बांगला देश मुक्‍ती युद्ध सुवर्ण दिन : तिन्ही दलांच्या समन्वयाने आपण जिंकलो

बांगला देश मुक्‍ती युद्ध सुवर्ण दिन : तिन्ही दलांच्या समन्वयाने आपण जिंकलो

पाकिस्तानवर भारताच्या निर्णायक लढाईच्या विजयाला 16 डिसेंबरला पन्‍नास वर्षे झाली. (बांगला देश मुक्‍ती युद्ध सुवर्ण दिन) 'त्या' विजयाची आठवण झाली की, अंगावर रोमांच उभे राहतात.आपल्या तिन्ही दलांच्या समन्वयाने ही लढाई जिंकली आणि पाकिस्तानला नमवले. 'डीआरडीओ'चे निवृत्त शास्त्रज्ञ काशीनाथ देवधर यांनी चित्तथरारक युद्धाविषयी दै. 'पुढारी'ला सांगितलेल्या आठवणी त्यांच्याच शब्दांत…

पाकिस्तानने 93 हजार सशस्त्र सैनिकांसह संपूर्ण शरणागती स्वीकारल्याच्या लेखी करारावर पाकिस्तानचे पूर्व विभागाचे लेफ्टनंट जनरल ए. ए. के. नियाझी यांनी भारताचे पूर्व विभागाचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल जगजित सिंह अरोरा यांच्याकडे स्वाक्षरी करून दस्तऐवज सुपूर्द केले. तो दिवस 16 डिसेंबर 1971, सुवर्णाक्षरात नोंदवला गेला. 3 डिसेंबर 1971 ला प्रत्यक्ष युद्ध घोषित केले व पाकच्या हवाई हल्ल्यांना प्रतिहल्ला करून सर्व सशस्त्र सेनांनी एकाचवेळी हल्ले चढवून पराक्रमाची पराकाष्ठा केली.

ट्रायडेंट मोहीम फत्ते केली

लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ व हवाईदलप्रमुख प्रताप चंद्र लाल आणि नौदलप्रमुख एस. एम. नंदा यांच्या नेतृत्वाखाली युद्ध जिंकले. 4 डिसेंबर 1971 ला नौदलाने ट्रायडेंट मोहीम राबवून आपल्या क्षेपणास्त्रांच्या अचूक मार्‍याने पाकिस्तानी युद्धनौका 'खैबर', 'शहाजहान', 'मुहाफिज' यांना जलसमाधी दिली.

आपल्या निपात निर्घात व वीर या क्षेपणास्त्रधारी बोटींनी हे कार्य बिनचूक पार पाडले. पाठोपाठ भारताच्या पायथन मोहिमेद्वारे कराचीवर भारतीय युद्धनौका विनाशवर क्षेपणास्त्र मारा करून केमारी तेलसाठ्यावर हल्ला करून ते आठ दिवस आगीच्या स्वाधीन केले. या पराक्रमामुळेच दरवर्षी 4 डिसेंबर हा नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो.

120 सैनिक रात्रभर लढत होते (बांगला देश मुक्‍ती युद्ध सुवर्ण दिन)

पाकिस्तानने पश्‍चिमी सीमेवर 65 रणगाड्यांद्वारे 2,000 सैनिकांसह 'लोंगोवाल', राजस्थान येथे हल्ला केला. त्याला केवळ 120 भारतीय सैनिकांच्या तुकडीने मेजर कुलदीप सिंह चांदपुरी यांच्या नेतृत्वामध्ये रात्रभर कडवी झुंज दिली व आक्रमण थोपवून धरले होते. सकाळी विंग कमांडर एम. एस. बावा यांच्या तुकडीने हवाई हल्ले करून पाकिस्तान लष्कराचे कंबरडे मोडले व लढाई जिंकली. पश्‍चिम पाकिस्तानच्या बसंतर नदीकिनारी शकरगढ भागामध्ये त्याचवेळी तुंबळ युद्ध झाले. पायदळाच्या तीन तुकड्या व दोन रणगाड्याच्या तुकड्यांद्वारे भयंकर युद्ध झाले.

ब्रिगेडियर अरुण वैद्य व ले. कर्नल बी. टी. पंडित यांच्या तुकड्यांनी धुमाकूळ घालून पाकचे 51 रणगाड्यांचे नुकसान केले. रणगाडाविरोधी सुरुंगाचे जाळे पसरले असतानाही ते निकामी करून शौर्य व धैर्य याचे प्रदर्शन करत युद्ध जिंकले. सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल या 17 पूना हॉर्सच्या जवानाचे मरणोत्तर परमवीर चक्र देऊन व या 3 ग्रेनेडियरच्या तुकडीचे नेतृत्व करणार्‍या मेजर होशियार सिंह यांना परमवीर चक्राने सन्मानित केले.

एकट्या सैनिकाने लढवली खिंड

फ्लाईंग ऑफिसर निर्मलजित सिंह शेखॉन यांनी एकट्याने श्रीनगर विमानतळावरील हल्ले परतवून चोख प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानला नेस्तनाबूत केले. यासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आले.

या युद्धाच्या आधीच 2-3 वर्षे भारताची गुप्‍तहेर संस्था 'रॉ'चे प्रमुख रामेश्‍वरनाथ काओ यांनी पश्‍चिम पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तान तोडण्यासाठी योजनापूर्वक हालचाली करून बांगलामुक्‍तीला खतपाणी घालून फूट पाडली होतीच. त्यामुळे मुक्‍ती वाहिनीच्या मदतीसाठी भारताने पाकिस्तानशी युद्ध केले. तांगेल (ढाकापासून अंदाजे 80 कि.मी.) या शहरावर हवेतून पॅराशूटद्वारे 52 पैकी 50 विमानांमधून प्रत्यक्षात हजार छत्रीधारी उतरवून, पाच हजार उतरविल्याची हवा प्रसारमाध्यमांद्वारे केली होती. मनोवैज्ञानिक दबाव आणून आर्मी कमांडर पूर्व पाकिस्तानला संपूर्ण शरणागतीसाठी भाग पाडले.

1,313 सैनिकांचा गौरव (बांगला देश मुक्‍ती युद्ध सुवर्ण दिन)

पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर बांगलामुक्‍ती वाहिनीबरोबर लढाई झाली. हे युद्ध गंगासागर व आगरताळा येथे झालेले सर्वात मोठे भयंकर युद्ध म्हणून मानले जाते. भारताच्या बाजूने चार पायदळाच्या ब्रिगेड, एक रणगाड्याची, एक इंजिनिअर ब्रिगेड व दोन तोफखान्यांसह हवाईदलाची मदत आणि त्याचवेळी पूर्व विभाग नौदलाने पाकिस्तानची केलेली कोंडी यांचा एकत्रित परिणाम म्हणजे संपूर्ण शरणागती.

पाकच्या 93 हजार सशस्त्र सैनिकांसह निर्णायक युद्धात भारताचा विजय व पुढे बांगला देशची स्थापना स्वतंत्र देश म्हणून. हिलीच्या लढाईत पराक्रम व शौर्य गाजवलेल्या लान्स नायक अल्बर्ट एक्‍का यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन गौरवले. निर्णायक विजयानंतर 513 वीर चक्र, 76 महावीर चक्र व 4 परमवीर चक्र यासह एकूण 1,313 जणांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news