बरोबर 39 वर्षांपूर्वी मुंबईच्या गिरगावमधील सेंट्रल सिनेमात जितेंद्र, जयप्रदा आणि श्रीदेवी यांचा 'मवाली' हा चित्रपट पाहायला गेलो होतो. तेव्हा 'उइ अम्मा, उइ अम्मा,' हे गाणे पडद्यावर सुरू झाल्यावर प्रत्येक ओळीनंतर 'हा आऽ' असे शब्द आल्याबरोबर पब्लिक संपूर्ण थिएटर डोक्यावर घेत होते. अगदी अलीकडेच 'बागी 3' या चित्रपटासाठी 'भंकस' या गाण्याला त्यांनी आवाज दिला. काही वर्षांपूर्वी रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरच्या 'गुंडे' चित्रपटातील 'तुने मारी एंट्री' या गाण्यानेही धमाल केली होती. 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटातील 'ऊ लाला' या गाण्यामुळे बप्पीदा पुन्हा प्रकाशात आले. अगदी आता आतापर्यंत बप्पीदा हॉलिवूडपटांसाठी काम करत होते आणि काळाबराेबर राहण्यास शिकले होते; मात्र ते ज्यांना मातृस्थानी मानत, त्या लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दहा दिवसांतच बप्पीदांचे निधन व्हावे, हा दुर्दैवी योगायोगच म्हणायला हवा.
एल्विस प्रिस्लेला डोळ्यासमोर ठेवून बप्पीदांनी डोळ्यावर गॉगल, रंगीबेरंगी कपडे आणि आगळी वेगळी हेअरस्टाईल ठेवली. संगीतकार पित्याकडून सुरांचा वारसा आल्यामुळे वयाच्या चौथ्या वर्षांपासून ते स्वतःहूनच तबला वाजवायला लागले. लहानपणापासून रविशंकर, अल्लाउद्दीन खाँ, अली अकबर खाँ, निखिल बॅनर्जी, बडे गुलाम अली खाँ, नजाकत अली खाँ-सलामत अली खाँ यांच्या मैफली ऐकत ते मोठे झाले. जगद्विख्यात तबलावादक सामताप्रसाद यांच्या तालावर नृत्यांगना रौशनकुमारी कशी थिरकायची, तेही त्यांनी पाहिले. लताबाईंच्या शब्दाखातर सामताप्रसाद यांनीच बप्पीदांना तबल्याचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यामुळे 'डिस्को किंग' म्हणून बप्पीदांचा गौरव केला जात असला, तरी त्यांचा मूळ शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम होता, हे विसरता कामा नये. त्यामुळेच 'सैंया बिना घर सुना' (आँगन की कली) किंवा 'जिद ना करो' (लहू के दो रंग) यासारखी शास्त्रीय संगीतावर आधारलेली गाणी ते संगीतबद्ध करू शकले. तनुजाचे पती शोमू मुखर्जी यांनी 'नन्हा शिकारी' या चित्रपटाद्वारे बप्पीदांना संगीतकार म्हणून प्रथम संधी दिली. हा चित्रपट आपटला. त्यावेळी बप्पीदा 19 वर्षांचे होते. परंतु, आमिर खानचे वडील ताहिर हुसैन यांना ती गाणी आवडली आणि त्यांनी बप्पीदांना आपल्या 'मदहोश' या चित्रपटासाठी पार्श्वसंगीत देण्याची ऑफर घरी येऊन दिली. चित्रपट पडला तरी त्याचे पार्श्वसंगीत प्रेक्षकांना आवडले. ताहीर यांनीच दिग्दर्शक राजा ठाकूर यांना बरोबर घेऊन 'जख्मी' चित्रपट केला. त्याचे संगीत दिग्दर्शन बप्पीदांवर सोपवले. त्यातील 'जलता है जिया मेरा', 'आओ तुम्हें चाँद पर ले जाएँ' अशी सर्वच गाणी हिट झाली. मग, दोन महिन्यांनीच 'चलते चलते' मधील गाण्यांनी इतका कहर केला की, त्या चित्रपटाचा हीरो हा देव आनंदचा पुतण्या विशाल आनंद आहे, हेही लोक विसरून गेले. 'आपकी खातीर'मधील 'बम्बई से आया मेरा दोस्त' हे गाणे तरुणाईने डोक्यावर घेतले. किशोर कुमारने 'बढती का नाम दाढी' चित्रपटात बप्पीदांना 'जाना कहाँ है' या गाण्याद्वारे पार्श्वगायक म्हणून संधी दिली आणि त्यात छोटा रोलही दिला. हिंदी चित्रपटात 'सुरक्षा' या चित्रपटाद्वारे बप्पीदांनी डिस्को युग आणले. त्यानंतर 'डिस्को डान्सर'मधील 'जिमी जिमी' या गाण्याने धूम माजवली. हे गाणे माझे अत्यंत आवडते असल्याचे मायकेल जॅक्सनने बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी बप्पीदांना सांगितले. सायप्रसपासून कझाकिस्तानपर्यंत सगळीकडे हे गाणे लोकप्रिय ठरले. 1980 चे दशक हे हिंदी चित्रपटांचे गुणवत्तेच्या द़ृष्टीने तमोयुग मानले जाते; मात्र त्याच युगात बप्पीदांच्या संगीताने जितेंद्र, मिथुन आणि गोविंदाच्या अनेक बोगस चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळवून दिले. अनिल कपूरच्या 'साहेब'मधील 'यार बिना चैन कहाँ रे' या गाण्याचा इतका प्रभाव राहिला, की 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटात त्याचे नवे रूप बघायला मिळाले. बप्पीदांच्या 'तम्मा तम्मा लोगे'चे नवे व्हर्जन 'बद्रीनाथ की दुल्हनिया'त ऐकायला मिळते. शिकागोत त्यांनी डिस्को संगीत ऐकले आणि त्याला भारतीय रूप दिले.'पग घुंगरू' या गाण्याद्वारे बप्पीदांनी प्रथमच सलग बारा मिनिटांचे गाणे सादर करण्याचा विक्रम नोंदवला. या गाण्यात मॉडर्न बीटमध्ये 'रे रे रे रे' अशी सरगम मिसळण्याचा प्रयोग बप्पीदांनी केला. 'जहाँ चार यार मिले' या गाण्यात प्रथमच किशोर कुमारबरोबर अमिताभने रॅप पद्धतीने गाणे म्हटले. येशुदास, पॉप गायिका अलिशा चिनॉय, दक्षिणेची प्रसिद्ध गायिका जानकी यांना बप्पीदांनी बॉलीवूडमध्ये ब्रेक दिला. शेरॉन प्रभाकरपासून ते रुना लैलापर्यंत अनेकांचा आवाज त्यांनी वापरला. बप्पीदांनी हिंदी संगीताला नवा आवाज दिला. नवे टेक्श्चर दिले. सचिन देव बर्मन, आर. डी., ओ. पी. नय्यर, शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल हे सगळे बडे बडे संगीतकार हयात असताना पोरसवदा बप्पी लाहिरींनी आपली स्वतंत्र मुद्रा कोरली. त्यांना निरोप देताना 'कभी अलविदा ना कहना' हेच शब्द आठवतात.
– बाबू मोशाय