भाजपचा लोकसभेचा मार्ग प्रशस्त

भाजपचा लोकसभेचा मार्ग प्रशस्त

2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल मानल्या जाणार्‍या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने चार राज्यांमध्ये सत्ता राखली. आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

बहुप्रतीक्षित 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजप आणि आम आदमी पार्टीच्या चेहर्‍यावर हसू उमटवले असून, काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्षासह अनेक लहान-मोठ्या पक्षांचा हिरमोड केला आहे. विशेषतः काँग्रेस आणि सपसाठी हे निकाल धक्कादायक आहेत. दोन वर्षांनी 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीतील विजयासाठीचा भाजपचा मार्ग या निकालाने प्रशस्त केला आहे. काँग्रेसची नाव आणखी गर्तेत गेली आहे. तिकडे पंजाबमध्ये ऐतिहासिक विजय प्राप्त करणार्‍या आम आदमी पक्षाला देशव्यापी विस्तार करण्याची मोठी संधी आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांचे निकाल मतदानोत्तर चाचण्यांच्या अनुसार आले असले, तरी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये क्रमशः भाजप व 'आप'चा इतका दणदणीत विजय होईल, याची अपेक्षा कोणीही केली नसावी. पंजाबातील 'आप'च्या विजयाने दिल्लीतील केजरीवाल यांच्या पक्षाच्या देदीप्यमान विजयाची आठवण ताजी झाली आहे. उत्तर प्रदेशचा किल्ला जिंकणे भाजपसाठी अत्यंत आवश्यक होते. देशाच्या राजकारणात या राज्याचे असलेले महत्त्व त्यामागे आहे. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. हे लक्षात घेऊनच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशसाठी व्यूहरचना केली होती. देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना बसवायचे असेल, तर राज्यात भाजपची सत्ता येणे गरजेचे असल्याचा संदेश त्यांनी निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला दिला होता. शेतकरी आंदोलनासारखा संवेदनशील मुद्दा तसेच यादव-जाट-मुस्लिम मतांचे समीकरण साधण्यासाठी अखिलेश यादव यांनी केलेली सप-रालोद आघाडी याविरोधात जाणार्‍या बाबी असूनही भाजपने चतूरपणे चक्रव्यूह रचून सप आघाडीला चित केले.

काँग्रेससाठी सर्वच राज्यांतले निकाल निराशाजनक आले आहेत. पंजाबमध्ये सरकार गमावल्यानंतर आता हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या राज्यांत काँग्रेसची सरकारे राहिली आहेत. गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये चमत्कार होईल, अशी काँग्रेसला आशा होती; पण येथील जनतेनेदेखील काँग्रेसला नाकारले आहे. वारंवारच्या अपयशावर आता काँग्रेसला आत्मचिंतन करावे लागणार आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी-वढेरा यांनी 40 टक्के तिकिटे महिलांना दिली होती. हा डाव काँग्रेसच्या अंगलट आला. पाच राज्यांतील नामुष्कीजनक पराभवानंतर लोकसभेसाठीची काँग्रेसची वाटचाल आणखी बिकट बनली आहे. याचा फायदा प्रादेशिक पक्षांबरोबरच भाजपला होऊ शकतो.

पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्यासारख्या धुरंदर नेत्याची काँग्रेसने कदर केली नाही. गटातटात विखुरल्या गेलेल्या काँग्रेसी नेत्यांना आम आदमी पक्ष दिवसेंदिवस किती मोठा होत चालला आहे, याचा अंदाजच आला नाही. त्याचा दुष्परिणाम आता काँग्रेसला भोगावा लागला आहे. तिकडे भाजपच्या मदतीने निवडणूक लढलेल्या अमरिंदर सिंग यांना आपला करिश्मा दाखविता आला नाही, तर सत्तेच्या राजकारणातून दूरवर फेकल्या गेलेल्या शिरोमणी अकाली दलाची आणखी पीछेहाट झाली आहे. शेतकरी आंदोलनाचे श्रेय उपटण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकला होता. त्यांना देखील पंजाबच्या जनतेने झिडकारून लावले. उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर ही तुलनेने छोटी राज्ये असली, तरी उत्तराखंड, गोवा या राज्यांत 'आप'ने आपली हवा तयार केली होती. दुसरीकडे काँग्रेसनेही आपली शक्ती पणाला लावली होती; पण अपेक्षित यश मिळवता आले नाही.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचे देशाच्या राजकारणावर दीर्घकाळ परिणाम होणार आहेत. राज्यसभेतील भाजपचे संख्याबळ यामुळे बर्‍यापैकी अबाधित राहणार आहे. येत्या काही महिन्यांत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आपल्या उमेदवाराला विजयी करणे भाजपला सोपे जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे गृह राज्य असलेल्या गुजरात, तसेच हिमाचल प्रदेश या दोन राज्यांत चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा कल कसा राहणार, हेही पाच राज्यांच्या निकालाने स्पष्ट केले आहे.

– श्रीराम जोशी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news