भारताच्या ऑलिम्पिक पर्वाचीच नांदी!

भारताच्या ऑलिम्पिक पर्वाचीच नांदी!

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) वार्षिक अधिवेशन पुढील वर्षी भारतात आयोजित केले जाणार आहे. सामान्य वाचकांसाठी कदाचित ही छोटीशी बातमी असेल, पण ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या चाहत्यांसाठी या बातमीचा मथितार्थ खूप महत्त्वपूर्ण आहे. विशेषतः भारताच्या क्रीडा इतिहासात ती एक महत्त्वपूर्ण घटना असणार आहे. भारतामध्ये नजीकच्या काळात ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी ती नांदीच असणार आहे.

आयओसीचे दरवर्षी अधिवेशन आयोजित केले जाते. त्यामध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांबाबत वेगवेगळ्या नियमावलीमध्ये बदल करणे, काही सुधारणा करणे, आयओसी सदस्य आणि पदाधिकारी निवडणे तसेच ऑलिम्पिकच्या यजमान शहराची निवड करणे यासारख्या ऑलिम्पिक चळवळीविषयी असणार्‍या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली जात असते आणि भविष्यकाळातील वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णयही घेतले जातात.

भारतात यापूर्वी 1983 मध्ये या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशनाचे ठिकाण ठरविण्यासाठीही रीतसर मतदान होते. भारतातर्फे पुढील वर्षीच्या अधिवेशनाच्या संयोजनासाठी जो प्रस्ताव मांडण्यात आला, त्यास 99 टक्के सदस्यांनी भारताच्या बाजूने कौल दिला. भारताच्या द़ृष्टीने हा एक ऐतिहासिक विजयच आहे. त्याचे श्रेय आयओसीवर प्रतिनिधित्व करणार्‍या भारताच्या एकमेव महिला सदस्य श्रीमती नीता अंबानी, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए)चे अध्यक्ष डॉ. नरिंदर बात्रा, युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुरागसिंग ठाकूर, भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांचा समावेश असलेल्या भारतीय शिष्टमंडळाकडे जाते. बीजिंगमध्ये हिवाळी ऑलिम्पिकबरोबरीने आयोजित केलेल्या आयओसीच्या सत्रादरम्यान या शिष्टमंडळाने अधिवेशनाच्या संयोजन पदाबाबत एक अत्यंत प्रभावी आणि पटवून देणारे सादरीकरण केले. टोकियो येथे गतवर्षी आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतर झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले, त्याचाही अप्रत्यक्ष परिणाम भारताच्या बाजूने निर्णय मिळविण्यासाठी झाला.

भारतात आयोजित केल्या जाणार्‍या अधिवेशनाबाबत खूप सारे कंगोरे आहेत. ऑलिम्पिक युवा क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचे भारतीय क्रीडा संघटकांचे स्वप्न आहे. त्याखेरीज जगभर लोकप्रिय असलेल्या क्रिकेट खेळाचा समावेश ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये होण्यासाठीही क्रिकेट संघटक उत्सुक आहेत. याबाबत या अधिवेशनात निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच आयओसीच्या वेगवेगळ्या समित्या असतात, त्या समित्यांवर भारतीय क्रीडा संघटकांना स्थान मिळवण्यासाठीही हे अधिवेशन उपयुक्त ठरणार आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक वेळेला वेगवेगळे प्रयोग भारतामध्ये केले जातात आणि कालांतराने अन्य देशांमध्येही त्याचे अनुकरण केले जाते.

ऑलिम्पिक क्रीडा प्रवाहापासून भारतीय खेळाडू खूपच दूर आहेत, असे आपण नेहमी म्हणतो. परंतु गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये भारतीय क्रीडा क्षेत्रात खूपच सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठीच प्रत्येक खेळाडू स्वप्न पाहत असतो आणि त्याचे हे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह सर्वच संबंधित घटकांचेही त्याला सहकार्य मिळत आहे. वैद्यकीय खर्चावर होणार्‍या आर्थिक गुंतवणुकीऐवजी जर वेगवेगळे क्रीडा प्रकार व शारीरिक तंदुरुस्तीसाठी गुंतवणूक केली गेली, तर खूपच आर्थिक बचत होत असते. जीवन निरोगी होण्यासाठीही मदत होत असते, हे लोकांना आता कळू लागले आहे. निरोगी भारत चळवळीअंतर्गत नियमित व्यायाम करण्यासाठी लोक वेळ देऊ लागले आहेत. आपल्या पाल्यांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठीही प्रोत्साहन देऊ लागले आहेत. क्रीडाक्षेत्र ही सक्षम व चांगले उत्पन्न देणारे करिअर होऊ लागले आहे, याची जाणीव सर्वांनाच होऊ लागली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धांच्या इतिहासातील पहिली आशियाई स्पर्धा सन 1951 मध्ये भारतात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ही स्पर्धा आशियाई अजिंक्यपद स्पर्धा म्हणून आयोजित करण्यात आली होती. कालांतराने आशियाई ऑलिम्पिक समितीतर्फे आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची पहिली स्पर्धा नवी दिल्ली येथे 1982 मध्ये आयोजित करण्यात आली. तेव्हापासूनच खर्‍या अर्थाने आपल्या देशात क्रीडा क्षेत्राला चालना मिळाली. भारतीय लोक आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय दिमाखात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करतात, हे त्यानिमित्ताने सिद्ध झाले. त्यानंतर सन 2008 ची राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा आणि सन 2010 ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तसेच जागतिक स्तरावरील अनेक खेळांच्या स्पर्धा, फ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धा इत्यादी स्पर्धांच्या यशस्वी संयोजनामुळे भारत हा क्रीडा क्षेत्रातील मोठी सत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल इत्यादी खेळांच्या जागतिक स्पर्धाही कशा मोठ्या दिमाखात आयोजित केल्या जाऊ शकतात, हे भारतीय क्रीडा संघटकांनी दाखवून दिले आहे.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, हे भारतीय क्रीडा संघटकांना जगाला दाखवून द्यायचे आहे. त्याद़ृष्टीनेच सन 2030 ची ऑलिम्पिक युवा स्पर्धा आणि 2036 मध्ये आयोजित केली जाणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, या दोन्ही स्पर्धांच्या संयोजनासाठी भारत प्रमुख दावेदार मानला जात आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने जागतिक दर्जाची क्रीडा संकुले आणि सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्याखेरीज अहमदाबाद येथे मोठे क्रीडा संकुल निर्माण केले जात आहे.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे संयोजनपद मिळविण्यासाठीच अहमदाबादचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांबाबत ते नेहमीच सकारात्मक विचार करीत असतात. टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा आणि पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या तसेच त्यानंतर पदक जिंकणार्‍या प्रत्येक खेळाडूबरोबर त्यांनी वैयक्तिकरीत्या संवाद साधला होता. ऑलिम्पिक स्पर्धांसाठी त्यांनी दिलेल्या शुभेच्छा म्हणजे आपल्यावर पदक मिळवण्याची मोठी जबाबदारीच आहे, असे ओळखूनच प्रत्येक खेळाडूने प्रयत्न केले होते. त्यामुळेच या स्पर्धांमध्ये भारताला ऐतिहासिक यश मिळाले होते. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या संयोजनासाठी मोदी हे स्वतः जातीने लक्ष घालून निश्चितच प्रयत्न करतील, ही अपेक्षा आहेच. या स्पर्धांच्या संयोजनासाठी लागेल तेवढी आर्थिक तरतूद ते करतील, अशी भारतीय क्रीडा संघटकांनाही खात्री आहे. तसेच वेळप्रसंगी स्वतंत्ररीत्या या स्पर्धांच्या संयोजनाची जबाबदारी तांत्रिक आणि आर्थिकद़ृष्ट्या घेण्याचीही ताकद अंबानी समूहाकडे आहे.

क्रिकेट हा भारतीयांसाठी श्वास किंवा धर्म मानला जातो. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये यापूर्वीच क्रिकेटला स्थान मिळाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे फारसे या स्पर्धांबाबत गांभीर्याने घेत नाहीत. मात्र स्वतः नीता अंबानी या मुंबई इंडियन्स संघाच्या सर्वेसर्वा मानल्या जातात. जर क्रिकेटचा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समावेश झाला, तर निश्चितपणे भारतीय संघाचे एक पदक निश्चित होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतही भारतीय संघटकांना महत्त्वाचे स्थान असते. क्रिकेटच्या समावेशामुळे ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रिकेट संघटकांनाही हुकुमत गाजवता येईल. ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाकडे अशा वेगवेगळ्या द़ृष्टिकोनातून पाहिले, तर हे अधिवेशन भारतात खर्‍या अर्थाने 'ऑलिम्पिक पर्व' निर्माण होण्याची नांदी आहे, असे म्हणावे लागेल.

अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या यशस्वी संयोजनामुळे भारत हा क्रीडा क्षेत्रातील मोठी सत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, हे भारतीय क्रीडा संघटकांना जगाला दाखवून द्यायचे आहे. त्याद़ृष्टीनेच सन 2030 ची ऑलिम्पिक युवा स्पर्धा आणि 2036 मध्ये आयोजित केली जाणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, या दोन्ही स्पर्धांच्या संयोजनासाठी भारत प्रमुख दावेदार मानला जात आहे.

मिलिंद ढमढेरे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news