नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : स्वदेशी संरक्षण उपकरणांची तिसरी यादी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी जारी केली. या यादीत 101 हत्यारे आणि उपकरणांचा समावेश आहे. ही उपकरणे आणि हत्यारे यापुढील पाच वर्षांपर्यंत परदेशांतून आयात न करता केवळ स्वदेशी उत्पादकांकडूनच खरेदी केली जातील. भारताला संरक्षण उत्पादन केंद्र बनवण्याचा उद्देश यामागे असल्याचे संरक्षणंत्र्यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले.
स्वदेशीकरणाची सकारात्मक यादी जाहीर करताना आनंद होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत'च्या संकल्पनेच्या दिशेने संरक्षण मंत्रालयाने टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे, अशी भावना सिंह यांनी व्यक्त केली.
53 हजार कोटींचा प्रकल्प
पहिल्या आणि दुसर्या यादीच्या अधिसूचनेनंतर सशस्त्र दलाने तब्बल 53,839 कोटी रुपयांच्या 31 प्रकल्पांच्या करारांवर स्वाक्षरी केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तर 1,77,258 कोटी रुपये किमतीच्या तब्बल 83 प्रकल्पांच्या आवश्यकतेला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय, 2,93,741 कोटी रुपयांची प्रकरणे पुढील पाच-सात वर्षांत प्रगतिपथावर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.फ
क्षेपणास्त्रे, हेलिकॉप्टर्सचा समावेश
संरक्षण मंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या तिसर्या यादीत शस्त्रास्त्र, नौदलाच्या उपयोगाची हेलिकॉप्टर आणि जहाजविरोधी तसेच रेडिएशनविरोधी क्षेपणास्त्रांसह अनेक महत्त्वाच्या प्रणालींचा समावेश आहे. जहाजे आणि पानबुड्यांसाठी इंटरकॉम सिस्टम, अत्याधुनिक ऑफशोअर पॅट्रोल जहाजे, नेव्हल अँटी ड्रोन सिस्टम, मोबाईल ऑटोनॉमस लॉन्चर (ब्राम्होस), हवेतून जमिनीवर मारा करणारे 68 एमएम रॉकेट, ड्रोनला रोखू शकणारी यंत्रणेचा समावेश आहे.
संरक्षण क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेचा अर्थ इतर जगापासून वेगळे होऊन काम करणे असा नाही. याचा अर्थ आपल्या देशात विदेशी फर्मची सक्रिय भागीदारी तसेच समर्थनासोबत काम करणे असा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने घरगुती संरक्षण उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या.
– राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री