भविष्यातील रोजगार निर्मितीत ‘हरित ऊर्जे’चा मोठा हातभार : अनुराग ठाकूर

भविष्यातील रोजगार निर्मितीत ‘हरित ऊर्जे’चा मोठा हातभार : अनुराग ठाकूर
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने हरित हायड्रोजन करीता अर्थसंकल्पात ३७ हजार कोटींची तरतूद केली आहे. स्थानिक पातळीवरील आवश्यकता त्यामुळे पूर्ण होईल. 'हरित ऊर्जा' भविष्यातील उर्जेचा मोठा स्त्रोत ठरेल. रोजगार निर्मिती तसेच प्रदूषण कमी करण्यात सरकारच्या या पुढाकाराचा बराच फायदा होईल, असा विश्वास केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी 'दै. पुढारी' सोबत बोलताना व्यक्त केला. हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे देशात आठ लाख कोटींपर्यंत गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने 'हरित अर्थव्यवस्थे'ची रुपरेषा तयार केली जात असल्याचे ठाकूर म्हणाले.

केंद्राचा अर्थसंकल्प देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा असून त्यातून अमृत काळापासून स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षापर्यंत विकसित भारताच्या ब्लू प्रिंटचे प्रतिबिंब दिसून येते. शेती संबंधी आतापर्यंत १ हजार कोटींची तरतूद केली जात होती. पंरतु, गेल्या आठ वर्षांपासून त्यात तीन पटीने वाढ झाली आहे. आतापर्यंत सरकारने ३ हजार ३८७ कोटी रुपये शेती करीता वाटप केले आहेत. यासोबतच देशातील खेळाडू आणि खेळांसाठी सुविधेत वाढ केली जात आहे. प्रशासकीय पातळीवर ४५० कोचची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकार १ हजार 'खेलो इंडिया सेंटर' उभारणार आहे. 'मलखांब'ला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळ बनवण्याच्या दिशेने काम सुरू असल्याचे देखील ठाकूर यांनी म्हटलं आहे.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.०, नॅशनल अप्रेंटिस योजनेअंतर्गत ४७ लाख युवकांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. युवकांना कौशल्य संपन्न बनवण्यासाठी विविध राज्यात ३० स्किल इंडिया आंतरराष्ट्रीय केंद्राची स्थापना करण्यात येईल. एकीकृत स्कील इंडिया डिजिटल प्लॅटफॉर्म, छोटे तसेच मध्यम उद्योजकांना विनातारण दोन कोटींपर्यंतचे क्रेडिट देण्याचा प्रस्ताव युवकांच्या स्वप्नांना गती देईल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news