पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (सोमवार) सकाळी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी आम्ही कोणाला घाबरलेलो नाही. आमच्यात काय धमक आहे ते आम्ही पाच महिन्यांपूर्वी दाखवून दिले आहे. टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी देखील त्याचा अनुभव घेतला आहे. अजुनही कोणताही दौरा रद्द केलेला नाही. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
आज सकाळी संजय राऊत यांनी राज्यात मिळमिळीत धोरण असलेले सरकार महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत भूमिकाच घेवू शकत नाही. चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांना घटनात्मक दर्जा आहे, सुरक्षा आहे. या मंत्र्यांनी सीमारेषेला स्पर्श तरी करून यावे. पण ते फक्त बोलतात, त्यांच्यात हिंमत नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली होती.
त्यावर शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा सनदशीर मार्गाने सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सीमाभागातील जनतेशी चर्चा करण्यासाठी आम्ही चाललो आहे. या दौऱ्याबाबत कर्नाटक सरकारला कळवलं आहे. संजय राऊत यांनी बाता मारू नयेत अशी टीका देसाई यांनी यावेळी केली.
सीमाभागातील जनतेला सर्व पायाभूत सुविधा देण्यासाठी आमचे सरकार कोठेही कमी पडणार नाही. अजुन आम्ही बेळगाव दौरा रद्द केलेला नाही असे सांगत, शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे म्हटले.
हेही वाचा :