गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या दणदणीत विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची गुजरातच्या राजकारणावर मजबूत पकड असल्याचे सिद्ध झाले आहे. भाजपचा हा ऐतिहासिक विजय म्हणता येईल असा आहे. त्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे, सलग सातव्यांदा भाजपने गुजरातमध्ये सत्ता मिळवली आहे आणि दुसरी म्हणजे, 1985 साली माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 149 जागा मिळवल्या होत्या, त्याहून अधिक जागा यावेळी भाजपने मिळवल्या आहेत. भाजपला यापूर्वी मिळालेल्या सर्वाधिक जागा 127 होत्या, ज्या 2002च्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या. त्यानंतर गुजरातच्या आणि देशाच्या राजकारणातही पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. गुजरातच्या जनतेने भाजपच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले आहे. याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावरील विश्वास. देशाच्या राजकारणाचे नेतृत्व करणार्या या दोन्ही प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली होती. त्यांना देशाच्या राजकारणात ताकद द्यावयाची असेल तर गुजरातने अग्रभागी राहायला हवेे, या भूमिकेतून गुजरातच्या जनतेने भाजपची पाठराखण केलेली दिसते. गुजरातमधील अनेक दुरवस्था समोर आल्या असल्या तरी आर्थिक पातळीवरील गुजरातची घोडदौड कुणीही नाकारू शकणार नाही. जपानचे शिंजो अॅबे, चीनचे शी जिनपिंग, इंग्लंडचे बोरिस जॉन्सन किंवा अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक नेते भारतात आले तेव्हा त्यांना प्राधान्याने गुजरातमध्ये नेण्यात आले. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम गुजरातमध्ये उभारण्यात आले. गुजरातला उद्योगस्नेही राज्य बनविण्यात नेहमीच प्राधान्याने विचार करण्यात आला. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस हे प्रकल्प ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुजरातला हलविण्यात आले, यावरून उद्योगधंद्यांबाबत गुजरातचे राज्यकर्ते किती संवेदनशील आहेत हे दिसून येते. माधवसिंह सोलंकी यांच्याहून मोठे यश मिळवण्याचे भाजपचे स्वप्न होते आणि पंतप्रधान मोदी यांनी जाहीरपणे ते बोलून दाखवले होते. भाजपचे नेतृत्व जे बोलून दाखवते ते करून दाखविण्यासाठी जीवाचे रान करते. 150 हून अधिक जागा जिंकण्याचे स्वप्न 2017 मध्ये अमित शहा यांनी बोलून दाखविले होते. त्यावेळी ते पूर्ण होऊ शकले नव्हते. यावेळीही गुजरात भाजपच्या कार्यकर्त्यांना तेच स्वप्न दाखविताना, 'नरेंद्रचा (मोदी) विक्रम भूपेंद्र (पटेल) मोडणार,' असा विश्वास स्वतः मोदी यांनी व्यक्त केला होता, तो सार्थसुद्धा करून दाखविला.
काँग्रेसची गुजरातमध्ये जी वाताहत झाली आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांनी गुजरातकडे दुर्लक्ष केले. आणि राहुल गांधी नाहीत म्हटल्यावर काँग्रेसच्या अन्य नेत्यांनीही निवडणूक फारशी गांभीर्याने घेतली नाही. काँग्रेसने ज्यांचा अध्यक्षपदासाठी विचार केला होता, त्या अशोक गेहलोत यांच्याकडे गुजरात निवडणुकीची जबाबदारी होती; परंतु त्यांनी गुजरातचा प्रचार करता करता आपले राजस्थानातील प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांच्यावर नेम साधण्यापलीकडे दुसरे काहीही केले नाही. त्याचमुळे काँग्रेसला गुजरात विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी आवश्यक 19 जागाही मिळत नसल्याचे चित्र आहे. 2017 मध्ये मिळालेल्या 77 जागांवरून झालेली घसरण चिंताजनक आहे. आम आदमी पक्षाने पहिल्याच प्रयत्नात लक्षवेधी यश मिळवले असले तरी जे वातावरण निर्माण केले होते, त्या तुलनेत यश किरकोळ आहे. मतांची आकडेवारी पाहता आम आदमी पक्षाने काँग्रेसच्या मतांवर डल्ला मारून कामगिरी फत्ते केली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकीकडे गुजरातमध्ये धूळधाण झाली असताना काँग्रेसने हिमाचल प्रदेशात मात्र सत्ता काबीज करून वादळात दिवा लावला आहे. काँग्रेससाठी सगळ्याच बाजूंनी परिस्थिती प्रतिकूल असताना हे यश मिळाले असल्यामुळे त्या यशाची लज्जत काही और आहे. राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत प्रियांका गांधी यांनी हिमाचल प्रदेशात प्रचार केला. दर पाच वर्षांनी सत्ताबदल करण्याची परंपरा हिमाचलच्या मतदारांनी कायम राखताना भाजपला सत्तेवरून खाली खेचले. अर्थात, हे मिळालेले यश नीटपणे पचवून गटबाजीला थारा न देता राज्य केले तरच त्याचा फायदा पक्षाला होऊ शकेल. हिमाचल प्रदेशातही काँग्रेसकडे फारशी साधनसामग्री नव्हती; परंतु तेथील निवडणुका स्थानिक प्रश्नांवर लढवल्या गेल्या आणि त्यांचा फोकस राष्ट्रीय प्रश्नांकडे सरकला नाही. त्यामुळे भाजपला रोखणे तेथे काँग्रेसला शक्य झाले.
सत्ताबदलाची परंपरा मोडून सलग दुसर्यांदा सत्ता मिळवण्याचे भाजपचे इरादे यशस्वी होऊ शकले नाहीत. हिमाचलमधील विजय काँग्रेससाठी निश्चितच दिलासादायक आहे. कारण, देशाच्या नकाशावर काँग्रेसच्या सत्तेचे राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये दोनच ठिपके दिसत होते. त्यांची संख्या तीन झाली आहे. शिवाय भाजपच्या भगव्या रंगाचा एक ठिपका कमी झाला आहे. आम आदमी पक्षाने दोन्ही राज्यांमध्ये ताकद लावली होती, त्यांना गुजरातमध्ये यश मिळाले; परंतु हिमाचलमध्ये खातेही उघडता आले नाही. गुजरातमध्ये काँग्रेसला आजवर जागा कितीही मिळाल्या तरी टक्केवारी 40 च्या जवळपास आसायची, ती आता 27 पर्यंत खाली आली आहे आणि वरची 13 टक्के मते आम आदमी पक्षाने घेतलेली दिसतात. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर गुजरातमधील ऐतिहासिक विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय पातळीवर निश्चितपणे ताकद देणारा ठरेल.