भिजव पांडुरंगा आता… माझा सारा गाव तू..!

भिजव पांडुरंगा आता… माझा सारा गाव तू..!

कराड; पुढारी वृत्तसेवा : 

नको पांडुरंगा मला,
सोन्या – चांदीचं दान रे…,
फक्त भिजव पांडुरंगा,
हे तहानलेलं रान रे…
कमरेवरचा हात सोडून,
आभाळाला लाव तू,
ढगाला थोडं हलवून,
भिजव माझा गाव तू…

कोयना धरण अद्यापही पाण्यासाठी तहानलेले व व्याकुळलेले पहायला मिळत आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणात सध्या केवळ 10.82 टीएमसी इतका उपलब्ध पाणीसाठा असून यापैकी केवळ 5.82 टीएमसी इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी कमालीच्या मर्यादा आल्यानंतर कोयना धरणाचा चौथा टप्पा हा तब्बल एक हजार मेगॅवॅट क्षमतेचा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बंद ठेवण्यात आला आहे. गरज व मागणीनुसार पोफळी व अलोरे येथून वीज निर्मिती सुरू असून गेल्या काही महिन्यांपासून सिंचनासाठी अव्याहतपणे पूर्वेकडे सोडण्यात येणारे पाणीही गुरुवारपासून चार दिवस मागणी कमी असल्याने बंद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रासह पूर्वेकडे कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्याच्या सिंचनाची तर निम्म्याहून अधिक महाराष्ट्राच्या विजेची गरज भागवणार्‍या कोयना धरणात सध्या पाण्याचा सार्वत्रिक ठणठणाट पहायला मिळत आहे. धरणाची समुद्रसपाटीपासूनची पाणी उंची 2029.4 फूट इतकी तर जलपातळी 618.541 मीटर इतकी आहे. ही जलपातळी 618 मीटरवर गेल्यानंतर पश्चिमेकडील एक हजार मेगॅवॅट क्षमतेचा कोयना चौथा टप्प्यातील वीज निर्मिती बंद पडते. मात्र यावर्षी त्या अगोदरच गेल्या काही दिवसांपासून ही वीज निर्मिती बंद ठेवण्यात आली आहे. सध्या केवळ पोफळी व अलोरे प्रकल्पातून मागणीनुसार वीज निर्मिती सुरू आहे. दरम्यान सिंचनासाठी कोयना धरण पायथा वीजगृहातून वीज निर्मिती करून तर वेळप्रसंगी आपत्कालीन दरवाजातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत होते. मात्र पूर्वेकडे सध्या सिंचनाची मागणी कमी झाल्याने चार दिवसांसाठी सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी बंद ठेवण्यात आले आहे.

अत्यल्प पाणीसाठ्यामुळे चिंता वाढली…

एक जूनपासून सुरू झालेल्या धरणाच्या नव्या तांत्रिक जलवर्षात आत्तापर्यंत कोयना 77, नवजा 84 व महाबळेश्वर येथे 100 मिलिमीटर इतक्याच अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या एकूण उपलब्ध पाणीसाठा 10.82 टीएमसी म्हणजेच एकूण क्षमतेच्या 10.28 टक्के इतका उपलब्ध पाणीसाठा शिल्लक आहे. तर त्यापैकी 5.82 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news