भगवद‍्गीतेतील राजविद्या

भगवद‍्गीतेतील राजविद्या
Published on
Updated on

मार्गशीर्ष शुक्‍ल एकादशीला 'मोक्षदा एकादशी' असे सार्थ नाव आहे. याच तिथीला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली असे मानले जाते. गीता जयंती निमित्त…

महाभारताच्या भीष्मपर्वात अवघ्या सातशे श्‍लोकांमधून श्रीकृष्णार्जुन संवादरूपातून समोर येणारी भगवद‍्गीता ( गीता जयंती ) ब्रह्मरसाने ओतप्रोत भरलेलीच आहे. त्यामधील अनेक अध्याय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गीतेच्या नवव्या अध्यायाचे शीर्षक 'राजविद्या राजगुह्य योग' असे आहे. खरे तर संपूर्ण गीतेमध्येच राजविद्या म्हणजेच ब्रह्मविद्या सांगितलेली असली तरी या अध्यायात भगवंतांनी स्वतःच 'मी राजविद्या सांगतो' असे म्हटलेले असल्याने त्याला एक वेगळे महत्त्व आहे!

ही केवळ राजविद्या नसून ते 'राजगुह्य'ही आहे. याचा अर्थ सर्व प्रकारच्या रहस्यांमधील सर्वश्रेष्ठ असे रहस्य. कोणतेही रहस्य ज्या व्यक्‍तीसमोर प्रकट करायचे असते, त्याची तशी पात्रताही असावी लागते, मग राजगुह्य प्रकट करण्यासाठीही निश्‍चितच तशी पात्रता हवी. नवव्या अध्यायाच्या पहिल्याच श्‍लोकात ही पात्रता भगवंतांनी स्पष्ट केलेली आहे. जो असुयारहित, दोषदृष्टीरहित आहे, त्याला ही राजविद्या आणि राजगुह्य सांगितले जाते. अर्जुन तसाच ऋजू स्वभावाचा भक्‍त होता आणि म्हणूनच भगवंतांनी त्याला ही विद्या दिली. या संपूर्ण अध्यायात अर्जुनाने कोणताही प्रश्‍न विचारलेला नाही. स्वतः भगवंतच या असुयारहित सद्भक्‍ताला भरभरून राजविद्येचे दान करीत आहेत. हे ज्ञान विज्ञानासहित म्हणजेच अनुभवासहित असून, ते भवबंधातून मुक्‍त करणारे आहे. दुसर्‍या श्‍लोकातही भगवंतांनी हे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवास येणारे असल्याचे सांगून ही केवळ पढिक विद्या नसल्याचेच पुन्हा सुचवले आहे. अर्थात कोणतेही ज्ञान किंवा विद्या घेण्यासाठी श्रद्धा आवश्यकच असते. गीतेतच म्हटले आहे की, 'श्रद्धावान लभते ज्ञानम्' (श्रद्धावानालाच ज्ञान मिळते) आणि 'संशयात्मा विनश्यति' (संशय घेणार्‍याचे पतन होते) त्यामुळे भगवंतांनी या नवव्या अध्यायातही म्हटले आहे की, श्रद्धा नसेल तर हे आत्मज्ञान लाभू शकत नाही आणि जन्म-मृत्यूच्या संसारसागरात खितपत पडावे लागते. ही राजविद्या म्हणजे स्वस्वरुपाचीच विद्या आहे. सर्व जगाचे ज्ञान झाले आणि स्वतःचीच ओळख झाली नाही तर सर्व व्यर्थ आहे! मात्र, उपनिषदांनीच म्हटल्याप्रमाणे आपली इंद्रिये बहिर्मुख असल्याने आपल्या मनाची धावही बाह्यविषयांकडेच घेत असते. क्‍वचितच कुणी अंतर्मुख होऊन स्वतःचा शोध घेत असतो व अंतर्यामी दडलेली आत्मवस्तू शोधून काढतो. सर्व चराचराला व्यापून राहिलेले एकच एक परमचैतन्यच सर्वांतर्यामीही असते. त्यामुळे स्वतःची ओळख झाली की, आपोआपच सर्वांचीही ओळख होते. मुंडक उपनिषदासारख्या अनेक उपनिषदांमध्ये हे स्पष्ट केलेले आहे. अर्थातच, ही आत्मवस्तू सर्वात गूढ आहे आणि त्यामुळेच तिचे ज्ञान देणारी ब्रह्मविद्या हीच राजविद्याही आहे. भगवंतांनी या अध्यायात सुरुवातीलाच स्पष्ट केले की, मी माझ्या अव्यक्‍त रूपाने सर्व काही व्यापून आहे. जसा सर्वत्र फिरणारा वायू आकाशातच स्थित असतो, तसे सर्व भूतमात्र माझ्यामध्येच स्थित आहेत, असे भगवंतांनी स्पष्टपणे म्हटले आहे. खरे तर माझ्या अधिष्ठानावरच त्रिगुणमयी माया, प्रकृती या नाम-रूप-कर्मात्मक जगताची रचना करते. केवळ मूर्ख लोकच अंतर्यामी असलेल्या या आत्मवस्तूला पाहण्याऐवजी मानुषी देहालाच पाहत असतात. देहात्म बुद्धी ठेवून केलेली सर्व कर्मे व्यर्थच असतात. मात्र, दैवी प्रकृतीच्या आश्रयाला असलेले महात्मे या मूळ तत्त्वाची उपासना करतात. हेच मूळ तत्त्व सर्व नाम-रूपात्मक जगताची माता आणि पिताही आहे. तेच सर्वरूप आहे, सर्वांचा भरणपोषणकर्ता, साक्षी, सुहृत, निवासस्थान आहे. आत्मज्ञानाऐवजी केवळ लौकिक भोगासाठी स्वर्गप्राप्तीची इच्छा करणारे पुण्य क्षीण झाले की, पुन्हा या मृत्यूलोकातच येतात आणि त्यांच्या अशा येरझार्‍या सुरूच राहतात. सर्व देवतांमधील मूळ एकत्व लक्षात न घेता, त्यांच्यामध्ये भेद करून विविध फळे मागणार्‍यांची भौतिक फळेही नाशिवंतच असतात. परमेश्‍वराला भक्‍तांकडून केवळ प्रेमाची, भक्‍तीचीच अपेक्षा असते. त्यामुळे भक्‍ताने प्रेमाने दिलेले एखादे पान, फूल किंवा पाणीही तो स्वीकारतो. देहात्मबुद्धीने कोणतेही कर्म करण्याऐवजी जर 'मी म्हणजे हा देह नाही', हे जाणून सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली की, कर्मजन्य शुभ-अशुभ फळे, पाप-पुण्यापासून मुक्‍त राहून स्वस्वरुपाची प्राप्ती होते. अशा या ज्ञानदा भक्‍तीचा, परमार्थाचा सर्व स्त्री-पुरुषांना आणि अगदी दुराचारी म्हटल्या जाणार्‍या लोकांनाही अधिकार असून, यामुळे ते सर्व उद्धरून जाऊ शकतात, असेही भगवंतांनी या अध्यायात स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळेच सर्वांना 'आत्मपरायण' होण्याचा उपदेश भगवंतांनी शेवटी केला आहे. हेच सर्वव्यापी परमतत्त्व भगवान श्रीकृष्ण या सुंदर सगुण, साकाररूपाने अवतरीत झाले होते. गीता जयंतीनिमित्त या महान ज्ञानग्रंथाला आणि त्याचे दान करणार्‍या जगद‍्गुरू भगवान श्रीकृष्णाला शतशः वंदन!

– सचिन बनछोडे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news