला होता, त्याच भागात आजच्या स्थितीत डोंगरात जमिनीला भेगा पडल्या आहेत. काही भूभाग कोसळलेला आहे. डोंगरावरील माती सुटलेली असून, मोठे दगडगोटे डोंगरावरून वाहणार्‍या धबधब्याच्या मार्गाने गावच्या दिशेने झेपावलेले आहेत. ज्या भागात डोंगराला भेगा पडलेल्या आहेत, त्या भागाला आपत्ती व्यवस्थापन समितीने भेट देऊन अहवाल सादर केला असला, तरी त्याबाबतीत आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. डोंगराचा बराचसा भूभाग घनदाट झाडांनी व्यापलेला असून, लाल मातीचा व दगड गोट्यांचा आहे. ज्या भागात डोंगराला भेगा पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, त्या भागात छोट्या छोट्या दरडी कोसळलेल्या असून, डोंगरला भेग पडल्याचे स्पष्ट दिसत आहे.

याबाबत गावकर्‍यांशी चर्चा केली असता दरवर्षी पावसाळ्यापूर्वी गावात अधिकारी येतात. पुनर्वसनाच्या चर्चा करतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांत कोणतेही काम झालेले नाही. भीमा नदीच्या पलीकडे मोकळ्या जागेत पुनर्वसन होण्याचे सांगण्यात आले असले, तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. तातडीने आमचे पुनर्वसन करावे. खेडच्या प्रांताधिकारी तसेच तहसीलदारांनी माळीणच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अशा गावांचे सर्वेक्षण सुरू केल्यावर प्रथम नाव आले ते भोमाळे गावचे. मात्र, नाव येऊनही गावकर्‍यांचा प्रश्न काही सुटलेला नाही, अशी खंत सरपंच भोमाळे यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news