बांधकाम उद्योगाला बूस्ट! कोल्हापुरात गुंतवणुकीचा टक्का वाढतोय

बांधकाम उद्योगाला बूस्ट! कोल्हापुरात गुंतवणुकीचा टक्का वाढतोय
Published on
Updated on

कोल्हापूर; सचिन टिपकुर्ले : बाहेर कुठेही घर किंवा फ्लॅट असला तरी कोल्हापुरात छोटेखानी घर किंवा फ्लॅट असावा, असे अनेकांचे स्वप्न असते. ग्राहकांच्या स्वप्नाला गुणवत्ता व सेवेचा नवा आयाम देत बांधकाम क्षेत्राला चालना देण्याचे काम कोल्हापुरात जोमाने सुरू आहे. 'सेकंड होम' ही संकल्पना कोल्हापुरात रुजू होऊ पाहत असून गुंतवणुकीचा टक्का वाढतो आहे. कोल्हापूरची उत्तम भौगोलिक स्थिती, हवामान, खव्वये आणि रांगडे असे परिपूर्ण कोल्हापूर आता बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांना आवाहन करत आहे. कोल्हापुरात घर, प्लॉट, फ्लॅट घेण्याची इच्छा असेल तर अगदी 20 लाख रुपयांपासून वन-बीएचके मिळू शकतो. प्रशस्त, एैसपैस, शहरात कुठेही वाहतुकीचा त्रास नाही. इतर शहरांच्या तुलनेत राहणीमान खर्च अत्यंत कमी आहे. पुणे-बंगळूर हायवे असणार्‍या कोल्हापुरात गुंतवणूक वाढत चालली आहे. या सर्व गोष्टी सकारात्मक आहेत. अन्य शहरांच्या तुलनेत आजही कोल्हापुरात राहणीमानाचा खर्च व घर बांधकामातील गुंतवणूक अत्यंत कमी किमतीची आहे.

कोल्हापुरात दीडशेहून अधिक प्रकल्प प्रगतिपथावर

कोरोना काळात काही अपूर्ण असणारे प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. नव्याने दीडशेहून अधिक प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये गृह प्रकल्प, अपार्टमेंट, बंगलो, रो-बंगलोंचा समावेश आहे. या क्षेत्रात नव्याने गुंंतवणूक वाढत चालली आहे. केवळ शहरातच नव्हे तर शहरालगतच्या निसर्गरम्य परिसरात अनेक गृह प्रकल्प साकारत आहेत. कोल्हापूर विमानतळाचा प्रश्न मार्गी लागत आहे. सध्या काही प्रमाणात विमानांचे उड्डाण सुरू आहे. विमानांना नाईट लँडिंगची सोय लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर हे जागतिक नकाशावर झळकणार आहे. उद्योग, व्यापार, फौंड्री उद्योगांमुळे कोल्हापूरकडे अन्य राज्यांतील लोक आकर्षित होत आहेत.

रेडीरेकनर वाढला

राज्य शासनाने नुकतेच वार्षिक मूल्यदर तक्ते जाहीर केले. यात कोल्हापुरात रेडीरेकनरची सरासरी वाढ 6.45 टक्के इतकी करण्यात आली आहे. यापूर्वी ज्या प्रकल्पांचे काम सुरू होते, अशा प्रकल्पांत गुंतवणूक केलेल्यांना याचा लाभ होणार आहे. अनेक बँका रेडीरेकनर दरावर, तर काही बाजारभाव दराप्रमाणे कर्ज प्रकरणे मंजूर करतात.

पर्यावरणाचा राखला जातोय समतोल

ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणपूरक बांधकामांचा कल वाढत चालला आहे. शासनाच्या वतीने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जात आहे. यात बांधकाम व्यासायिकांचे योगदान मोलाचे आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगची संकल्पनादेखील अमलात आणली जातेय. पर्यावरणीय उपायांचा वापर बांधकाम क्षेत्रात व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच वाळूला पर्याय म्हणून क्रश सँड वापरली जात आहे. अपारंपरिकऊर्जास्रोतांचा वापर करून स्वप्नातील घराला घरपण दिले जात असल्याने कोल्हापुरात बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक वाढत चालली आहे.

स्टॅम्प ड्युटीचा निर्णय चांगला

कोरोना काळात जमीन, प्लॉट, फ्लॅट, बंगले आदींचे खरेदी-विक्री व्यवहार मंदावले, तेव्हा विविध बांधकाम संघटनांनी स्टॅम्प ड्युटी सवलत योजनेसाठी शासनाकडे आग्रह धरला. शासनाने त्यास मान्यता दिल्यानंतर या क्षेत्रात उलाढाल वाढली. त्यामुळे अर्थकारणाला चालना मिळाली आहे.

रेरा कायद्याचा प्रभावी अंमल

रेरा कायदा होण्यासाठी क्रिडाईचा आग्रह होता. चांगल्या पद्धतीची नियमावली बांधकाम क्षेत्राला मदत करणारी आहे. ग्राहकांची फसवणूक होत नाही आणि रेरा नोंदणीमुळे बांधकाम व्यावसायिकांबद्दलची विश्वासार्हता कायम राहते. कोरोना काळात बांधकामे थांबली होती. यावेळी रेराची मुदत वाढवली. रेरा कायद्याचा उपयोग आता बांधकाम क्षेत्र आणि ग्राहकांनाही होत आहे. कोल्हापुरातील बहुतेक बांधकाम व्यावसायिक रेरामध्ये नोंदणी करतातच.

कोल्हापूरला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षी लाखो भाविक अंबाबाई, जोतिबा दर्शनाला येतात. पन्हाळा, खिद्रापूरला भेट देतात. गोवा, कर्नाटकला जाणारे लोक कोल्हापुरातून जातात. त्यामुळे कोल्हापूरचे महत्त्व अधोरेखित होत असून, कोल्हापुरात आपले घर असावे, अशी इच्छा असणारे कोल्हापूर व परिसरातील बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक करत आहेत.
– राजीव परिख, माजी अध्यक्ष, क्रिडाई महाराष्ट्र

पूर्वीच्या तुलनेत कोकणशी कोल्हापूरचे नाते रेल्वेने जोडले जाणार आहे. कोकण, कर्नाटकला जवळचा जिल्हा म्हणजे कोल्हापूर होय. उद्योग क्षेत्राच्या वाढत्या विस्तारामुळे कोल्हापुरात गृह प्रकल्पांतील गुंतवणूक फायद्याची ठरणार आहे.
– विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष, क्रिडाई कोल्हापूर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news