सिडनी : भारतीय वंशाच्या अनेक नागरिकांनी परदेशात विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कौशल्याचा डंका वाजवला आहे. आता भारतीय वंशाचा जस्टिन नारायण याने 'मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया' हा मानाचा किताब पटकावला आहे. तब्बल 1.8 कोटी रुपयांच्या बक्षिसावर त्याने आपली मोहोर उमटवली.
ही ट्रॉफी जिंकणारा जस्टिन नारायण हा दुसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी शशी चेलियाने या शोमध्ये बाजी मारली होती.'मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया' ही जगातील सर्वात मोठी पाककला स्पर्धा आहे. जगभरातील बल्लवाचार्य यामध्ये आपले पाककौशल्य दाखवण्यासाठी सहभागी होत असतात.
या स्पर्धेत स्पर्धकाच्या पाककलेबरोबरच त्याच्या अन्यही अनेक गुणांचा कस लागत असतो. सलग तेरा वर्षे या स्पर्धेने आपले मानाचे स्थान कायम ठेवले आहे. जस्टिन नारायण हा मूळचा भारतातील असला तरी तो आता ऑस्ट्रेलियाचाच नागरिक आहे. त्याने या शोमध्ये भारतीय खाद्यपदार्थांचे सादरीकरण केले.
यामध्ये लोणचे, कोशिंबीर, चिकन करी, इंडियन चिकन टाकोज, चार्कोल चिकन विथ टॉम वगैरे अनेक पदार्थ त्याने या स्पर्धेत बनवले. हे सर्व पदार्थ परीक्षकांच्या पसंतीस उतरले. ही स्पर्धा जिंकल्यावर त्याला अडीच लाख डॉलर्स म्हणजेच 1.8 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले.